HW News Marathi
देश / विदेश

बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा, सामनातून टीका  

मुंंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होतो असं वक्तव्य केलं होतं. यावरुन नेटकऱ्यांनी मोदींना चांगलंच ट्रोल केलं होतं. यावरुन आता सामनाच्या आजच्या (३० मार्च) अग्रलेखातूनही मोदींवर टीका करण्यात आली आहे. बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा. मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मतांचा चढउतार किती होईल हे आजच सांगता येणार नाही. पण मोदींचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरू केल्या आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदी यांनी पुन्हा बांगलादेशात जायला हवे, असा सल्ला शिवसेनेनं मोदींना दिला आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात किंवा गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून ‘ताम्रपट’ व पेन्शन मिळते. या सुविधा बांगलादेश स्वातंत्र्य लढय़ातील मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात. बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा. मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याने प. बंगाल विधानसभा निवडणुकीत मतांचा चढउतार किती होईल हे आजच सांगता येणार नाही, पण मोदींचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरू केल्या आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी श्री. मोदी यांनी पुन्हा बांगलादेशात जायला हवे, हाच एक उपाय.

प. बंगालात निवडणुकांचे रण पेटले असतानाच पंतप्रधान मोदी हे बाजूच्याच बांगलादेशच्या दौऱ्यावर जाऊन आले. मागे उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचा ज्वर चढला असताना मोदी नेपाळ दौऱ्यावर गेले. तेथे पशुपतिनाथ मंदिरात जाऊन दिवसभर पूजाअर्चा करीत होते, गाईला चारापाणी घालत होते. हे सर्व हिंदुस्थानातील वृत्तवाहिन्या सतत दाखवत होत्या. बांगलादेशमध्येही मोदी हे तेथील जशोरेश्वरी कालिमाता मंदिरात जाऊन बसले. त्यांनी पूजाअर्चा केली. हे चित्र प. बंगालातल्या हिंदू मतदारांना प्रभावित करण्यासाठीच असावे. उत्तर प्रदेशच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असताना मोदी नेपाळच्या मंदिरात होते, तर प. बंगालातील पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येस मोदी प. बंगालच्या सीमेवरील बांगलादेशातील मंदिरात होते हा योगायोग नक्कीच नाही.

51 शक्तिपीठांत समावेश असलेल्या जशोरेश्वरी कालिमाता मंदिरास भेट देण्याची इच्छा मोदी यांनी बांगलादेश सरकारकडे व्यक्त केली होती. बांगलादेश सरकारनेही त्यानुसार ते मंदिर सजविले. पंतप्रधान मोदी यांनी त्या मंदिरात देवीला वस्त्रालंकार चढविले. एका मुस्लिम देशातील मंदिरात हिंदुस्थानी पंतप्रधानाने अधिकृतपणे दर्शनासाठी जाणे हे मोदीप्रेमींना नक्कीच रोमांचकारी वाटू शकते. राजकीयदृष्टय़ा कमालीचे जागरुक असलेले मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. प. बंगालातील विधानसभा निवडणुका भाजपने म्हणजेच पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत व त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी आहे.

प. बंगालात मोठय़ा प्रमाणावर ‘बांगलादेशी’ घुसले आहेत. त्या व्होट बँकेवर अनेक मतदारसंघांचे निकाल बदलणार आहेत. प. बंगाल व बांगलादेशची भाषा एकच आहे. बांगलादेशात राहणाऱयांची नातीगोती प. बंगालात मोठय़ा प्रमाणावर आहेत. इंदिरा गांधींच्या शौर्यामुळे, पराक्रमामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. इंदिरा गांधी यांनी युद्ध पुकारून पाकिस्तानची सरळ फाळणीच केली. त्यानंतर असे शौर्य कोणत्याही पंतप्रधानांना गाजवता आले नाही. आश्चर्य असे की, त्या बांगलादेश स्वातंत्र्य लढय़ात आपलाही सहभाग होता, असे विधान मोदी यांनी बांगलादेशच्या भूमीवर जाऊन केले आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढय़ात सहभागी होऊन आपण तुरुंगवासही भोगल्याची ऐतिहासिक माहिती मोदी यांनी दिली. 20-22 वर्षांचे असताना आपण हा सत्याग्रह केल्याची माहिती मोदी यांनी दिली. त्यामुळे त्यांचे भक्त नक्कीच थरारून गेले असतील. इंदिरा गांधींनी युद्ध करून पाकिस्तान तोडले व बांगलादेश निर्माण केला, यापेक्षा बांगलादेश निर्मितीसाठी मोदी यांनी सत्याग्रह केला हे शौर्य महत्त्वाचे असे भाजप कार्यकर्त्यांना वाटू शकते.

