HW News Marathi
महाराष्ट्र

महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता? शिवसेनेचा भाजपला सवाल 

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, कोरोनाचं संकट गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटासाठी भाजपकडून राज्य सरकारला दोषी ठरवलं जात आहे. विरोधकांकडून सातत्यानं होत असलेल्या आरोपांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. “करोनाला मुके देत व मुके घेत या मंडळींनी जो शिमगा केला, तो विरोधी पक्षाचा सरकारविरोधी कार्यक्रम अमानुषतेचे लक्षण आहे,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनाचा समाचार घेतला आहे. आजच्या (२३ नोव्हेंबर) अग्रलेखात शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

पंतप्रधान मोदी यांनी ‘जी – 20’ संमेलनात कळवळून सांगितले, दुसऱ्या विश्वयुद्धानंतर कोरोना हेच सगळय़ांत मोठे संकट आहे. मानवतेच्या इतिहासातील हे महत्त्वाचे वळण आहे. एकत्र येऊन त्या संकटाशी सामना करावा लागेल, पण हे झाले जगासाठी. आपल्या देशाचे काय? तेथे दिव्याखाली अंधार आहे व कोरोना हे विश्वयुद्ध वगैरे नसून ‘शुद्ध’ भगवा फडकविण्यासाठी पुकारलेले राजकीय युद्ध आहे, असे मोदी यांच्या भक्तांनी ठरवून टाकले आहे. लोकांच्या जिवाशी का खेळता, महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता, एवढाच आमचा सवाल आहे. कोरोना हे दुसरे विश्वयुद्ध आहे. याचा अर्थ समजून घ्या. हे विश्वयुद्ध ज्यांनी लादले व नरसंहार घडविला ते हिटलर, मुसोलिनी वगैरे नेत्यांचे पुढे जनतेने काय हाल केले ते महाराष्ट्रातील भाजप पुढाऱयांनी समजून घ्यावे.

मुंबईवर शुद्ध भगवा फडकवण्याच्या नादात ‘भाजप’ कोरोनाचा प्रसार वाढवत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे वगैरे एकवेळ सोडून द्या, पण पंतप्रधान मोदी यांनीही गर्दीचे प्रसंग टाळा. सोशल डिस्टन्सिंगचे भान राखा, असे आवाहन वारंवार केले आहे. पण पं. बंगाल व महाराष्ट्राच्या बाबतीत पंतप्रधान मोदींचे ऐकायचेच नाही असा विडा उचलून भाजपाई रस्त्यावर उतरत आहेत. या अतिरेकी वागण्यांमुळे आपण ‘कोरोना’चा प्रसार वाढवीत आहोत व लोकांच्या जिवाशी खेळत आहोत. आताही भाजपतर्फे मुंबई-महाराष्ट्रात वाढीव वीज बिलांसंदर्भात आंदोलन केले. गर्दी, दाटीवाटी करून या मंडळींनी सरकारच्या नावे शिमगा करून स्वतःचा कंडू शमवून घेतला हे खरे. तोंडास मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही, वाहतुकीसंदर्भात नियमांचे पालन नाही. कोरोनाला मुके देत व मुके घेत या मंडळींनी जो शिमगा केला तो विरोधी पक्षाचा सरकारविरोधी कार्यक्रम अमानुषतेचे लक्षण आहे. आपल्या या राजकीय गोंधळातून मुंबई-महाराष्ट्रात कोरोनाचे संकट वाढते आहे याचे भान तरी त्यांनी ठेवावे. एका बाजूला बोंबलायचे, सरकार कोरोनाशी लढण्यात अपुरे पडत आहे.

कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे म्हणून टीका करायची. त्याच वेळी असे नियमबाहय़ राजकीय गोंधळ घालून कोरोनाचा प्रसार वाढवायचा. कोरोनाची दुसरी ‘लाट’ येत आहे, पण भाजपला वाटत आहे ही लाट त्यांच्या राजकीय विचारांची आहे. त्याच लाटेवर शिडी लावून मुंबई पालिकेवरील भगवा उतरवू. आम्ही म्हणतो ठीक आहे. तुमचे राजकारण तुमच्यापाशी, पण त्यासाठी लोकांना कोरोनाच्या खाईत का ढकलता? कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असेल तर ती धोक्याची घंटा सगळय़ांसाठीच आहे. दिल्लीची परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाताना दिसत आहे. त्यामुळे दिल्ली पुन्हा कडक ‘लॉकडाऊन’च्या दिशेने निघाली आहे. दिल्लीतील लग्नसमारंभांवर बंधने आलीच आहेत, पण दिल्लीची लाट मुंबईपर्यंत पोहोचू नये यासाठी महाराष्ट्र सरकार कठोर निर्णयांकडे वळत आहे. मुंबई-दिल्ली विमानसेवा, मुंबई-दिल्ली रेल्वे सेवा पुन्हा बंद करावी का, यावर राज्य प्रशासन विचार करीत आहे. याचाच अर्थ परिस्थिती गंभीर व हाताबाहेर जाताना दिसत आहे. दिल्लीत रोज साधारण दीडशे मृत्यू होत आहेत व सात आठ हजार नवे रुग्ण समोर येत आहेत.

हा आकडा इस्पितळ, कोविड सेंटरमधला आहे. घराघरांत कोरोना रुग्ण आहेत. घरात तपासणीशिवाय मृत्यू होत आहेत. त्याची तर कोठे नोंदच नाही. म्हणजे दिल्लीची स्थिती भयंकर आहे. देशाची राजधानी हे फक्त अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’चे राज्य नाही. ती देशाची राजधानी आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारला कोरोना नियंत्रणासाठी सर्वतोपरी मदत करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्यच आहे. भाजपचे अनेक खासदार व केंद्रीय मंत्री कोविडने आजारी पडले. एक केंद्रीय मंत्री सुरेश आंगडिया तर कोरोनाचे बळी ठरले. रामविलास पासवानही गेले. अनेक खासदार कोरोनाग्रस्त झाले. याची जबाबदारी कोणी घ्यायची? गुजरात, हरयाणा, राजस्थान, मणिपूर या चार राज्यांत केंद्राने कोविड पाहणीसंदर्भात खास पथके तैनात केली. याचा अर्थ या राज्यातील स्थिती चांगली नाही. महाराष्ट्राने स्थिती नियंत्रणात आणली तर विरोधी पक्षाचे एकच तुणतुणे वाजत आहे, हे उघडा आणि ते उघडा. म्हणजे कोरोनाची महामारी पसरू द्या व त्याचे खापर सरकारवर फोडून आत्म्यास थंडक पोहोचू द्या. केरळ राज्याने कोरोना आधी नियंत्रणात आणला, पण आज पुन्हा केरळची स्थिती बिघडली आहे. शाळा, मंदिरे, लोकल उघडा असे सांगणाऱयांसाठी हा धडा आहे.

राज्यातील अनेक शिक्षक व विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाले आहेत. मंदिरांबाबत नियम पाळले नाही तर देवही परिस्थिती नियंत्रणात आणू शकणार नाही. त्यात विरोधी पक्ष ज्या बेजबाबदारपणे वागत आहे त्यामुळे स्मशानात लाकडांचा साठा जास्तच करावा लागेल व भाजपची तीच अघोरी इच्छा दिसत आहे. उैठसूट बोंबा मारत रस्त्यावर उतरायचे. लोकांची गर्दी गोळा करून त्यांना कोरोनाच्या गुहेत ढकलायचे हे काय माणुसकी असलेल्या पक्षाचे लक्षण आहे? भाजपला मुंबईवरचा भगवा उतरवायचा आहे व ते त्यांचे अंतिम स्वप्न आहे. पण त्यासाठी संपूर्ण मुंबईची कोरोना दफनभूमी करायची. कफनाचे मांजरपाट कापड विजयी पताका म्हणून फडकवायची हे लक्षण माथेफिरू विकृतांचे आहे. राजकारण्यांच्या काळजात मायेचा ओलावा नसेल तर ते हे असे बेजबाबदारपणे वागतात व त्यात निरपराध्यांचे बळी गेले तर त्याचा विजयोत्सव साजरा करतात. दुसऱयाच्या पराभवात एक वेळ आनंद मानता येईल, पण कोरोना महामारी संकट वाढविण्यास हातभार लावायचा. ते वाढले की त्यावर सरकारला कोंडीत पकडायचे, असा विचार करणे म्हणजे आपल्याच प्रजेला डोळय़ादेखत महामारीच्या कत्तलखान्यात पाठविण्यासारखे आहे. दिल्लीत आता ‘मास्क’ सक्तीचा. न घालणाऱयांना दोन हजारांचा दंड असा नियम लागू केला आहे.

