HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार पंतप्रधान कधी होणार?; चंद्रकांत पाटलांच्या टीकेला संजय राऊतांचे सणसणीत उत्तर!

मुंबई | नुकतंच देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या तीन राज्यांत निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच उत्तर प्रदेश आणि गोव्यात परिवर्तन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पवारांनी केलेल्या दाव्याचं समर्थन केलं आहे. तर दुसरीकडे यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला होता. त्यावर आता राऊतांनीही चंद्रकांत पाटलांवर जोरदार पलटवार केला आहे.

शरद पवार हे पंतप्रधान कधी होणार, हे राऊतांनी सांगावं, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला होता. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील, याची भविष्यवाणी पवार साहेबांनी करावी, असेही ते म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “पाटील यांच्यासारख्या टेकाड्यांना हिमालय आणि सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही”, अशी टीका राऊतांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री कधी बाहेर पडणार, यावर राऊत म्हणाले, ‘त्यांना योग्य वेळी उत्तर देऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तम काम करत आहेत. तेसुद्धा योग्य वेळी बाहेर पडतील तसेच पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीला उपस्थिती लावतील असेही यावेळी संजय राऊतांनी सांगितले.

आधी शरद पवारांएवढी ऊंची गाठा

पुढे राऊत म्हणाले, शरद पवार यांच्या एवढी राजकारणाची, समाजकारणाची आणि व्यक्तिमत्वाची उंची आधी गाठा. पण, तुमच्यासारख्या टेकाड्यांना हिमालय किंवा सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही. पंतप्रधान पदावर जर एखादा माणूस बसला म्हणून तो मोठा होत नाही. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची मोठीच होती. मात्र, बऱ्याचदा अनेक व्यक्ती त्या पदावर पोहचू शकल्या नाहीत म्हणून त्यांची उंची कमी होत नाही, असेही राऊत म्हणाले आहेत.

आमची लढाई खरी नोटांशीच

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी नोटासंबंधी केलेल्या टीकेबाबत राऊत म्हणाले की, “फडणवीसांनी बरोबरच म्हटलं आहे. गोव्यातील आमची लढाई खरी नोटांशीच आहे. भाजपाचे लोक गोव्यात नोटांचा पाऊस पाडत आहेत, त्यासाठी महाराष्ट्रातून ज्या काही नोटांच्या बॅगा चालल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल”, असे ते म्हणाले. त्याचबरोबर गोव्यातील जनतेला दबावाखाली येऊ नका, असंही त्यांनी सांगितलं आहे. शिवसेना हा पक्ष सर्वसामान्यांचा, बहुजनांना आणि हिंदुत्ववादी आहे. शिवसेना भाजपाच्या नोटांना पुरून उरेल हे नक्की आहे, असा विश्वास व्यक्त करत आव्हानही दिलं आहे. फडणवीसांना माझा शब्द आहे तुम्ही कितीही नोटा टाका आम्ही नोटांशी लढू, असं राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन अहिर स्वतःची ताकद निर्माण करण्यात अपयशी ठरले !

News Desk

महिलांवरील अत्याचारासह सायबर क्राईम आमचे सर्वोच्च प्राधान्य – हेमंत नगराळे

Manasi Devkar

शेतकरी कायद्यानिमित्त होणारी बाळासाहेब थोरात आणि राज्यपालांची भेट रद्द

News Desk