HW News Marathi
Covid-19

शरद पवारांनी घेतला पुढाकार ! ऑक्सिजन टंचाईची समस्या सोडवण्यासाठी ‘या’ सूचना

मुंबई | राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. एकीकडे सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा आहे तर दुसरीकडे कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेचे आव्हान आहे. त्यातच राज्य सध्या ऑक्सिजन तुटवड्याच्या अत्यंत गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. याच समस्येवर मार्ग काढण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी आता राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची प्रमुख संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून शरद पवारांच्या आदेशानुसार एक पत्र राज्यातील १९० साखर कारखान्यांना पाठवण्यात आले आहे. त्याचसोबत जे साखर कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

शरद पवारांच्या आदेशानुसार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने पाठवलेल्या पत्रातील मजकूर

आपणा सर्वांना माहितच आहे की सध्या कोविडच्या दुस-या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे व कोविड पेशंटला ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. यापूर्वी प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व साखर कारखान्यांनी भरीव मदत व सहकार्य केलेले आहे.

सद्य परिस्थिती लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी असे निर्देशित केले आहे की ज्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप चालू आहे व तसेच ज्यांचे सहविजनिर्मिती व आसवणी प्रकल्प कार्यरत आहेत अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी व ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपलेला आहे अशा कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी ऑक्सिजन किटचा पुरवठा रुग्णांना अथवा कोविड सेंटरला करावा. तसेच कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत व त्यासाठी कारखान्यांनी सध्याची साधनसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करता येईल.

ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करावयाचे झाल्यास त्यासाठी वाफ व वीजेची गरज भासते. साखर कारखान्यांमध्ये वाफ आणि वीज ही कारखाना चालू असताना उपलब्ध होऊ शकते. म्हणून कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारणी हाती घ्यावेत व त्याकरिता कारखान्यांना उपलब्ध साधनसामुग्री व मनुष्यबळ याचा उपयोग करता येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्चसुध्दा कमी होईल.

सध्याची कोविडची परिस्थिती ही भयावह असून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत आहे. राज्य शासन व केंद्र शासन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेतच, तथापि आपल्या सर्व साखर कारखान्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन उपलब्ध साधनसामुग्री, मनुष्यबळ व गरज भासल्यास आवश्यक ते भांडवल घालून ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. कारखान्यांना आसवणी प्रकल्पामध्ये इथेनॉल शुध्द करण्याचा आणि कार्बनडायऑक्साईड वेगळा करण्याचा अनुभव आहे. याठिकाणी फक्त ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारण्याचे आहे. या संदर्भात व्हॅक्युम प्रेशर स्वींग अॅडसॉर्पशन प्रोसेसची माहिती घेऊन यापुढे त्वरीत कार्यवाही करावी, अशी नम्र विनंती आहे. या अनुषंगाने सर्व कारखाने आपल्या कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा करतील याची खात्री आहे. कळावे,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमोल कोल्हेंनी रेमेडेसिविर मिळत नसल्यास सांगितली पर्यायी औषधाची नावे!

News Desk

बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेतून २२ मृतदेहांची वाहतूक ! पंकजा मुंडेंना संताप अनावर

News Desk

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊच नयेत; प्रक्रिया रद्द करून नव्याने निवडणुका घ्या

Aprna