मुंबई | पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. काल (२३ फेब्रुवारी) शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राठोड यांच्याबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं. संजय राठोड यांच्यावरील आरोपांचा परिणाम मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याचं पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राठोड यांनी काल पोहरादेवीला भेट दिली. त्यावेळी तिथे हजारो लोक उपस्थित होते. राठोड यांच्याकडून करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनावर मुख्यमंत्रीदेखील नाराज असल्याचं समजतं.
पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा – मुख्यमंत्र्यांचे आदेश
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणी ज्यांचे नाव सुरुवातीपासूनच अडचणीत आले आहे ते शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे काल (२३ फेब्रुवारी) माध्यमांसमोर आले. यावेळी, राठोड यांच्या समर्थकांनी वाशिममधील पोहरादेवी येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोरोनाच्या पुन्हा वाढणाऱ्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतेच काही नियम आणि निर्बंध कडक करूनही, सूचना करूनही पोहरादेवी येथे या सगळ्या नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारची आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. “कोरोनाच्या काळात अशा रितीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर, संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी”, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.