HW News Marathi
महाराष्ट्र

रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी नागपूर ‘आयआयएम’ ही योग्य परिसंस्था ठरेल! – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

नागपूर |  नाविन्यता (इनोव्हेशन) आणि उद्योजकता या दोन्हींमध्ये आपले जीवन सुखकर करण्यासोबतच रोजगार उपलब्ध करुन देण्याचीही क्षमता आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) ही रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अशी परिसंस्था ठरेल, असा विश्वास देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (८ मे) येथे व्यक्त केला. शहरातील मिहान परिसरात भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) कॅम्पसचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने यांच्यासह नागपूर आयआयएमच्या संचलन मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी आणि संस्थेचे संचालक डॉ. भीमराय मैत्री यावेळी उपस्थित होते.

नाविन्यपूर्ण संशोधन आणि उद्यमशीलतेला मोठे प्रोत्साहन लाभत असलेल्या काळात विविध स्टार्ट-अप्सनी नवा इतिहास घडविल्याचा उल्लेख करुन राष्ट्रपती म्हणाले, विविध नवीन क्षेत्रे व्यावसायिकतेच्या परिघात येत चालली असून त्यातून अनेक नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. स्टार्ट-अप्स आणि अॅपवर आधारित उद्योगांनी अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य अशा काही महत्वाच्या क्षेत्रात हे नवीन उपक्रम सुरु झाले आहेत. त्यातून रोजगार निर्मितीसोबतच महसूल प्राप्ती होणार असल्याने हा बदल देशासाठी निश्चितच ‘गेम चेंजर’ ठरु शकतो.

नागपूर आयआयएमच्या अद्ययावत आणि विविध वैशिष्ट्यांनी समाविष्ट परिसराच्या उभारणीबाबत प्रशंसोद्गार काढून राष्ट्रपती म्हणाले, येथील स्थानिक संस्कृती आणि इतिहास या वास्तुतून परिपूर्णतेने प्रतिबिंबित होत असून तिच्यातून पर्यावरणाप्रती बांधिलकीही दिसून येते. महाराष्ट्राची भूमी ही नेहमीच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टीकोनातून महत्वाची राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीत सामाजिक क्रांतीची बीजे रोवली. अशा भूमीतील संस्थेने केवळ अध्ययन केंद्र न राहता जीवनदायी अनुभव देणारे केंद्र ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त करून या संस्थेच्या सेंटर फॉर एक्सलन्स, नागपूर फाउंडेशन फॉर इंटरप्रूनरशिप डेव्हलपमेंट, सॅटेलाईट कॅम्पस, रिजनल इनोव्हेशन ऑर्गनायझर या उपक्रमांचा राष्ट्रपतींनी विशेष उल्लेख केला. हे उपक्रम आत्मनिर्भर भारतासाठी मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

जगभरात आपल्या कर्तृत्वासाठी नवी क्षितिजे शोधताना आपल्या भूमीतील मुल्यांचा विसर पडू देवू नका, असे आवाहन करून नागपूर आयआयएमचा परिसर हा नव्या जगातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी तरुण मनांचे योग्य पद्धतीने संगोपन करेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. आयएएमच्या माध्यमातून एक जागतिक दर्जाची वास्तु शहरात निर्माण झाली असून नागपूर हे एज्युकेशन हब म्हणून विकसित होत असल्याचा अभिमानास्पद उल्लेख करून  गडकरी म्हणाले, मेडिकल तसेच लॉजिस्टिक हब म्हणूनही नागपूर विकसित होत आहे. विदर्भातील समृद्ध वने व खनिजसंपदा यावर आधारित उद्योगांना मोठ्या प्रमाणात संधी आहे. उद्योगांच्या विकासासाठी या संस्थेने संयुक्तपणे उपक्रम राबविल्यास या भागाचा विकास होणार आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून या संस्थेचा निश्चितच नावलौकिक वाढेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पाश्चिमात्यांच्या तुलनेत स्थानिक शिक्षणप्रणालीला महत्त्व देणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी भारताच्या एका प्रमुख संस्थेच्या कॅम्पसचे लोकार्पण होत असल्याचा आनंद व्यक्त करून प्रधान म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या ज्ञान, अर्थ आणि नितीला अनुसरून या संस्थेची वाटचाल असावी. तसेच या संस्थेने गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील शाळा, महाविद्यालयांच्या विकासाचे माध्यम व्हावे. विभागातील छोटे उद्योग, तसेच रस्त्यावरील व्यावसायिकांसाठी आयआयएमने पुढाकार घेवून व्यवसाय सुलभतेचे मॉडेल तयार करावे, असे आवाहन त्यांनी केले.

नागपूर आयआयएम संस्थेतून बुद्धिमान विद्यार्थी व साहसी उद्योजक निर्माण होतील, असा आत्मविश्वास व्यक्त करताना श्री. देसाई म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी विदर्भाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्या दिशेने आज एक महत्वाचे पाऊल पडत आहे. या संस्थेने अनेक आंतरराष्ट्रीय संस्थेशी भागीदारी केली असून विविध देशातील संस्था या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांना आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण मिळत आहे. ही संस्था नागपूरसह राज्यासाठी महत्त्वपूर्ण असल्यामुळे या संस्थेच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे संपूर्ण सहकार्य देण्यात येणार आहे.

विक्रमी वेळेत हे काम पूर्ण झाल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त करून फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक दर्जाचे कौशल्ययुक्त मनुष्यबळ मिळावे, यासाठी व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा विस्तार करण्याची सुरुवात केली आहे. कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्माण करण्याची ही प्रक्रिया असून नागपुरात उभी राहिलेली वास्तू ‘स्टेट ऑफ आर्ट दर्जाची ‘ असून नवीन भारताचे स्वप्न साकारणारी आहे, असे गौरवोद्गार काढले. प्रशिक्षित मनुष्यबळ असेल तेथेच उद्योग येतात. त्यामुळे या परिसरात जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरु झाल्याने उद्योजकतेचा विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतीय व्यवस्थापन संस्थेचे संचालन करणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष सी.पी. गुरुनानी यांनी प्रास्ताविक केले. या संस्थेच्या माध्यमातून नाविन्याची, संशोधनाची जिद्दी असणारी पिढी निर्माण करण्याची आमची मोहीम असून जागतिक दर्जाचे कॅम्पस निर्माण करू शकल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी, राष्ट्रपतींनी भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या सुसज्ज अशा इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करून उद्घाटन केले. त्यानंतर 132 एकर क्षेत्रावर विकसित करण्यात आलेल्या परिसराची पाहणी केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रपती यांना स्मृतिचिन्ह देवून स्वागत केले. संचलन समितीचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी व संचालक डॉ. भीमराय मैत्री यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PandharpurElection : पंढरपूरमध्ये पोस्टल मतांची मोजणी सुरु, राष्ट्रवादी की भाजप कोण बाजी मारणार?

News Desk

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंंत सांकेलीम मतदारसंघातून 300 मतांनी आघाडीवर

Aprna

९वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

News Desk