HW News Marathi
देश / विदेश

शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? कॉंग्रेसच्या या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणतात…

नवी दिल्ली | युपीएचं नेतृत्व शरद पवारांनी करण्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेत्यांनी नाराजी जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांनी आपला संबंध नाही त्या विषयात पडू नये असा सल्लाच दिला होता. यावर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांच्या टीकेला उत्तर दिलं असून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे. तसंच या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी भाष्य केल्यास आपण त्यांना उत्तर देऊ असंही सांगितलं आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना काँग्रेसने आधी त्यांनी युपीएमध्ये सामील व्हावं असा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी यूपीएचं नेतृत्व करावं या संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेत शिवसेना यूपीएचा घटक पक्षही नाही, संजय राऊत यांना यूपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही, असे खडे बोल नाना पटोले यांनी सुनावले. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा चिमटाही त्यांनी काढला होता.

संजय राऊत यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “शरद पवार या देशाचे नेते आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे काय आहेत हे सर्वांना माहिती आहे. युपीएसंबंधी बोलण्यासाठी युपीएमध्ये असायला पाहिजे असं काही नाही. युपीए राज्याचा विषय नाही, त्यामुळे राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये. हा राष्ट्रीय विषय असून राष्ट्राच्या हितासाठी या देशात एका मजबूत विरोधी पक्षाची आघाडी स्थापन व्हायची असेल तर मी सांगितलेल्या भूमिकांवर चर्चा होणं गरजेचं आहे. हे जर महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे”.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “हा दिल्लीतील चर्चेचा विषय असून महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये ती होऊ नये. राष्ट्रीय विषय दिल्लीत चर्चिला जातो आणि तिथेच झाली पाहिजे. या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी बोलणार असतील तर आम्ही त्यांना उत्तर देऊ. पण ते सुद्धा या विषयावर काही बोलत नसून चिंतन करत आहेत”.

“माझ्यावर कोणी टीका करत नसून ते आपल्या पक्षावरच टीका करत आहेत. या देशात जर एक उत्तम विरोधी पक्षांची आघाडी निर्माण झाली नाही तर तुम्ही भाजपाचा पराभव कसा करणार याचं उत्तर मला प्रश्न विचारणाऱ्यांनी द्यायला हवं. ते दिल्लीत येऊन द्यावं, महाराष्ट्रात देऊ नये. हा विषय राष्ट्रीय आघाडीचा आहे, राष्ट्रीय राजकारणातील आहे. जिल्हा किंवा तालुक्यातील नाही हे समजून घेतलं पाहिजे,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत. युपीए मजबूत होऊ नये असं जर काँग्रेसच्या महाराष्ट्रातील लोकांना वाटत असेल तर त्यांनी स्पष्ट करावं अशी मागणीदेखील त्यांनी केली.

युपीए २ ची गरज वाटते का? विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आतापर्यंत तिसरी, चौथी, पाचवी आघाडी अशा नौटंकी झाल्या आहेत, त्या अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे जी आताची आघाडी आहे ती कशी मजबूत होईल हे पाहणं गरजेचं आहे. दिल्लीतील काही लोक युपीए-२ स्थापन करण्याच्या तयारीत आहेत म्हणून त्या चिंतेनं मी हे सांगितलं आहे”.

काय म्हणाले होते नाना पटोले?

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदावरून आता महाविकासआघाडीत नाराजीची ठिणगी पडली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘यूपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव सुचवले होते. यावरुन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना फटकारले. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. काँग्रेसचे नेते याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले आहेत. मुळात शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत काय म्हणाले होते?

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुखपदी शिवसेनेने शरद पवार यांचे नाव सुचवल्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाल्याचा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला. यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ यूपीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र, सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसते. देशात वेगळ्याप्रकराच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे, असे देशातील अनेक पक्षांची म्हणणे आहे. अशावेळी शरद पवार यांच्याकडे किती खासदार आहेत, हा प्रश्न नाही. मी नेहमीच शरद पवार यांचे समर्थन केले आहे. जे पक्ष यूपीए किंवा एनडीएमध्ये नाहीत अशा पक्षांना एकत्र आणून यूपीएची पुनर्बांधणी झाली पाहिजे. अनेक पक्षांना शरद पवार यांचे नेतृत्त्व मान्य होऊ शकते, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बरे झाले, सर्वोच्च न्यायालयाने कान टोचले’, फारुख अब्दुल्लांच्या प्रकरणावरुन सामनातून टीका

News Desk

एटीएसमुळं कर्करोग झाला – साध्वी प्रज्ञासिंह

News Desk

आज जाहीर होणार टीम इंडियाचा कोच

News Desk