HW News Marathi
महाराष्ट्र

फसव्या सरकारचे ‘काउन्ट डाऊन’ सुरु

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला धनंजय मुंडे यांचा इशारा

मुंबई | संपूर्ण राज्यात आम्हाला कर्जमाफीचा एकही लाभार्थी दिसला नाही. अधिवेशनाच्या तोंडावर काढलेला बोंडअळीच्या मदतीचा जीआर फसवा आहे. शेतीमालाला हमीभाव नाही, प्रकल्पग्रस्तांना भरपाई नाही, ‘मेक इन्‌ महाराष्ट्र’,’मॅग्नेटीक महाराष्ट्रा’तून हाती काही लागलं नाही. रोजगारनिर्मितीसंदर्भातील दावे फसवे आहेत. पोलिस भरती, एमपीएससी परीक्षा, मराठा, धनगर आरक्षण अशा सगळ्याच मुद्यांवर सरकारने जनतेला फसवलं असून सरकारनं आता स्वत:चीच फसवणूक सुरु केली आहे. या फसव्या सरकारचे दिवस भरले असून त्यांची उलटीगिनती सुरु झाली आहे, असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला’युवर काउंड डाऊन बिगिन्ड्‌ नाऊ’ असा इशाराच दिला.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित विरोधी पक्षनेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत संवाद साधताना श्री. धनंजय मुंडे यांनी सरकारच्या खोटारडेपणाचे अक्षरश: वाभाडे काढले. अधिवेशनाच्या तोंडावर बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसंदर्भात काढलेल्या जीआरमध्ये नवीन काहीच नसून वर्ष २०१५ मध्ये काढलेल्या जीआरचीच ती पूनरावृत्ती असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. सरकारने सातत्याने जनतेची फसवणूक चालवली आहे, असे ते म्हणाले. राज्यातल्या फसव्या, विश्वासघातकी, शेतकरीद्वेष्ट्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर संपूर्ण विरोधी पक्ष बहिष्कार टाकत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

श्री. मुंडे पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून आम्ही अवघा महाराष्ट्र फिरलो. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आक्रोष पाहिला. शेतकऱ्याच्या घरापासून बांधापर्यंत गेलो. परंतु कर्जमाफीचा एकही लाभार्थी आम्हाला मिळाला नाही. दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस, बोंडअळीच्या नुकसानग्रस्तांना सरकारकडून मदत मिळालेली नाही. राज्यातील युवकांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. आर. आर. आबा गृहमंत्री असताना दरवर्षी १० ते १२ हजार पोलिसांची भरती होत होती. आता पोलिसभरती जवळपास बंद आहे. एमपीएसच्या परीक्षा रखडल्या आहेत. राज्यातल्या रोजगार केंद्रात 37 लाख बेरोजगारांची नोंदणी आहे आणि मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून सरकारही 37 लाख नोकऱ्या निर्माण होणार असल्याचा दावा फसवा आहे, तसं घडलं तर राज्यात एकही बेरोजगार राहणार नाही, परंतु सरकारच्या दावाच फसला असल्यानं ते शक्य नसल्याचं श्री. मुंडे यांनी लक्षात आणून दिलं.

राज्यात आम्हाला शेतकरी कर्जमाफीचा एकही लाभार्थी सापडला नाही. कर्जमाफी फसवी आहे, असा आमचा दावा असून याबाबतीत मुख्यमंत्री सत्य सांगणार का ? हा आमचा प्रश्न आहे, असे श्री. मुंडे म्हणाले.

मंत्रालयात आत्महत्या केलेल्या श्री. धर्मा पाटील यांच्या कुटुंबाला एका महिन्यात सुधारीत दराने भरपाई देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु त्यासंदर्भातली कार्यवाही एक टक्काही पुढे सरकलेली नाही. ही वस्तूस्थिती जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आल्याचे श्री. धर्मा पाटील यांचे चिरंजीव श्री. नरेंद्र पाटील यांनी आज सकाळी आपल्याला सांगितल्याचे, श्री. मुंडे म्हणाले. शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर आश्वासन देऊनही सरकार जनतेची फसवणूक करणार असेल तर या सरकारचे ‘काउन्ट डाऊन’ सुरु झाले आहे, हे लक्षात घ्या, असे श्री. मुंडे म्हणाले.

शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सरकार सत्तेवर आलं, परंतु सरकारने १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली नाही की, महाराजांना अभिवादन करणारी एकही जाहीरात प्रसिद्ध केली नाही. आदल्या दिवशी पंतप्रधान मोदींच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींच्या जाहिराती प्रत्येक पेपरमध्ये छापण्यात आल्या होत्या याकडे त्यांनी लक्ष वेधले. भाजपचा एक लोकप्रतिनधी शिवाजी महाराजांबद्दल अभद्र वक्तव्यं करतो, परंतु मुख्यमंत्री फडणवीस त्याबद्दल माफी मागत नाहीत, ही सत्तेची मस्ती आहे, अशी टीकाही श्री. मुंडे यांनी केली.

केंद्र सरकारच्या कारभारावरही त्यांनी टीका केली. पंजाब नॅशनल बँकेत झालेला नीरव मोदीचा साडेअकरा कोटींचा घोटाळा आणि राष्ट्रीय बँकातले पैसे लुटून आरोपींचं देशाबाहेर होत असलेलं पलायन हे केंद्र सरकारच्या आश्वासनांचा पोकळपणा उघड करणारं असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात त्यांनी एक शेरही ऐकवला. ते म्हणाले…

तेरे वादो ने हमे घर से निकलने दिया

और लोग मौसम का मजा लेके भाग भी गये”

राज्य सरकारच्या फसवणूकीचा, तसंच भ्रष्ट कारभाराचा आपण या अधिवेशनेता पर्दाफाश करु तसंच सामान्य जनतेसाठी रस्त्यावर लढत असलेला संघर्ष सभागृहातही बुलंद करुन असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

  • अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनाबद्दल श्री. मुंडे यांनी तीव्र शोक व्यक्त केला. श्रीदेवी यांच्या निधनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी श्रेष्ठ अभिनेत्री, नृत्यांगणा काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यांच्या चित्रपट व अभिनय कौशल्याच्या माध्यमातून त्या कायम स्मरणात राहतील, अशा शब्दात श्री. मुंडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रायगडमधील एसटी बसमध्ये आयईडी बॉम्ब, जिल्ह्यात हायअलर्ट जारी

News Desk

मनसे नगरसेवकाने फोडली पुणे महापालिकेच्या उपायुक्तांची गाडी

News Desk

राज्यसभेच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी संभाजीराजेंचे राज्यातील सर्व आमदारांना भावनिक पत्र

Aprna