HW News Marathi
देश / विदेश

याला म्हणतात लढाई… संजय राऊत यांनी केलं प्रियंका गांधींचं कौतुक

मुंबई | ‘देशात आज सगळ्यांना एकत्र करणारे जयप्रकाश नारायण नाहीत व लढण्याची प्रेरणा देणारे जॉर्ज फर्नांडिसही नाहीत. सगळेच तडजोडवादी बनले आहेत. या सगळ्या परिस्थितीत लखीमपूर खेरीच्या प्रकरणातून निर्माण झालेली प्रियंका गांधी नावाची ठिणगी महत्त्वाची वाटते, असं परखड मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ‘देशातील विरोधी पक्षांना राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी नकोत. कारण देशाचे नेते होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. मोदी व शहांचेही तेच मत आहे,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

प्रियंका यांना सीतापूरला जबरदस्तीने नेले व डांबले.

लखीमूपर खेरी प्रकरणानंतर प्रियंका गांधी यांनी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांशी भेटण्यासाठी गेल्या होत्या. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी त्यांना अडवले, अटक केली. मात्र, त्यानंतरही त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. संजय राऊत यांनी ‘सामना’त लिहिलेल्या एका लेखात प्रियंका गांधी यांच्या या संघर्षाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ‘रात्रीच्या गडद अंधारात एखाद्या वाघिणीप्रमाणे प्रियंकांनी साहस दाखवलं. बेकायदेशीररित्या अटक करणाऱ्या पोलिसांना प्रियंकांनी ठणकावले. त्यामुळं उत्तर प्रदेश पोलिसांचे धाबे दणाणले. त्या दिवशी दिल्लीलाही झोप नसावी व उत्तर प्रदेश प्रशासनाला घाम फुटला असावा. त्या काळोखात इंदिरा नावाची वीज पुन्हा कडाडली आहे असाच भास देशाला झाला. प्रियंका यांना सीतापूरला जबरदस्तीने नेले व डांबले. त्या घाणेरड्या जागेत झाडू हातात घेऊन प्रियंका यांनी साफसफाई केली. देशात स्वच्छता अभियानाच्या निमित्तानं एक दिवस ज्यांनी झाडू घेऊन फोटो काढले, त्या लाखो फोटोंवर प्रियंका यांच्या एका झाडूने मात केली,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे. ‘प्रियंका गांधींच्या अटकेनं व संघर्षानं देश खडबडून जागा झाला. ४ ऑक्टोबरच्या पहाटेचा प्रियंका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला, त्यांना इंदिरा गांधींचं अस्तित्व देशात आहे व ते अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

‘ईडी, सीबीआय, एनसीबीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा कोणावरही धाडी घालतात व कोणालाही अटक करतात. त्याच वेळी चार शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या एका मंत्रीपुत्राच्या अटकेसाठी प्रियंका गांधी स्वतःला अटक करून घेतात. लढाई यालाच म्हणतात. चार खून पचवून सुखानं झोपलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाची झोप उडवण्याचं काम प्रियंकांनी केलं आहे,’ असं संजय राऊत यांनी आपल्या लेखात नमूद केलं आहे. ‘राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची शकले झालेली दिसत आहेत. आघाड्या होण्याआधीच अहंकाराच्या सुईने त्या फुटतात. प्रत्येकाला आपल्या राज्याचा सुभा सांभाळायचा आहे व सध्याच्या राजकीय परिस्थितीत दिल्लीचे मांडलिक बनून दिवस ढकलायचे आहेत. ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस व अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष काँग्रेसला गिळतोय.

या सगळ्यांना राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी नकोत. कारण देशाचे नेते होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. मोदी व शहांचेही तेच मत आहे. विरोधकांची एकजूट होऊ नये व काँग्रेस कमजोरच राहावी हे भाजपला वाटणे व इतर विरोधकांनाही तेच वाटणे यात फरक आहे. इंदिरा गांधी व त्यांची काँग्रेस नको म्हणून १९७७ साली विरोधक एकत्र आले व सत्ताधारी काँग्रेसचा पराभव केला. आज सत्तेवर नसलेल्या काँग्रेसचंही इतर विरोधकांना वावडं व्हावं,’ याबद्दल संजय राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ २२० जागांमध्ये संगमनेरदेखील असेल !

News Desk

शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला, राहूल गांधींची बोचरी टिका

News Desk

कोरोनाचा प्रकोप आता भारतीय लष्करापर्यंत, डॉक्टर आणि जेसीओ कोरोना पॉझिटिव्ह

swarit