मुंबई | राजधानी दिल्लीत सध्या प्रदूषण आणि कोरोनाची लाट आहे. गृहमंत्री अमित शाह कोरोनातून बाहेर पडले. काँग्रेसचे नेते अहमद पटेल हे गुरगावच्या मेदांता इस्पितळात कोरोनाशी झुंजत आहेत. राजधानीत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी मात्र कोरोनाचे राजकारण करीत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर केलेली टीका आणि राज्यातील राजकारणावरुन संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधील ‘रोखठोक’ या सदरातून भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. तसेच राज्यातील भाजप नेत्यांनी दिल्लीत येऊन परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे, असे मतही राऊत यांनी यावेळी मांडले.
काय लिहिले आहे रोखठोकमध्ये?
राजधानी दिल्लीत सध्या प्रदूषण आणि कोरोनाचीच लाट आहे. श्री. अमित शहा कोरोनातून बाहेर पडले. काँग्रेसचे नेते अहमद पटेल हे गुरगावच्या मेदांता इस्पितळात कोरोनाशी झुंजत आहेत. राजधानीत कोरोना वाढत आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढारी कोरोनाचे राजकारण करीत आहेत. त्यांनी दिल्लीत येऊन परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे. दिल्लीत थंडी आणि प्रदूषण वाढत आहे. प्रदूषणाची पातळी खाली घसरल्याने अनेक आजार भुताटकीसारखे नाचताना दिसत आहेत.
ही भुताटकी जी घेणी आहे. दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे, पण ही तिसरी लाट आहे असे जाणकार सांगतात. बुधवारी मी दिल्लीत होतो. त्या चोवीस तासांत कोरोनाचा स्फोट झालेला मी पाहिला. एका दिवसात साधारण साडेसात हजार कोरोना रुग्ण झाले. त्या चोवीस तासांत 150 म्हणजे सर्वाधिक मृत्यू झाले. हे सर्व का घडले, तर दिल्ली सरकारने सर्व काही उघडण्याची घाई केली. त्या फाजील आत्मविश्वासातून हे संकट वाढले. राजधानीत कोरोना संक्रमण वाढत असताना सरकार काय करत होते? ज्यांनी आपल्या आप्तांना या दहा दिवसांत गमावले त्यांना सरकार काय जवाब देणार? असा सवाल आता दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल सरकारला विचारला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल हे गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाशी झुंजत आहेत. त्यांचा समाचार घेण्यासाठी दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलात पोहोचलो. श्री. पटेल हे अतिदक्षता विभागात आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरचा तणाव मला स्पष्ट जाणवला. कोरोना कोणालाही सोडत नाही व तुम्ही कितीही मोठे असलात तरी कोणतीही शक्ती तुम्हाला वाचवत नाही. दिल्लीत पुन्हा ‘लॉक डाऊन’ची तयारी सुरू आहे. बाजार, दुकाने, सार्वजनिक स्थळे व प्रार्थनास्थळे पुन्हा बंद केली जातील. हे का घडले याचा विचार महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी करायला हवा. विरोध कशासाठी?
महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी सध्या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या विरोधासाठी विरोध करण्याच्या आहेत. पाच वर्षे ज्यांनी राज्याची निरंकुश सत्ता भोगली त्यांनी किमान नीतिनियमांचे भान ठेवायला हवे. मुंबईत छठपूजेला परवानगी द्यावी या मागणीसाठी भाजपवाले आंदोलन करीत होते. बिहारची निवडणूक भाजपने जिंकली हे खरे, पण मुंबईतील बिहारी जनतेस छठपूजेच्या वादात ओढण्याचे कारण नाही. छठपूजेसाठी समुद्रकिनारी एकाच वेळी हजारो लोक गोळा होतात व कोरोना संकटकाळात ते नियमबाह्य आहे.
छठपूजा 20 नोव्हेंबरला पार पडली, पण गर्दी जमवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांचा होताच. मुंबईत ज्यांनी छठपूजेसाठी आंदोलन केले त्यांनी इतर राज्यांत काय घडले ते पाहायला हवे. सार्वजनिक स्थळी छठपूजेला परवानगी देण्यास दिल्ली उच्च न्यायालयानेच बंदी घातली. दिल्लीतील यमुना घाटावर छठपूजेची परवानगी मिळावी व किमान एक हजार लोकांना तेथे जमा होण्यास परवानगी द्यावी, अशी याचिका जनसेवा ट्रस्टने दिल्ली उच्च न्यायालयात केली. दिल्ली हायकोर्टाने ही मागणी केराच्या टोपलीत फेकली. न्यायालयाने याचिका करणाऱयांना दम दिला, ‘‘कोविड-19’ची स्थिती किती गंभीर आहे याचे भान ठेवा.
दिल्ली सरकारने लग्न समारंभास पन्नासपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली ती योग्य आहे आणि तुम्ही छठपूजेसाठी एक हजार लोकांना परवानगी मागताय. हे शक्य नाही!’’ हे दिल्ली उच्च न्यायालयाचे फटकारे आहेत. भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. एखाद्या महत्त्वाच्या विषयावरील त्यांची भूमिका राष्ट्रीय हवी, पण तसे घडताना दिसत नाही. छठपूजा प्रामुख्याने बिहार पिंवा उत्तरेत केली जाते. मुंबईत हे लोण तसे अलीकडे आले. मुंबईत छठ पूजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी द्यावी अशी मागणी भाजपचे नेते करतात. पण गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेशातील भाजप सरकारने सार्वजनिक ठिकाणी छठ पूजेची परवानगी नाकारली हे महाराष्ट्रातील भाजप नेते कसे विसरतात? बिहारमधील बहुतेक सर्व जिल्हय़ांत तेथील प्रशासनाने आदेश काढले की, छठपूजा घरच्या घरीच करा.
सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आणलीच, पण नदीच्या घाटांवर पोलिसांनी घेराबंदी करून ठेवली. रस्त्यांवर वाहनांनी यानिमित्त गर्दी करू नये म्हणून कडक निर्बंध लादले. हे सर्व करताना भाजप हिंदुत्वविरोधी ठरत नाही, पण महाराष्ट्रात भाजपची भूमिका वेगळी.मुंबईतील भाजप नेते जुहू चौपाटीवर छठपूजेसाठी परवानगी मागत होते ते कोणत्या आधारावर? मुंबईत पुन्हा कोरोना वाढवून सरकारला बदनाम करायचे हे राजकारण त्यामागे आहे.
मात्र त्यात लोकांचे जीव जातात याचे भान ठेवले जात नाही. हे क्रौर्य आणि अमानुषता आहे. सरकारचे काही निर्णय मतभेदाचे विषय ठरू शकतात, पण प्रत्येक निर्णयाला विरोधच केला पाहिजे, प्रसंगी लोकांचे जीव गेले तरी चालतील हे धोरण घातक आहे! मंदिराचे राजकरण महाराष्ट्रात मंदिरे उघडा यासाठी जो गोंधळ घातला तो राजकीय होता. मंदिरे उघडण्याचा निर्णय घेत नाही, त्यामुळे ‘ठाकरे सरकार’ हिंदुत्वाच्या विरोधी असल्याची बोंब ठोकणे हे सरळ सरळ ढोंग आहे. हरयाणात भाजपचे सरकार आहे. तेथे शाळा उघडण्याचा निर्णय घेतला, पण 72 तासांत पाचशेहून जास्त विद्यार्थी व शिक्षक कोरोनाबाधित झाले.
बिहारात विजय मिळवला म्हणून कोरोनावरही विजय मिळवता येईल असे कोणाला वाटते काय? कोरोनाच्या लढाईशी जे हिंदुत्ववादाचा संबंध जोडत आहेत ते जनतेचे शत्रू आहेत. दिल्लीत पुन्हा लॉक डाऊन करण्याचा विचार सुरू आहे. महाराष्ट्रावर ही वेळ येऊ नये. भाजपसारख्या पक्षांची तशी इच्छा असेल तर ते राज्याचे दुर्दैव! पुन्हा देशाचे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा या विषयावर जाहीरपणे काहीच बोलायला तयार नाहीत. देशाच्या राजधानीत कोरोनाची लाट उसळली आहे व तेथे भाजपचे सरकार नाही म्हणून अक्षम्य दुर्लक्ष करायचे हे योग्य नाही. गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली म्हणून ते आधी गुरगावच्या मेदांता इस्पितळात दाखल झाले. तेथे त्यांना आराम पडला नाही म्हणून ते ‘एम्स’मध्ये दाखल झाले व बरे होऊन बाहेर पडले.
‘एम्स’सारख्या वैद्यकीय, वैज्ञानिक संस्थांची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली. पंडित नेहरूंनी वैद्यकीय, वैज्ञानिक, औद्योगिक, शैक्षणिक अशा संस्था उभ्या केल्या. पंडित नेहरूंच्या नावाने उभ्या असलेल्या दिल्लीतील विद्यापीठाचे नाव बदलायचे आता चालले आहे. हे खरे असेल तर ते हास्यास्पद ठरेल. ज्या संस्था आपण निर्माण केल्या नाहीत त्यांची नावे आपल्या सोयीने बदलण्यात कसला पुरुषार्थ? नवे घडवा, नवे उभारा. त्या नवनिर्मितीस तुम्हाला हवी ती नावे द्या. हा देश फक्त पाच-सहा वर्षांत निर्माण झाला नाही. जे सरकार वीर सावरकरांना भारतरत्न देऊ शकले नाही ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे नाव बदलण्याचा विचार करीत आहे.
खरे संकट कसले बिहार जिंकले, आता प. बंगाल जिंकायचे असे भाजपने ठरवले असेल तर तो त्यांचा प्रश्न, पण खरे संकट कोरोना, घसरलेल्या अर्थव्यवस्थेचे. त्यावर कधी विजय मिळवणार? दिल्लीवर कोरोनाने हल्ला केला आहे. त्याच दिल्लीत राष्ट्रपती व पंतप्रधान मोदी राहतात. त्यांच्या डोळय़ांसमोर लोकांचे बळी जात आहेत. एखाद्या राष्ट्रीय संदेशात स्वपक्षीयांना कोरोनाचे राजकारण थांबवा, एवढे पंतप्रधानांनी सांगितले तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल. भारतीय जनता पक्ष हा देशाचा सत्ताधारी पक्ष आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर आज कोणाचेही आव्हान नाही. देशाच्या राजधानीत कोणत्याही हालचाली नाहीत. प्रदूषण व कोरोनाने ती ग्रासली आहे. जेव्हा कोणतेही आव्हान नसते तेव्हा निसर्ग नवे आव्हान घेऊन उभा राहतो. त्याला कुठेतरी समतोल ठेवायचा असतो. देशात सध्या तेच वातावरण दिसत आहे!
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.