HW News Marathi
देश / विदेश

मोदींनी आता रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून बाहेर पडून रुझवेल्टच्या भूमिकेत शिरावे!

मुंबई | कोरोनाच्या संकटावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. मंदीच्या लाटेने सगळेच गटांगळ्या खातील अशी स्थिती आहे. राज्यकर्ते आत्मसंतुष्ट व आत्मप्रौढीत मग्न असले की, हे असे होणारच! अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहेच. किमान पंतप्रधान मोदी यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून प्रे. रुझवेल्टच्या भूमिकेत शिरणे महत्त्वाचे आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. मंदीच्या लाटेने सगळेच गटांगळय़ा खातील अशी स्थिती आहे. राज्यकर्ते आत्मसंतुष्ट व आत्मप्रौढीत मग्न असले की, हे असे होणारच! अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहेच. किमान पंतप्रधान मोदी यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून प्रे. रुझवेल्टच्या भूमिकेत शिरणे महत्त्वाचे आहे.

शेअर बाजार कोसळणे हे आता नवीन राहिलेले नाही. मुकेश अंबानी यांच्या घराच्या मैलभर परिसरात जिलेटिन कांडय़ा असलेली एक गाडी सापडली, ते कारणही शेअर बाजार कोसळून पडायला पुरेसे ठरते. इतकी आपली अर्थव्यवस्था ठिसूळ पायावर उभी आहे. पूर्वी युद्ध किंवा महायुद्धामुळे अर्थव्यवस्था कोसळत असे. आता कोरोना संकटामुळे शेअर बाजाराची रोजच पडझड सुरू झाली आहे. आपल्याच देशात नाही, तर जगभरातच एक भयानक मंदीची लाट आली आहे.

हिंदुस्थानसारख्या देशात उत्पादनाचा वेग घटला आहे. लोकांनी नोटाबंदीच्या काळात नोकऱया गमावल्याच होत्या. आता लॉक डाऊनमध्ये उरलेल्या लोकांनीही नोकऱया गमावल्या. बाजारात हालचाल नाही. लोकांची पैसे खर्च करण्याची क्षमता संपली. जी काही थोडीफार पुंजी आहे ती घरातील चूल भविष्यात पेटत राहावी यासाठीच ठेवायला हवी हे लोकांनी ठरवले आहे.

गुंतवणूकदारांची घाई

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करून त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे गरजेचे आहे. आज देशातील 60 टक्के कामगार बेकार झाले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न दोन तृतीयांशने खाली आले आहे, पण आपले राज्यकर्ते मात्र उदासीन आणि आत्मसंतुष्ट आहेत. पंतप्रधान मोदी हे एक राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक चांगले अर्थतज्ञ त्यांना सोडून गेले आहेत. गुजरात हा व्यापाऱयांचा प्रदेश आहे. ‘‘हम बनिया लोग है’’ असे ते लोक अभिमानाने सांगतात. मोदी यांनीही ‘‘आपण व्यापारी आहोत’’ असे वारंवार सांगितले, पण व्यापारीच दुकान थंडा करून बसले आहेत.

अर्थव्यवस्था जेव्हा अस्थिर होऊ लागते तेव्हा स्थावर मालमत्तेत पैसे गुंतविण्याकडे लोकांचा कल वाढतो. अमेरिकेत 1924-25 सालात मंदी आली. तो महायुद्धाचा काळ होता. त्यानंतर फ्लोरिडा भागातील जमिनी खरेदी करण्याची एक लाट आली. तिने असंख्य लोकांना झपाटले. प्रवासी वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढणार आणि अमेरिकेतील व बाहेरील लोकांची फ्लोरिडा भागातील समुद्राची हवा खाण्यासाठी अतोनात गर्दी होणार या कल्पनेनेच लोक वेडे झाले. मग दिसेल ती जमीन वाटेल त्या किमती देऊन खरेदी केली जाऊ लागली, पण लोक अपेक्षेप्रमाणे येत नाहीत असे नंतर दिसून आल्यामुळे अनेकांची जन्माची कमाई नंतर मातीमोल झाली.

