HW News Marathi
महाराष्ट्र

“अटक होणं म्हणजे काय हे समजण्यासाठी ‘लाचखोर’ असावं लागतं”, चाकणकरांचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

मुंबई | कोरोनाचं संकट सुरु असूनही राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तोफ डागत आहेत. पुन्हा एकदा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आमने-सामने आल्या आहेत. पुन्हा एकदा या दोघींमध्ये ट्विट वॉर सुरु झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची रुपाली चाकणकरांची मागणी म्हणजे अटक मटक चवळी चटकं वाटलं का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला होता. त्याला आता रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

बरोबर आहे, अटक होणं सोपं नसतं. अटक होणे म्हणजे काय हे समजण्यासाठी लाचखोर असावं लागतं. पैसे खाल्यानंतर अटक टाळण्यासाठी पक्ष बदलावा लागतो. ज्यांनी आपल्याला समाजात मानाचं स्थान दिलं त्यांच्यावर भर सभेत टीका करावी लागते. यासाठी दगडाचं काळीज असावं लागतं. खरचं अटकं होणं सोपं नसतं.

 

चित्रा वाघ यांनी काय ट्विट केले होते?

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत असं म्हटलंय की, उठले की निघाले आरोप करायला, आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीसांना अटक करा. अटक मटक चवळी चटक वाटलं की काय? रेमडेसिवीर राज्य सरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CS साहेबांशी बोलणं झालेलं..माहिती तर घ्यायची. आधी सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे अशा कठोर शब्दांत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या टीकेचा समाचार घेतला.

तसेच एकाबाजूला राजकारण करू नका हे विरोधी पक्षाला सांगायचं व दुसरीकडे आपलं अपयश लपवण्यासाठी कांगावा करायचा. रोज माणसं तडफडून मरत आहेत. रेमडेसिवीर अभावी देवेंद्र फडणवीस यांनी ब्रूक फार्मा कंपनीला विनंती करत नियमाने FDA ची परवानगी घेत आणण्याचा प्रयत्न केला तर कंपनीच्या माणसांनाच पोलीस उचलतात.

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या होत्या?

रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशनवर जाऊन सरकारी कामात अडथळा आणला त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले होते.

या आधीही रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात ट्विट वॉर रंगलेले पाहायला मिळाले होते. अनिल देशमुखांचा मुद्दा असो किंवा चित्रा वाघ यांनी नवे गृहमंत्र दिलीप वळसे-पाटील यांना दिलेल्या शुभेच्छा असो. रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना डिवचले होते आणि चित्रा वाघ यांनीही त्यांचा खरपूस समाचार घेतला होता. आता पुन्हा एकदा या जुन्या मैत्रिणींचा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. आता रुपाली चाकणकर काही पलटवार करणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा शुभारंभ शरद पवारांच्या हस्ते…

News Desk

शरद पवारांनी गोपिनाथ मुंडेंना भाजप ‘न’ सोडण्याचा सल्ला दिला होता !

Arati More

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम, लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश

News Desk