HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. सर्व देश, राज्य टाळेबंदीत (लॉकडाऊन) होते तरी शेतकरी बांधव मात्र कर्तव्यावर होते, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कार्यालयीन कामे घरुनच (वर्क फ्रॉम होम) केली जात होती. शेतकऱ्यांनी लॉकडाऊन केले असते तर कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. इतरांसाठी मळे फुलवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काटे येऊ नयेत यासाठी त्यांच्या आणि त्यांच्या कटुंबियांच्या मागे सरकार ठामपणे उभे राहील, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, जगाचे कामाचे तास सूर्यप्रकाशात असतात आणि शेतकऱ्यांचे मात्र रात्रीचे कशासाठी. ऊन, वारा, पाऊस अशा सर्व संकटांचा मुकाबला करत तो जगासाठी सोनं पिकवत असतो. त्याच्या आयुष्यात सुखा- समाधानाचे क्षण कसे येतील हे पाहणे सरकारचे काम आहे. ‘घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ’ असे आम्ही होऊ देणार नाही.

शेतकऱ्यांच्या आशीर्वादाची ताकद मोठी असते. ती जेवढी जास्त मिळेल तेवढा काम करण्याचा हुरुप वाढतो. त्या जोरावर आम्ही शेतकऱ्यांसाठी जे जे करणे शक्य आहे ते निश्चितच करू.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे यास आमचे प्राधान्य असून नुकतेच नीती आयोगासोबत झालेल्या दृकश्राव्य बैठकीत पीक विम्याचा प्रश्न उपस्थित केला असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

वीजबिलांची थकबाकी भरुन योजनेचा लाभ घ्यावा- अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वीजग्राहकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. वीजबील थकलेल्या सर्व शेतकऱ्यांनी थकीत वीजबिलांवर सूट मिळवण्यासाठी नवीन कृषी वीज जोडणी धोरण अंतर्गत जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री यांनी यावेळी केले. तसेच शेतकरी, घरगुती वीज ग्राहक आदी सर्वांनाच व्यवस्थित वीज मिळाली पाहिजे यासाठी सर्वांनी वीजबिले भरणे आवश्यक आहे. वीजगळती होणार नाही याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असेही पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असून शेतकऱ्यांचे प्रश्न, कृषीपंपांचे महत्त्व आम्हाला माहीत आहे. सर्वांना व्यवस्थित वीज मिळेल. वेळेत वीजेची जोडणी मिळेल हे आमचे उद्दिष्ट आहे. 5 वर्षात 5 लाख सौर कृषी पंप देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या अनुषंगाने सौर कृषी पंप योजनेला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे.पडिक जमीनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारुन प्रतीएकरी दरवर्षी 30 हजार रुपये भाडे आणि त्यावर दरवर्षी 3 टक्के वाढ असा फायदा मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले की, नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणांतर्गत 19 फेब्रुवारीपर्यंत 10 हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे उद्दिष्टापेक्षा अधिक काम करत सुमारे 18 हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे. तसेच 10 हजाराहून अधिक सौर कृषीपंप देण्यात आले आहेत. कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण अंतर्गत 84 वाहिन्यांना लघु सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज पुरवली जात असून त्याद्वारे 30 हजाराहून अधिक शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे.

या बैठकीत कृषी ऊर्जा पर्व बाबतचे संगणकीय सादरीकरण महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले. आतापर्यंत सुमारे 4 लाख शेतकऱ्यांनी कृषी वीज बिलांची एकूण 364 कोटी रुपयांची थकबाकी भरली आहे. या थकबाकीच्या अनुषंगाने 668 कोटी रुपयांची थकबाकी माफ झाली आहे, असे सिंघल यांनी सांगितले.

विजेची संपूर्ण थकबाकी भरुन थकबाकीमुक्त झालेले इगतपुरीचे शेतकरी कचरु धोंडू बोराडे यांना सन्मानपत्र, पालीचे शेतकरी रोशन रुईकर यांना सौर कृषीपंप हस्तांतरण पत्राचे वितरण तर पालघरचे संजय पावडे यांना नवीन कृषीपंप वीजजोडणी प्रमाणपत्र यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्याचे आले. तसेच कृषी ऊर्जा पर्व पोस्टर आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शेतकरी कचरु बोराडे यांनी थकबाकीची 91 हजार 500 रुपये इतकी रक्कम एकरकमी भरल्यामुळे या योजनेंतर्गत त्यांना सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांची सूट मिळाली, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

कृषी ऊर्जा पर्व अंतर्गत 1 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात महा कृषी अभियानाची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी व्यापक प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. कोरोना निर्बंधांचे पालन करत कृषी वीज ग्राहकांचा मेळावा, ग्राहक संपर्क अभियान, ग्रामपंचायत, ग्रामसभेत प्रबोधन करणे, थकबाकी भरणाऱ्या महिलांचा सत्कार, महिलांच्या नावावर वीज जोडणी देणे, थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना सन्मानपत्र व थकबाकी मुक्त गावातील सरपंचांचा सन्मान, शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरण अंतर्गत वीजजोडणी व सौर कृषिपंप बसवणे तसेच कृषी आकस्मिकता निधीतून पायाभूत सुविधांच्या कामाची सुरूवात तसेच वीज सुरक्षा व कपॅसीटरचा प्रसार आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूर दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘या’ केल्यात मागण्या!

News Desk

‘राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आक्रमक!’

News Desk

“मी तसं म्हणालो नाहीच!” निधीच्या विधानावरुन अशोक चव्हाणांचा युटर्न

News Desk