मुंबई । यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याच अनेक दिग्गज नेत्यांमध्ये एक होते ते तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील. मात्र, आता भाजप आमदार आणि माजी मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप सोडण्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच भाजपला राम राम ठोकून राज्याच्या महाविकासआघाडी सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र, या चर्चा रंगण्याला कारणही तसेच आहे.
श्रीरामपूर येथे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनाला जिल्ह्यातील किंवा राज्यातील एकही भाजप नेता उपस्थित नसल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे, या जनसंपर्क कार्यालयाच्या फ्लेक्सने येथील उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या फ्लेक्स बोर्डवर भाजपची निशाणी तसेच भाजपच्या कोणत्याही नेत्याचे नाव टाकणे पूर्णपणे टाळले गेले आहे. या बोर्डवर भाजपचा उल्लेखच टाळण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुढचे राजकीय पाऊल काय ? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी जर भाजपची साथ सोडून महाविकासआघाडी सामील होण्याचा निर्णय घेतला तर ते नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. पुन्हा काँग्रेसमध्ये गेल्यास त्यांना योग्य तो मानसन्मान पुन्हा मिळण्याबाबत शंका आहे तर दुसरीकडे शरद पवारांशी असलेले विखेंचे संबंध फारसे चांगले नाहीत. मात्र, शिवसेनेचा पर्याय विखेंसाठी खुला आहे. कारण, काँग्रेसच्याही आधी विखे शिवसेनेत होते. त्याचप्रमाणे, राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे सध्या भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे, आता केंद्रात असलेल्या सुजय विखेंचा विचार करून राधाकृष्ण विखे पाटील नेमका काय निर्णय घेतात ? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.