HW News Marathi
महाराष्ट्र

विरोधकांनो, निदान कोरोना संकटाबाबत तरी जरा जपून वागा! – सामना

मुंबई | कोरोना संकटावरुन विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोप करत आजच्या (२३ फेब्रुवारी) सामना अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. ‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, हे महाराष्ट्रातील विरोधकांनी समजून घेतले पाहिजे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

‘कोरोना’ चा धुमाकूळ पुन्हा सुरू झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. नव्हे, ती आता जाताना दिसत आहे. ‘ एम्स ‘ सारख्या सर्वोच्च वैद्यकीय संस्थांनी धोक्याची जाणीव करून दिली. ‘एम्स ‘ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, हे महाराष्ट्रातील विरोधकांनी समजून घेतले पाहिजे, असं म्हणत पुन्हा लॉकडाऊन टाळायचा असेल तर लोकांनी जबाबदारीने वागावे.

विरोधी पक्षांनीही जबाबदारीचे भान राखावे. विरोधकांनो, निदान कोरोना संकटाबाबत तरी जरा जपून वागा, बोला. राजकारण करायला उभा जन्म पडला आहे, पण कोरोनाने संधी दिली तर! तेव्हा काळजी घ्या! असा खोचक सल्लाही दिला आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट धडक मारते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. राज्यात गेल्या २४ तासांत सात हजारांवर नवे रुग्ण झाले. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, वर्धा जिह्यांत कोरोना वेगाने पसरतो आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांना समोर येऊन सगळ्यांनाच कडू औषधाचा डोस पाजावा लागला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, लोकांनी शिस्त, नियम पाळावेत. राज्यात ‘लॉक डाऊन’ लावायचे की नाही, याचा निर्णय पुढील आठवडय़ात घेऊ.

निर्बंध सैल केल्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. अशा प्रसंगी राजकारण न करता सरकार तसेच विरोधकांनी जनतेचे हित सांभाळावे, एकोप्याने काम करावे असे संकेत आहेत, पण मुख्यमंत्र्यांनी ‘लॉकडाऊन’बाबत इशारा देताच विरोधी पक्षनेते दरेकर यांनी वेगळेच टोकाचे विधान केले, ”राज्यात लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करू नका. जुलमी राजवटीसारखी कृती करू नका.” दरेकर यांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार वगैरे तज्ञ मंडळींना तरी समजला काय? कोरोना संसर्गाबाबत सत्यस्थिती समोर मांडणे याला काय दहशत पसरवणे म्हणायचे?

महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याची माहिती ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे ‘हर्ड इम्युनिटी’ मिळवणे आणखी कठीण असल्याची भीती डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केली. यापूर्वी कोरोनाच्या अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा केरोनाचे संक्रमण होण्याचा धोका असल्याचे डॉ. गुलेरिया सांगत आहेत.

कोरोनावरील लस ही नव्या स्ट्रेनविरोधात पुचकामी आहे हे जे डॉ. गुलेरिया तळमळीने सांगत आहेत, तो काय दहशत माजविण्याचा प्रकार आहे? ‘एम्स’चे संचालक देशाला गुमराह करीत आहेत, असे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन ‘एम्स’च्या दारात जोरदार आंदोलन केले पाहिजे. देशाचे आरोग्यमंत्रीच काय, पंतप्रधान, राष्ट्रपतींचे उंबरठे झिजवून निषेधाची पत्रे दिली पाहिजेत.

मुख्यमंत्री बोलत आहेत, लोकांना धोका समजावून सांगत आहेत म्हणून टीका करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी द्रोह करणे किंवा त्यांना कोरोनाच्या खाईत लोटण्यासारखे आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्याचे स्वागत विरोधकांनी का करू नये? जनता जेवढी सत्ताधारी पक्षाची असते तेवढी ती विरोधी पक्षांचीसुद्धा आहे. लॉक डाऊनमुळे लहान व्यापारी, नोकरदार वर्ग, हातावर पोट आहे अशांचे कंबरडे मोडणार हे नक्की. आर्थिक व्यवस्थाही कोसळणार आहेच. त्यासाठी मार्ग काढावा लागेल व केंद्राने त्याकामी मदत करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रासाठी एक-दोन हजार कोटींचं आर्थिक पॅकेज मिळावं, त्यासाठी भाजप नेत्यांनी दिल्लीत ठाणं मांडावं

महाराष्ट्रासारख्या राज्याला या कामी केंद्राकडून एखादे विशेष आर्थिक पॅकेज मिळायला हवे. असे आर्थिक पॅकेज मिळावे म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनीही मोदी यांच्याकडे तगादा लावला तरी आमची हरकत नाही. राज्यातील विरोधी पक्ष हा काही पाकिस्तानी किंवा अफगाणी वंशाचा नाही. तो याच मातीतला आहे.

त्यामुळे चंद्रकांतदादा, देवेंद्र फडणवीस, दरेकर, आशिष शेलार वगैरे मंडळींनी दिल्लीतच ठाण मांडून बसावे व राज्याच्या वतीने एक-दोन हजार कोटींच्या पॅकेजसाठी लढत राहावे. राज्यातून देशाला जो मोठा महसूल मिळतो, त्यातला पुरेसा परतावा महाराष्ट्राला मिळाला तर विरोधी पक्षाला सरकारकडून जे करून घ्यायचे आहे, त्याचा मार्ग मोकळा होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नव्या कोरोनाला रोखण्यासाठी सामनातून केंद्र सरकारला सल्ला!

News Desk

ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी २ लाखापर्यंत, जाणून घ्या काय आहे ‘अध्यादेश’

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड भाजपमध्ये करणार प्रवेश ?

News Desk