आता दिल्ली, उत्तर प्रदेशातील नोएडा, गुरगाव भागांत लोक जमिनी खरेदी करीत आहेत. महाराष्ट्रातील पुणे, कोकण, मुंबई, ठाण्यात पैसेवाले गुंतवणूक करीत आहेत. त्यांचे भवितव्य काय ते कोणीच सांगू शकत नाही. मुंबई-ठाण्यासारख्या शहरांत हजारो फ्लॅट्स विक्रीविना पडून आहेत, पण त्यांचे भाव काही खाली आल्याचे दिसत नाही. कारण यात बहुसंख्य गुंतवणूकदार परदेशी असावेत. त्यांना येथील मंदीशी देणेघेणे नाही.

अमेरिकेतील मंदी

29 ऑक्टोबर 1929 रोजी अमेरिकेतील वायदे बाजार कोसळला आणि तेथे एक भयानक मंदीची लाट आली, पण वर्षभर अगोदर तेव्हाचे अध्यक्ष हुवर यांनी अमेरिकन काँग्रेसला पाठविलेल्या संदेशात मात्र देशात आबादीआबाद असल्याचे म्हटले होते. तेच राजकीय वातावरण आज आपल्या देशातही आहे. इस्पितळे व राजकारण सोडले तर आपल्या देशात काहीच सुरू नाही. स्मशाने, कब्रस्तानेदेखील चोवीस तास सुरू आहेत. स्मशानांत लाकडांची टंचाई आहे व कब्रस्तानात जमीन कमी पडत आहे. हे आबादीआबाद असल्याचे लक्षण नाही.

मध्य प्रदेशातील ‘रेवा’ येथील एक घटना हेलावून टाकणारी आहे. सीमेवर कर्तव्य बजावणारा एक जवान आपल्या कोरोना पॉझिटिव्ह पत्नीला गाडीत ठेवून दहा तास फिरत होता, पण त्याला पत्नीसाठी ‘बेड’ मिळू शकला नाही. रस्त्यात दिसेल त्याच्याकडे तो मदतीची याचना करीत होता. तो रडून हात जोडून आपण जवान असल्याचे सांगत म्हणाला, ‘‘चार दिवसांपूर्वीच सीमेवरून सुट्टी घेऊन घरी आलो. बायको आजारी पडली. तिला कोरोना झालाय. कुणी बेड देत नाहीय. मी देशासाठी कश्मीरच्या बर्फात अनेकदा दुश्मनांच्या गोळय़ा अंगावर झेलल्या. आज बायकोच्या उपचारांसाठी वणवण भटकतोय!’’ त्या जवानाप्रमाणे वणवण भटकण्याची स्थिती सगळय़ांवरच ओढवली आहे.

काय करताय?

मंदीतून सावरण्यासाठी अर्थव्यवस्थेस उभारणी देण्यासाठी आपण नक्की काय करीत आहोत यावर देशाचे पंतप्रधान व अर्थमंत्री काहीच बोलायला तयार नाहीत. प. बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जी नक्कीच हरतील, असे श्री. मोदी सांगतात. हे काही कोसळणाऱया अर्थव्यवस्थेवरील ‘रेमडेसिवीर’ उपचार नव्हेत. महाराष्ट्राचे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळेल, असे श्री. अमित शहा म्हणतात. हासुद्धा मंदी व बेरोजगारीच्या प्रश्नावरचा उतारा नाही. देशाच्या अर्थमंत्री तर कुठेच दिसत नाहीत. अमेरिकेत मंदी असताना तेव्हाचे राज्यकर्ते आत्मसंतुष्ट होते, आत्मप्रौढीत मशगूल होते. 1930 च्या जूनमध्ये एक शिष्टमंडळ अध्यक्ष हुवर यांना भेटून परिस्थितीची कल्पना देण्यासाठी गेले.

पण हुवर त्यांना म्हणाले, ‘‘मित्रांनो! तुम्ही दोन महिने उशिरा आलात. कारण मंदी दोन महिन्यांपूर्वीच संपली!’’ वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती, पण राजकारणी लोकांना दोष का द्यावा? वायदे बाजार कोसळण्याच्या काही दिवस अगोदर सर्व आलबेल असल्याची ग्वाही हॉर्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्र्ाज्ञांच्या एका समितीने दिली होती. या अर्थशास्त्र्ाज्ञांना वायदे बाजार कोसळणार व आर्थिक मंदी येणार याची कल्पना नव्हती. पुढे त्यांची संस्था बंद पडली.

तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष हुवर हे जरी आत्मसंतुष्ट होते तरी त्यांचे विरोधक, जे फ्रँकलिन रुझवेल्ट, ते नव्हते. त्यांनी अध्यक्षीय निवडणूक लढवली आणि सरकारी खर्चात कपात, उत्पादन वाढ आणि बेकार, निराश्रित यांना सहाय्य असा कार्यक्रम मांडला. त्यांनी यावर निवडणूक जिंकली. अर्थात अमेरिकेच्या अर्थव्यवहाराला गती आणण्यासाठी त्यांना सरकारी खर्चात कपात न करता प्रचंड वाढ करावी लागली. मोठमोठी सार्वजनिक कामे त्यांनी हाती घेतली. त्यामुळे रोजगार वाढला, उत्पादन वाढले. प्रचंड धरणे, रस्ते, वीज उत्पादन ही कामे त्यांनी हाती घेतली. रुझवेल्ट यांनी अमेरिकेतील अत्यंत हुशार, लोकहितदक्ष अशा बुद्धिमान लोकांचे वर्तुळ स्वतःभोवती जमवले. त्यात मार्गेन्थॉ, लिविस डग्लस, हॅरी हॉपकिन्स यांसारखे होते.

आपला नवा आर्थिक कार्यक्रम रुझवेल्ट यांनी जाहीर केला. तेव्हा आठ दिवस अमेरिकेच्या बँका बंद होत्या. आठ दिवसांनी प्रे. रुझवेल्ट यांनी आकाशवाणीवरून त्यांची ‘मन की बात’ मांडून अमेरिकन नागरिकांशी हितगुज केले. पुढे त्यांचे हितगुज म्हणजे ‘मन की बात’ ही नित्याचीच बाब झाली. रुझवेल्ट यांच्या भाषणाची लोक वाट पाहू लागले. रुझवेल्ट यांचे भाषण होताच अमेरिकन लोकांत एकदम विश्वास निर्माण झाला. या भाषणानंतर पहिल्या तीन महिन्यांत सर्वच राष्ट्रीय बँकांनी, आर्थिक संस्थांनी जोरात उलाढाल सुरू केली. नवे सकारात्मक वातावरण निर्माण झाले. मरगळ व उदासीनता झटकली गेली. रुझवेल्ट यांनी दारूबंदीचा कडक कायदा ढिला करून प्रथम बीअर तयार करण्याची परवानगी अमेरिकन काँग्रेसकडून मिळवली.

लोकांना खात्री पटली की, प्रे. रुझवेल्ट यांचे सरकार हे केवळ गतिमान व पुरोगामीच नाही, तर आनंदी व आनंदवर्धक आहे. ‘जगा आणि जगू द्या’ पद्धतीचे आहे. दुःख विसरून कामास लागा, आनंदाची नवी क्षितिजे शोधा असे सांगणारे आहे. लोकांनी त्याचे प्रचंड स्वागत केले आणि आर्थिक मंदीचे रूपांतर अर्थव्यवस्था गतिमान होण्यात झाले. हे मी का सांगतोय? आपल्याला आजचे संकट दूर करण्यासाठी एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा.

कोणी काही म्हणा, प. बंगालच्या निवडणुका संपल्याने निदान पंतप्रधान मोदी यांनी आता रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून बाहेर पडून प्रे. रुझवेल्टच्या भूमिकेत शिरावे! देशाला त्याचीच गरज आहे. देशाला आता विश्वास आणि सकारात्मक ऊर्जेची गरज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महात्मा गांधी ‘हे’ तुमच्यासाठी ट्रेलर असतील, मात्र आमच्यासाठी ‘ते’ जीवन !

swarit

काँग्रेसकडुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना जुमला दिनाच्या शुभेच्छा

News Desk

मेहुल चोक्सी केवळ तब्येतीची कारणे देत कारवाईस विलंब करत आहे !

News Desk