मुंबई | राज्याच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यात शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा मुनगंटीवारांनी अजित पवारांना लक्ष्य केले आहे. मागच्या वर्षांत विरोधकांच्या कुंडल्या बघणारे आणि गेल्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केले होते.
भाजपच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असं भाकित केलं होते. तसेच, भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसची काही नेतेमंडळी वर्षभर करताना दिसत आहेत. या मुद्द्यावरूनच भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना एक आव्हान दिलं आहे.
भाजपचे जे आमदार राष्ट्रवादीमध्ये येतील, त्यांना पोटनिवडणुकीत जिंकवण्यासाठी तीन पक्ष मिळून एकच उमेदवार देऊ आणि भाजपाचा पराभव करू, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. याबाबत टीव्ही ९शी बोलताना मुनगंटीवार म्हणाले,”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनेकदा सांगतात की भाजपाचे २० ते २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. तुमच्या सरकारला आता सत्तेवर येऊन १२ महिने झाले. तुम्ही अद्याप भाजपचा एकही आमदार फोडू शकला नाहीत. तुमच्यात जर ताकद असेल तर तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही दगडावर कितीही डोकं आपटलं, तरी भाजपचा एकही आमदार फोडणं तुम्हाला जमायचं नाही”, असं थेट आव्हान त्यांनी अजित पवारांना दिलं.
“भाजपाचे २० आमदार आमच्या पक्षात येणार असं काही लोकं सांगतात. २० तर सोडाच, पण १२ महिन्याचे १२ आमदारही तुम्हाला फोडता आले नाहीत. आम्ही लिहून देतो की आमचे जे आमदार तुमच्या पक्षात यायला तयार असतील, त्या आमदारांची आणि तुमची मिटींग आम्हीच घडवून देतो. तुम्हाला तुमच्या बळावर खूप विश्वास असला तरी आम्हाला आमच्या विचारांवर आणि निष्ठेवर पूर्ण विश्वास आहे”, असेही मुनगंटीवार म्हणाले.
काय म्हणाले होते अजित पवार?
विधिमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनात काही मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधी पक्ष चांगलेच भिडल्याचे चित्र आहे. आज दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशीही वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. त्यात सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातली जुगलबंदी चर्चेचा विषय ठरली. त्याचं झालं असं पुरवणी मागण्यांवर आज विधानसभेत चर्चा सुरु होती. त्यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार आपले मुद्दे ठेवत असताना कुणीतरी एक सदस्य मध्येच बोलण्यासाठी उभा राहिला. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, असं म्हटलं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना मी तुमचं आव्हान मी स्वीकारतो मला पाडून दाखवा, असं थेट आव्हान दिलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.