पुणे | मेट्रोवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असून तो आवश्यक असला तरी राज्य परिवहन महामंडळाच्या ३ हजार बसेसचे नियोजन राज्याच्या अर्थसंकल्पात केले असून सर्व बसेस विद्युत घटावर चालणाऱ्या करण्यासाठी आवश्यक सर्व कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आळंदी रोड येथील कार्यालयाच्या चाचणी मैदानावर उभारलेल्या २५० मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅक आणि माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून उभारलेल्या हलक्या वाहनांसाठी ‘रोलर ब्रेक टेस्टर’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, आमदार सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
जागेची अडचण असतानाही काटकोनात हा ब्रेक टेस्ट ट्रक बसवल्यामुळे वाहनमालकांची चांगली व्यवस्था झाली आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, वाहनांची योग्यता (फिटनेस) चाचणी करण्यासाठी ३० किलोमीटर लांब दिवे घाटात जावे लागत होते. त्यामुळे त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी तसेच प्रदूषण व्हायचे. त्याला आता या टेस्ट ट्रॅकमुळे आळा बसणार आहे.
पुण्याची वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी आराखडा
पुण्याची वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर विस्तारत असून वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी पुम्टा, पीएमआरडीएच्या माध्यमातून सर्वंकष वाहतूक आराखडा करण्यात येत आहे. मेट्रो, बीआरटी, रेल्वे, विमानतळाच्या परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबरोबरच सार्वजनिक वाहनतळ, बसस्थानके याबाबतही नियोजन सुरू आहे. रिंग रोड, मेट्रोच्या कामांना गती देण्यात येत आहे.
पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने मेट्रोची कामे सुरू असून त्यामध्ये अजून काही अतिरिक्त मार्गिकेंचा समावेश करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. या माध्यमातून मेट्रोचे जाळे सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मेट्रोची कामे बऱ्याच ठिकाणी सुरू असल्याने काही प्रमाणात रहदारीची कोंडी होते. मात्र या कामासाठी नागरिकांचे सहकार्य लाभत आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
सर्व परिवहन कार्यालयांचा कारभार स्वच्छ, पारदर्शक, वेगवान आणि लोकाभिमुख झाला पाहिजे, अशी अपेक्षा करून ते पुढे म्हणाले, परिवहन विभागाला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्यात येत असून पुढील काळातही यासाठी तसेच वाहने खरेदीसाठी आवश्यक निधी दिला जाईल. पुणे व पिंपरी शहरातील नवीन रिक्षा परवाने देण्यासंदर्भात ते मर्यादित ठेवण्यासह जुन्या परवानाधारकांनाही पुरेसे उत्पन्न मिळेल याकडे लक्ष दिले जाईल, असेही पवार म्हणाले.
रिक्षा कामगारांसाठी महामंडळ स्थापन करणार- परिवहनमंत्री ॲड.अनिल परब
कोरोना कालावधीमध्ये रिक्षाचालकांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे याची शासनाला जाणीव असून त्या काळात रिक्षाचालकांची नोंदणी करून काही प्रमाणात मदतही करण्यात आली आहे. आता त्यांची संख्या शासनाकडे उपलब्ध असून रिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी यावेळी केली. लोकांचा परिवहन कार्यालयामध्ये येण्याचा त्रास कमी व्हावा यासाठी परिवहन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या १२० सेवांपैकी ८० सेवा ऑनलाइन करण्यात आल्या असून उर्वरित शक्य तेव्हढ्या सेवाही ऑनलाईन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शहरात ३ लाख ५० हजार वाहनांना फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यक असते. त्यामध्ये ८० हजार रिक्षा आणि १ लाख २० हजार हलक्या वाहनांचा समावेश आहे. आळंदी येथे झालेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकमुळे त्यांचा ३० की.मी. लांब दिवेघाटात जाण्याचा त्रास, पूर्ण दिवसाचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. शहरामध्ये रिक्षा परवान्यांची संख्या वाढली असून ती मर्यादित ठेवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ॲड. परब म्हणाले.
यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, कोरोना कालावधीमध्ये राज्य शासनाने बांधकाम कामगार, माथाडी कामगाराना २५ ते ३० कोटी रुपयांची मदत दिली. त्याचप्रमाणे रिक्षाचालकांनाही आर्थिक मदत केली आहे. पुणे शहरातील प्रदूषणाला आला घालण्यासाठी राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण उपयुक्त ठरेल असेही त्या म्हणाल्या. यावेळी बाबा आढाव यांनीही मनोगत व्यक्त केले. आभारप्रदर्शन करताना परिवहन आयुक्त ढाकणे यांनी परिवहन विभागाचे उपक्रम आणि आधुनिकीकरण याबाबत माहिती दिली. प्रास्ताविक पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी मानले. यावेळी परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी, रिक्षाचालक, वाहनमालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.