HW News Marathi
महाराष्ट्र

“सुधीर मुनगंटीवारांचे विनोदी कार्यक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील”, राऊतांचा खोचक टोला

मुंबई | भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल (१० मार्च) विधानसभेत बोलताना तीन महिन्यांनंतर राज्यात सत्ताबदल होण्याचे संकेत दिले होते. मुनगंटीवार यांच्या विधानानं विधिमंडळात उपस्थित असलेल्या साऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता मुनगंटीवारांच्या विधानाला शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुधीर मुनगंटीवार उत्तम विनोद करतात. त्यांचे कार्यक्रम ठेवल्यास ते तुफान चालतील, असा टोला राऊत यांनी लगावला. संजय राऊत आज (११ मार्च) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार येईल असा दावा केला आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला असून सुधीर मुनगंटीवारांचे विनोदी कार्यक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील असं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी सरकार पुढील तीन वर्ष मजबुतीने काम करेल असा विश्वास व्यक्त केला.

“अधिवेशनात विरोधी पक्षाने उत्तम कामगिरी केली. खरं खोट काय ते नंबर बघू…ही विरोधी पक्षाची भूमिका पुढील साडे तीन वर्ष त्यांनी उत्तम प्रकारे वठवावी. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील तीन महिन्यात सरकार येईल असं म्हटलं आहे. चांगला विनोद करतात ते…लवकरच महाराष्ट्रातील चित्रपटगृह सुरु होत आहेत. आत्ताच मला काही प्रमुख नाट्य निर्मात्यांचा फोन आला होता. त्यांना काही सूट हवी आहे. मला काही गरज वाटत नाही, सुधीरभाऊंचे असे विनोदी कार्यक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. “सरकार पुढील तीन वर्ष मजबुतीने काम करेल. सुधीर मुनगंटीवार किंवा भाजपाने त्याबाबत चिंता करु नये. उत्तम विरोधी पक्षाची भूमिका ते निभावत असून त्यांनी त्यात कायम राहावं,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार?

“राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार तीन महिन्यात पडेल. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती,” असेही मुनगंटीवार म्हणाले. “राज्यात शुभकार्य कधी ना कधी व्हायचंच आहे. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे. जेव्हा अशापद्धतीने सूडाचे राजकारण वाढतं, तेव्हा सत्तेचा प्रलय येतो. पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर आहे,” असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. ‘कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिरसे आयेगा,’ असं मुनगंटीवार यांनी म्हणताच भाजपच्या आमदारांनी बाकं वाजवून त्यांचं स्वागत केलं. पण सुधीर मुनगंटीवार यांनी हा शेर सादर केल्यानंतर विधानसभेत एकच चर्चा रंगली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विकास कामांचा बोलाचा भात बोलाची कढी! – भालचंद्र शिरसाट

Aprna

“मी तसं बोललोच नव्हतो, माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला”

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये कशाचा कशाला धागाच जुळत नव्हता – चंद्रकांत पाटील

News Desk