HW News Marathi
महाराष्ट्र

जैव सुरक्षा प्रयोगशाळेतील संशोधन आणि लस महत्त्वाची भूमिका बजावेल! – अजित पवार

पुणे | शेतकऱ्यांना पशुधनापासून मिळणारे उत्पादन वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्नवाढ करुन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात जैव सुरक्षा प्रयोगशाळेतील संशोधन आणि कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळेत निर्मित होणारी लस महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

औंध येथे पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे राज्यात पशुरोग निदानासाठी राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या जैव सुरक्षा स्तर २ आणि ३ प्रयोगशाळा उभारणी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळेच्या नवीन इमारत संकुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार, पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते, अतुल बेनके, प्रधान सचिव जगदीश गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंन्द्र प्रताप सिंह, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नवनाथ होले, सहआयुक्त डॉ. विनायक लिमये, अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे उपस्थित होते.

 पवार म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीमुळेच कोरोनाची तिसरी लाट आपण बऱ्यापैकी थोपवू शकलो. माणसाला कोरोना, पोलिओसारख्या रोगांपासून वाचवण्यात, प्रतिबंधक लशींनी जी भूमिका बजावली, त्याच धर्तीवर लशींचे संशोधन, उत्पादन व वापर करुन येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे पशुधन रोगांपासून वाचवायचे आहे. पशुधन क्षेत्रातल्या वाढीसाठी जनावरांतल्या सांसर्गिक रोगावर नियंत्रण आवश्यक आहे. पशुधन, पाळीव प्राणी आणि वन्यजीवांपासून अनेक रोग माणसात संक्रमित होत असतात. पशु लसीकरणाचे महत्व अधिक आहे. लसीकरणामुळे या रोगाचा प्रतिबंध करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जनावरे आणि कोंबड्यांचे आरोग्य तसेच दूध, अंडी आणि मांसांच्या उत्पादन वाढीकरिता लसीकरणाचा मोठा उपयोग होतो. जागतिक कृषि संस्थेच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अभ्यासकांच्या निष्कर्षानुसार वाढत्या लोकसंख्येच्या अन्नविषयक गरजा भागविण्यासाठी २०५० पर्यंत अन्न उत्पादनात ७० टक्के वाढ आवश्यक आहे. यामध्ये प्राणीजन्य पदार्थांचा वाटा मोठा असून लसीकरणाशिवाय ही उत्पादनवाढ अशक्य आहे.

दूधाचे आणि दूग्धजन्य पदार्थांचे उत्पन्न वाढविण्यासाठी चांगल्या दुधाळ जातीच्या, चांगल्या वंशांच्या जनावरांचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्यामार्फत ब्राझीलमधून शुद्ध गीर वंशाचे १० वळू जागतिक निविदा काढून खरेदी करण्यात येणार असून यामाध्यमातून राज्यात शुद्ध गीर प्रजातीची पैदास करण्यात येणार आहे. त्यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार असल्याचा उल्लेखही पवार यांनी केला. तसेच पशुसंवर्धन विभागासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही ते म्हणाले.

पशुसंवर्धन मंत्री केदार म्हणाले, एव्हीएनएन्फ्लूएन्झा, ब्रुसेलोसिस, रेबीज इत्यादी आणि सीसीएचएफसारख्या प्राण्यांपासून माणसाला होणाऱ्या आजारांचे निदान करण्यासाठी बीएसएल 3 ची सुविधा आवश्यक आहे. प्रयोगशाळेच्या निर्मितीचा ७५ कोटी रुपयांचा प्रकल्प आरकेव्हीवाय अंतर्गत हाती घेण्यात आला आहे. शेतकऱ्याला आणि शेतीशी निगडीत काम करणाऱ्यांना पशूपालन हा उत्पन्नाचा शाश्वत मार्ग आहे. मात्र पशुआरोग्य हा पशुधन व्यवसायाचा मुख्य कणा आहे.

रोगांच्या प्रादुर्भावामुळे पशुधनाच्या आरोग्यावर, उत्पादनावर परिणाम होतो. पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याचे रक्षण तसेच त्यांच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी आवश्यक ठरते. जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष देताना, त्यांचे वेळेत लसीकरण करुन घेतले पाहिजे. त्यासाठी ही प्रयोगशाळा महत्त्वाची ठरणार असल्याचे  केदार म्हणाले.

राज्यमंत्री भरणे म्हणाले, जैव सुरक्षा स्तर दर्जाच्या प्रयोगशाळांची उपलब्धता झाल्याने पशुरोगाचे नेमके व अचूक निदान तातडीने करणे शक्य होणार आहे. रोग निदान वेळेत केल्याने बाधीत पशुधनास वेळेत उपचार मिळतील आणि रोग प्रसारावर वेळेत नियंत्रण मिळवून पशुपालकाचे संभाव्य आर्थिक नुकसान टळणार आहे. प्रयोगशाळा शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरेल, असे त्यांनी सांगितले. प्रधान सचिव गुप्ता म्हणाले, पशुसंवर्धन विभाग लस उत्पादनात सक्षम होत असून या प्रयोगशाळाच्या उभारणीमुळे कुक्कुट व शेळ्या-मेंढ्याच्या लस उत्पादनाची क्षमता ५ पटीने वाढणार आहे. उत्पादन क्षमतेमधील होणाऱ्या वाढीमुळे राज्याची लसींची गरज अतिरिक्त लस राज्याबाहेर विक्रीसाठी उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. आयुक्त सचिंन्द्र प्रताप सिंह यांनी प्रास्ताविकात प्रयोगशाळेबाबत माहिती दिली. यावेळी पशुपालक, शेतकरी तसेच अधिकारी उपस्थित होते.

पशुरोगाचे नेमके व अचूक निदान तातडीने होणार

जैव सुरक्षा स्तर दर्जाच्या प्रयोगशाळांची उपलब्धता झाल्याने राष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळांना ब्रुसेल्लॉसिस, लाळखुरकुत, एव्हियन इन्फलुएंजा, रेबीज आदींचे रोग नमुने निदानासाठी पाठवता येणार आहे. प्रयोगशाळेतील अद्ययावत उपकरणामुळे पशुरोगाचे नेमके व अचूक निदान तातडीने करणे शक्य होणार आहे. रोग निदान वेळेत केल्याने बाधीत पशुधनास वेळेत उपचार मिळतील आणि रोग प्रसारावर वेळेत नियंत्रण मिळवून पशुपालकाचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळावयास मदत मिळेल.

कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळा

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ६१ कोटी २८ लाख रुपयाची तरतूद उपलब्ध करून पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेत आदर्श उत्पादन पद्धतीच्या मानकांचा (जी.एम.पी.) अवलंब करुन कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळांची टर्न की आधारावर उभारणी करण्यात आली आहे. प्रयोगशाळेतील सर्व कामकाज हे बिल्डींग मॅनेजमेंट सिस्टीम या केंद्रीय संगणक प्रणालीद्वारे नियंत्रित करण्याची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. कुक्कुट पक्ष्यातील मानमोडी, लासोटा, कोंबड्याची देवी, मरेक्स या तर शेळ्या-मेंढ्यातील देवी व पीपीआर या रोग देवी प्रतिबंधात्मक लसीचे उत्पादन घेण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबाद प्राणीसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा, उद्धव ठाकरेंच्या सूचना!

News Desk

रिद्धपूरच्या विकासासाठी प्रयत्न करणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

रवी राणांबाबत ठोस भूमिका घ्या अन्यथा… बच्चू कडूंचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा

Chetan Kirdat