HW News Marathi
देश / विदेश

भाजप सरकारला सावरकरांचा सन्मान करण्यासाठी कोणी रोखले होते ?, सामनातून मोदींना सवाल

मुंबई | वीर सावरकर हे क्रांतिकारकांचे शिरोमणी होतेच . प्रश्न इतकाच आहे की , गेली साडेपाच वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे . ‘ भारतरत्न ‘ देऊन सावरकरांचा सन्मान करण्यासाठी त्यांना कोणी रोखले होते ? दुसरे असे की , सावरकरांना ‘ कलंक ‘ आणि ‘ माफीवीर ‘ म्हणून हिणवणारी ‘ आयात ‘ मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपच्याच बाकावर बसली आहेत . त्यांचे तुम्ही काय करणार आहात ? महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग असा सगळा तुमचा प्रकार आहे . सावरकरांबाबत नक्राश्रू ढाळण्यापेक्षा नागरिकता सुधारणा विधेयकावरून देश का पेटला , याचे उत्तर आधी जनतेला द्या. वीर सावरकर आणि नागरिकता दुरुस्ती कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामनाच्या आग्रलेखातून टीका केली

सामनाचा आजचा अग्रलेख

नागरिकता सुधारणा विधेयकाचे महाराष्ट्रात काय करणार, असा प्रश्न राज्यातील विरोधी पक्षाला पडला आहे. हातातून सत्ता गेली. हातातोंडाशी आलेला घास गेला. त्यामुळे त्यांच्या मनावर आलेला ताण आम्ही समजू शकतो. अशा ताणतणावात असले प्रश्न पडतात. अर्थात महाराष्ट्रापुढे यापेक्षाही महत्त्वाचे आणि लोकांच्या जीवनमरणाचे प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. नागरिकता सुधारणा कायद्यावरून देशात भडका उडाला आहे व प्रकरण केंद्र सरकारच्या हाताबाहेर गेले आहे. ईशान्येकडील राज्यांत आग लागली आहेच, पण बिहार, लखनौसह इतर राज्यांतही पेटवापेटवी सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीत तर सगळ्यात जास्त तणावाचे वातावरण दिसत आहे. विधेयकाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बंदुका रोखल्या. गोळ्या चालवल्या. आपल्याच देशातील विद्यार्थ्यांवर बंदुका रोखण्याची वेळ येते तेव्हा प्रकरण हाताबाहेर गेले असे समजावे. दिल्लीतील पोलिसांची कारवाई अमानुष आणि बेकायदेशीर आहे. जालियनवाला बाग हत्याकांडात इंग्रज यापेक्षा वेगळे वागले नव्हते. 1984 च्या शीख हत्याकांडावर बोलण्याचा अधिकार आता भाजपास उरला आहे काय? नागरिकता सुधारणा विधेयकावरून देशभरात जो हिंसेचा भडका उडाला आहे त्याबाबत पंतप्रधानांनी नेहमीप्रमाणे शांततेचे आवाहन केले आहे व या भडक्यामागे

पाकिस्तानचे डोके आणि हात

असल्याचे जाहीर केले आहे. असे सांगणे ही मोदी सरकारची हतबलता आहे. एका महाशक्तिमान देशात पाकिस्तानसारखा कमजोर देश अशाप्रकारे दंगेधोपे घडविण्याचे सामर्थ्य राखत असेल तर हिंदुस्थानला ते शोभणारे नाही. एका बाजूला सांगायचे, ‘सर्जिकल स्ट्राइक’ वगैरे करून आम्ही पाकिस्तानला खतम केले, गुडघे टेकायला लावले व त्याच वेळी देशात भडका उडाला त्याचे खापर पाकिस्तानवर फोडायचे, हे पटणारे नाही. पाकिस्तान हिंदुस्थानात काही गडबड करीत असेल तर त्यांना जन्माची अद्दल घडवणे हाच एकमेव मार्ग दिसतो. एखाद्या आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांच्याशी हस्तांदोलन न करणे अशा प्रकाराने काय साध्य होणार? पण अशा बाळबोध आंतरराष्ट्रीय कूटनीतीतच आपण रमलो आहोत व भक्तांना त्याच शौर्यकथा वाटत आहेत. देशात नागरिकता सुधारणा विधेयकावरून रण पेटले असतानाच भाजपने वीर सावरकर यांच्या अपमानाचा मुद्दाही काढला आहे. वीर सावरकर हे क्रांतिकारकांचे शिरोमणी होतेच. प्रश्न इतकाच आहे की, गेली साडेपाच वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे. ‘भारतरत्न’ देऊन वीर सावरकरांचा सन्मान करण्यासाठी त्यांना कोणी रोखले होते? दुसरे असे की, सावरकरांना ‘कलंक’ आणि ‘माफीवीर’ म्हणून हिणवणारी ‘आयात’ मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपच्याच बाकावर बसली आहेत. त्यांचे तुम्ही काय करणार आहात?

सावरकरांचा अपमान

करणाऱ्यांच्या कोटास गुलाबाचे फूल खोचावे व मिरवावे तसे तुम्ही त्यांना मिरवत आहात. त्यामुळेच तुमचे सावरकरप्रेमाचे ढोंग साफ उघडे पडले आहे. महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग असा सगळा तुमचा प्रकार आहे. सावरकरांबाबत नक्राश्रू ढाळण्यापेक्षा नागरिकता सुधारणा विधेयकावरून देश का पेटला, याचे उत्तर आधी जनतेला द्या. महाराष्ट्रात आधीच्या सरकारने प्रश्नांचे डोंगर उभे केले आहेत. अरबी समुद्रातील शिवस्मारकातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाले आहे. अशी अनेक प्रकरणे रटरटत आहेत. त्यावरून लोकांचे लक्ष उडावे म्हणून विरोधी पक्ष फालतू उपद्व्याप करू पाहत असेल तर हे उद्योग त्यांच्या अंगलट येतील. विरोधी पक्षाने विधायक दृष्टिकोन ठेवावा. विरोधकांच्या कुंडल्या आमच्या हातात आहेत अशा धमक्या देणाऱ्यांपैकी उद्धव ठाकरे नाहीत. अशा धमक्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. महाराष्ट्रातले हे वातावरण संपले आहे. नागरिकता सुधारणा बिलाचे काय करावे त्याचे मार्गदर्शन विरोधकांकडून घेण्याची गरज नाही. भीमा-कोरेगाव दंगलीत श्री. फडणवीस यांचे सरकार कसे हतबल झाले होते याचा अनुभव देशाने घेतला आहे. महाराष्ट्राची नवी कुंडली महाविकास आघाडीचे सरकार मांडत आहे. विरोधकांनी त्यात अडथळे आणू नयेत. नागरिकता सुधारणा विधेयकापेक्षा आम्हाला महाराष्ट्राच्या 11 कोटी नागरिकांची चिंता आहे. विरोधकांना हे मान्य नसेल व ते रिकामे असतील तर त्यांनी इतर राज्यांत लागलेली आग विझवायला जावे. आम्ही बंब पुरवू.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ दिग्गज उद्योजक राहुल बजाज अनंतात विलीन

Aprna

BiharElection |…म्हणून जेडीयूने निकालांपूर्वीच मानली हार

News Desk

शिंदे गटाला नाव-चिन्हा देण्याचा निर्णय योग्य; निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात पाठविले उत्तर

Aprna