‘‘बांगलादेशमधील नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचारांमुळे आम्ही व्यथित झालो होतो. या अत्याचारांची छायाचित्रे पाहून अनेक दिवस झोपही लागली नव्हती,’’ असे मोदी यांनी ढाक्यात सांगितले. पंतप्रधान हे कमालीचे हळवे, दयाळू व संवेदनशील असल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून गाझीपूर सीमेवर शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात ऊन, वारा, पावसात रस्त्यावर बसले आहेत. तेथे त्यांचे बळी गेले. अत्याचार सहन करीत हे शेतकरी तेथे बसले आहेत. याचे दुःख आपल्या पंतप्रधानांना होतच नसेल असे कसे म्हणता येईल? मोदी यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतला व या काळात त्यांना झोप लागत नव्हती हेच सत्य आहे. मोदी विरोधकांना हे पटत नसेल तर त्यांनी त्यांच्या डोक्यात साचलेला इतिहास गाळून घ्यावा. मोदी सांगतात म्हणजे ते खरेच आहे हे मानायला हवे, अशी आजची स्थिती आहे.

प. बंगालमधील निवडणुकांसाठी इतका खटाटोप करावा लागेल व प्रकरण बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढय़ातील सहभागापर्यंत पोहोचेल असे वाटले नव्हते. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात किंवा गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून ‘ताम्रपट’ व पेन्शन मिळते. या सुविधा बांगलादेश स्वातंत्र्य लढय़ातील मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात. पंतप्रधान मोदी यांचा बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सहभाग, त्यासाठी त्यांना झालेली अटक आणि त्याबाबत मोदी यांनी स्वतःच दिलेल्या माहितीवरून देशात बराच गदारोळ झाला. टीका-टिपण्याही झाल्या. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही याबाबत टिपणी केली. मात्र त्याच वेळी देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायला हवा, असेही त्यांनी म्हटले. आम्हालाही मोदी यांच्या सांगण्यावर जनतेने विश्वास ठेवायलाच हवा आणि त्यांचा यथोचित गौरव व्हावा असे वाटते.

बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा. मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याने प. बंगाल विधानसभा निवडणुकीत मतांचा चढउतार किती होईल हे आजच सांगता येणार नाही, पण मोदींचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरू केल्या आहेत. कट्टरतावादी इस्लामी गटांनी हिंदू मंदिरांची तोडफोड केली आहे. हिंदू वसाहतींवर हल्ले सुरू झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 12 जण ठार झाले आहेत. सरकारी कार्यालये, लोकल ट्रेन्स, प्रेस क्लबवरही हल्ले करण्यात आले आहेत. मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याचे हे फलित आहे.

पंतप्रधान मोदी बांगलादेशात जाऊन आले, पण त्यामुळे तेथील हिंदू अधिक असुरक्षित झाला. प. बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी एखादी हिंदू-मुसलमान दंगल भडकवली जाईल असा कयास होता, पण बाजूच्या बांगलादेशात हवी असलेली दंगल पेटली. त्याचे चटके प. बंगालात नक्कीच बसतील. पंतप्रधान मोदी ढाक्याला गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यासाठी गेले, पण तेथे शांततेची होळीच पेटली. मोदींनी जशोरेश्वरी मंदिरात जाऊन पूजा केली, पण आता तेथील मंदिरेच तोडण्यात आली याची तर्कसंगती कशी लावणार? शांतता प्रस्थापित करण्यासाठी श्री. मोदी यांनी पुन्हा बांगलादेशात जायला हवे, हाच एक उपाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तामिळनाडू निवडणुकीपूर्वी शशिकला यांची राजकारण सोडल्याची मोठी घोषणा

News Desk

“सीबीआय, ईडीच्या तलवारी उपसून भय निर्माण करणारे केंद्र अशा वेळी पळपुटेपणा दाखवते”

News Desk

Union Budget 2021 | मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटी 

News Desk