HW News Marathi
महाराष्ट्र

शिवछत्रपतींना घडविण्यामध्ये जिजाऊंचाच हात, पुरंदरेंनी ते वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न! – शरद पवार

मुंबई | मला नास्तिक म्हणता परंतु मी तुमच्यासारखे देव धर्माचे प्रदर्शन कुठे करत नाही. मी १३-१४ वेळा निवडणूकीचा नारळ कुठे फोडतो ते बारामतीकरांना जाऊन विचारा…एकच ठिकाण आहे… एकच मंदिर आहे. त्याचा आम्ही गाजावाजा करत नाही. माझ्यापुढे प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे. प्रबोधनकारांनी देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर सडकून टिका केली आहे. गैरफायदा घेणार्‍याला ठोकून काढण्याचे काम केले आम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो मात्र कुटुंबातील वाचतात असं नसावं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

राज ठाकरे यांनी काल ठाण्यात शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. राज ठाकरेंच्या या आरोपाला शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना ‘टोले’ जंग उत्तरे दिली. एखादी व्यक्ती वर्ष – सहा महिन्यात एखादे वक्तव्य करत असेल तर ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पण पत्रकार विचारत आहेत, म्हणून त्यावर मत व्यक्त करतोय असे शरद पवार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे मी नाव घेत नाही, असा उल्लेख त्यांनी केला. पण दोनच दिवसापुर्वी मी अमरावतीत होतो. त्याठिकाणचे माझे संपुर्ण भाषण ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर जवळपास २५ मिनिटे बोललो. अर्थात मला रोज सकाळी लवकर उठून वृत्तपत्र वाचनाची सवय आहे. त्यासाठी मला लवकर उठावं लागतं. खुपदा वृत्तपत्रात काय काय लिहिलंय हे न वाचता एखादा वक्तव्य करत असेल तर त्याला दोष देणार नाही असा जबरदस्त टोला शरद पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

फुले-शाहू-आंबेडकरांबाबतही उल्लेख केला जातो त्याचा अभिमान आहे मला असे सांगतानाच दुसरी गोष्ट त्यांना माहिती असली पाहिजे की, या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले काव्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रचले होते.या तिघांचा उल्लेख करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्यासारखे आहे असेही शरद पवार म्हणाले. पुरंदरे बद्दल मी बोललो मी लपवून ठेवत नाही. पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा उल्लेख करत असताना माँ जिजाऊंनी छत्रपतींचे व्यक्तिमत्व घडवले असे सांगण्याऐवजी दादोजी कोंडदेव यांनी ते घडविले असा उल्लेख केला होता. त्याला माझा सक्त विरोध होता. शिवछत्रपतींना घडविण्यामध्ये जिजाऊंचाच हात होता. परंतु पुरंदरेंनी ते वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न केला तो योग्य नव्हता असं माझं मत तेव्हाही होतं ते आजही कायम आहे असेही शरद पवार म्हणाले.

जेम्स लेन यांनी जे काही लिखाण केले त्या लिखाणाचा आधार त्यांनी पुरंदरेकडून घेतला होता, अशी माहिती जेम्स लेनने दिली होती. एखादा लेखक जर असे वक्तव्य करत असेल त्यावर पुरंदरे यांनी कधी खुलासा केला नाही म्हणून मी जी टिका टिप्पणी केली असेन तर त्याचे मला दु:ख वाटत नाही उलट मला अभिमान वाटतो अशा शब्दात पुरंदरेंवरील टिकेला शरद पवार यांनी उत्तर दिले. आज खऱ्या अर्थाने महागाई, दरवाढ, बेरोजगारी हे जिव्हाळ्याचे प्रश्न होते. ज्यांनी एवढं मोठं काल भाषण केले त्यांनी सामान्य जनतेच्या सुखदुःखाच्या प्रश्नाचा साधा उल्लेखही केला नाही यावरही शरद पवार यांनी टिका केली.

सोनिया गांधी आणि माझ्याबद्दल त्यांनी वक्तव्य केले. याबाबतीत माझे जाहीर मत आधीपासूनच स्पष्ट होते. सोनिया गांधी यांनी जेव्हा मी पंतप्रधान पदावर जाऊ इच्छित नाही, असे जाहीर वक्तव्य केल्यानंतर तो प्रश्न तिथेच संपला होता. आमची चर्चा त्यांच्या पंतप्रधानपदाबाबत होता, तो विषय निकाली लागल्यानंतर त्यावर चर्चा करण्याचे कारण नव्हते. त्यामुळे काँग्रेससोबत आम्ही तेव्हा गेलो आणि आजही त्यांच्यासोबत आहोत. मात्र त्याकाळात जे काही घडले, त्याचे सविस्तर वाचन केले असते तर कदाचित अशाप्रकारचे उद्गार राज ठाकरे यांनी केले नसते.

आमचा संपणारा पक्ष नसून संपवणारा पक्ष आहे, असे ते म्हणतात ते खरे आहे. संपवणारा पक्ष याची नोंद महाराष्ट्रातील मतदारांनी योग्य घेतली व खरे दाखवून दिले की, त्यांचा एकच आमदार निवडून आलेला आहे.त्यांच्या सभा मोठ्या होतात सभेला लोक जातात. त्या सभेत शिवराळ भाषा असो की नकला यातून मात्र लोकांची करमणूक होते असा सणसणीत टोला शरद पवार यांनी लगावला. राज्यातील सामाजिक ऐक्याला धक्का लावण्याचा प्रयत्न होतोय. सांप्रदायिक विचारांची मांडणी काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. लोकांनी याला बळी पडू नये असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले. भोंग्याबाबत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना शरद पवार यांनी राज्यसरकार याबाबत गंभीरतेने विचार करेल असे स्पष्ट केले.

भाजपबद्दल कालच्या भाषणात एकही शब्द आलेला नाही. त्यांच्यावर भाजपने कदाचित काही जबाबदारी दिलेली असावी त्याचा प्रत्यय कालच्या सभेत आला. महागाई, बेरोजगारी एवढी वाढलेली असताना जर एखादा राजकीय नेता आपल्या सभेत एक शब्द बोलत नाही, म्हणजे काय समजायचं? असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला. अजित पवार यांच्यावर ईडीची कारवाई होते आणि सुप्रिया सुळे यांच्यावर होत नाही. हा आरोप पोरकट असल्याचे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलतानाच अजित पवार आणि मी वेगळा नाही.आमचे कुटुंब एकच आहेत, असे स्पष्ट केले. चमत्कारीक नेतृत्वाने एका व्यक्तीबाबत द्वेष निर्माण करण्याचे काम केले. यामध्ये एसटी कामगारांना दोषी धरता येणार नाही असेही शरद पवार यांनी सांगितले. विक्रांतसाठी पैसे गोळा केले हे दिसते आहे. पैसे गोळा केले तर त्याचा विनियोग काय केला? माझ्या वाचनात आले की ते पक्षाकडे जमा केले. भावनेला हात घालून पैसे गोळा केले. मग तो एक रुपया असो किंवा अकरा हजार रुपये ते पक्षाकडे का दिले. ते पैसे सैन्यदल किंवा नौदलला देता आले असते. माझ्या मते हे आक्षेपार्ह आहे असेही शरद पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश, आपत्कालीन मदत यंत्रणेचे मानले आभार

News Desk

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडेंकडून खास शुभेच्छा; परळीत 45 फुटांची प्रतिकृती

News Desk

तासगाव शहर अतिक्रमणाच्या विळख्यात

News Desk