HW News Marathi
Covid-19

आता ‘ब्रेक द चेन’ ! कोरोनाला थोपविण्यासाठी ठाकरे सरकारचे कडक निर्बंध

मुंबई । कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.

या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले. यापुढे या आदेशांना ‘मिशन बिगीन अगेन’ऐवजी ‘ब्रेक दि चेन’ असे संबोधण्यात येईल.

यातील कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे:

शेतीविषयक कामे सुरु

शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.

रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी

राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.

बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते

आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु

किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे

सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच

सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.

सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.

बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.

वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद

खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील

शासकीय कार्यालये- ५० टक्के उपस्थितीत

शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील

शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना वैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल

मनोरंजन, सलून्स बंद

मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.

प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी बंद

सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील

खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वात पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करता येईल

ई कॉमर्स सेवा सुरु

ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबधीत दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल

सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर करावे

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे

शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र 10 व १२ परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.

चित्रीकरण सुरु ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 10 एप्रिलपासून याची अमलबजावणी होईल.

आजारी कामगाराला काढता येणार नाही

बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे

…तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट

5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार , बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंता वाढली ! राज्यात आज ८ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

दिल्लीमध्ये आजपासून मद्यविक्रीवर लागणार ‘स्पेशल कोरोना फी’ कर

News Desk

कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांना १२वी पर्यंत मिळणार माेफत शिक्षण

News Desk