वारंवार हात धुण्यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत. नव्या लॉकडाऊनमध्ये बाजार वगैरे बंद राहतील. अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. याचा त्यांनी काढलेला अर्थ असा की, दिवसा कोरोना विषाणू झोपतो व रात्री तो फिरत राहतो. महाराष्ट्रातील काही चवली-पावलीचे उपरे भाजप नेते प्रश्न विचारतात की, ‘‘हात धुवा, असे सांगण्याशिवाय महाराष्ट्र सरकारने काय केले?’’ त्यांना उत्तर असे की, वर्षभरापूर्वी तुम्हाला ‘धुतले’ ते काय कमी झाले. आता जनता हात धूत आहे. मास्क लावत आहे. तुम्हाला तुमचे काही धुता येत नसेल तर लोकांची शिस्त का बिघडवता? ‘कोरोना महामारीचे संकट चीनमधून आले हा समज खोटा आहे. कोरोना महामारीचे बाप आपल्या आसपास वावरत आहेत. आपल्या पंतप्रधानांचे तरी ऐका असे सांगणे हा सुद्धा अपराध ठरतोय. कारण पंतप्रधान फक्त भाजपचे किंवा भाजपशासित प्रदेशांचे असा नवा पायंडा या मंडळींनी पाडला आहे. तो लोकशाही, स्वातंत्र्य व हिंदुस्थानच्या संघराज्यास घातक आहे.

देशात महागाई, आर्थिक मंदी, बेरोजगार, कश्मीरातील रक्तपात, चीनची लडाखमधील घुसखोरी असे अनेक चिंतेचे विषय आहेत. त्यावरील लक्ष हटविण्यासाठी शुद्ध भगवा व कोरोना महामारीसारखे विषय वाढवले जात आहेत काय? पंतप्रधान मोदी हे जागतिक ‘जी-20’ संमेलनात त्यांनी कळवळून सांगितले, दुसऱया विश्वयुद्धानंतर कोरोना हेच सगळय़ांत मोठे संकट आहे. मानवतेच्या इतिहासातील हे महत्त्वाचे वळण आहे. एकत्र येऊन त्या संकटाशी सामना करावा लागेल, पण हे झाले जगासाठी. आपल्या देशाचे काय? तेथे दिव्याखाली अंधार आहे व कोरोना हे विश्वयुद्ध वगैरे नसून ‘शुद्ध’ भगवा फडकविण्यासाठी पुकारलेले राजकीय युद्ध आहे, असे मोदी यांच्या भक्तांनी ठरवून टाकले आहे. लोकांच्या जिवाशी का खेळता, महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता, एवढाच आमचा सवाल आहे. कोरोना हे दुसरे विश्वयुद्ध आहे. याचा अर्थ समजून घ्या. हे विश्वयुद्ध ज्यांनी लादले व नरसंहार घडविला ते हिटलर, मुसोलिनी वगैरे नेत्यांचे पुढे जनतेने काय हाल केले ते महाराष्ट्रातील भाजप पुढाऱयांनी समजून घ्यावे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत मोदी-सोनिया गांधीची घेणार भेट

swarit

मंत्र्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी समन्स

News Desk

“ते म्हणतात सरकार चालून तर दाखवा म्हणजे आत्ता आम्ही रांगतोय का? – मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षाला पलटवार

News Desk