HW Marathi
HW एक्सक्लुसिव महाराष्ट्र मुंबई राजकारण

उद्धव ठाकरे सामना सोडून इतर माध्यमांना मुलाखत का देत नाहीत ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेली मुलाखत २५ आणि २६ जुलैला प्रसिद्ध झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पहिली मुलाखत ही सामनालाच दिली होती. ही मुलाखत ३ फेब्रुवारी २०२० ला सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली होती. आणि आता दुसरी मुलाखत देखील त्यांनी सामनालाच दिली आहे. यावरुन आता मुख्यमंत्री फक्त सामनालाच मुलाखत का देतात असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इतर माध्यमांशी ते का बोलत नाहीत अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे जर आपण इतिहासात जाऊन पाहीलं तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा सामनाला मुलाखत द्यायचे. मात्र त्यांनी आयबीएन लोकमतला देखील मुलाखत दिली होती. मात्र, उद्धव ठाकरे केवळ सामनालाच मुलाखत का देतात हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

महत्वाची बाब म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे सर्कियपणे राजकारणात सहभागी नव्हते. ते आपल्या राजकीय आयुष्यात शिवसेनाप्रमुख होते, आणि सामनाचे संपादक देखील होते. मात्र, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ही बाब जरा वेगळी आहे. कारण शिवसेनाप्रमुख जरी असले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे सध्या सामान्य जनता, पत्रकार शिवसेनाप्रमुखांपेक्षा मुख्यमंत्री या दृष्टीकोनातून पाहत आहेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही वाहिन्यांचे, वृत्तपत्रांचे संपादक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रकट करत आहेत.

मात्र, अद्याप त्यांना ही मुलाखत घेता आली नाही आहे. ठाकरे सरकारला सत्तेत येऊन ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ गेला. या काळात त्यांनी फेसबूक लाईव्हद्वारे लोकांशी संवाद नक्कीच साधला होता. मात्र, प्रत्यक्ष मुलाखत त्यांनी फक्तच सामनालाच दिली आहे. यावरुन सकाळ वृत्तपत्राचे संपादक सम्राट फडणीस यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्याच वृत्तपत्रातून घेतलेली मुलाखत चमत्कारीक वाटली. ते सगळ्या मीडियाशी बोलू शकले असते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत किंवा व्हिडिओद्वारे देखील बातचीत करता आली असती. ते सगळं सोडून त्यांनी स्वत:ला हवे तसे प्रश्न आणि सोयीची उत्तरे देऊन काय साध्य झालं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नक्कीच हा प्रश्न इतर पत्रकारांना देखील पडला असेल. याबद्दल राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी काही महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले

मोदींपासून हा पॅटर्न २०१४ साली सुरु झाला…!

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसं काही निवडक पत्रकारांना मुलाखत दिली होती तेच उद्धव ठाकरे स्वत:च्या संपादकांना मुलाखत दिली आहे. हा ग्लोबल पॅटर्न असल्याचेही विश्वंभर चौधरी यांनी म्हटले. तसेच, ट्रम्प पासून मोदींपर्यंत आणि आता उद्धव ठाकरे देखील तेच करत आहेत, असे चौधरी म्हणाले. आता हे का व्हावे याचा जर आपण विचार केला तर त्याच्या मागे सोशल मीडियापण आहे. सध्याच्या राजकारण्यांची आणि सत्तधाऱ्यांची एक मानसिकता झाली आहे की, आपले ट्रोलिंग होईल, किंवा आपण काही बोललो तर विरोधी पक्ष, मीडिया कसं आकलन करेल, याची त्यांना भीती असते. मला असं वाटतं की, या भीतीची गरज नाही. कारण शेवटी तुम्ही राज्य चालवत आहात म्हणजे तुम्ही लोकांचे विश्वासार्ह आहात. आणि समजा उद्या एखादे मुख्यमंत्री असे म्हणाले की, सध्या राज्याची आर्थिक स्थिती वाईट आहे तर मग लगेच त्यामागे मुख्यमंत्र्यांना कोणी दोष देणार नाही”, असेही त्यांनी म्हटले.

आजकालच्या राजकारण्यांना ट्रान्सपरन्सी नको आहे !

आजकालच्या राजकारण्यांना transparency नको आहे.कारण transparency केली की प्रश्न विचारले जातात आणि प्रश्नांना सगळे घाबरतात.चौधरी म्हणाले की, “जर एखाद्या भागात कोरोना आटोक्यात येत नसेल तर त्या भागात चांगली कामगिरी करता आली नाही पण आम्ही नक्की प्रयत्न करु, असे वाक्य नक्कीच असू शकले असते. मात्र, सध्या सगळीकडे सुरळीत सुरु आहे हे दाखवण्याचा पॅटर्न सुरु आहे. पुढे ते असेही म्हणाले की, मनमोहन सिंग यांनीही ५ पत्रकारांनाच मुलाखत दिली होती, असे मत त्यांनी एच. डबल्यू मराठीशी बोलताना मांडले.

आधीच्या राजकारण्यांना सोशल मीडियाचे प्रेशर नव्हते !

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निखिल वागळे यांना देखील मुलाखत दिली होती आणि ती सर्वात चांगली मुलाखत होती”, असे मत चौधरी यांनी मांडले. दरम्यान, “आधीच्या पिढीला सोशल मीडियाचे प्रेशर नव्हते. २०१४ नंतर सर्व राजकारण्यांना प्रेशर आले, असे त्यांनी म्हटले. तसेच, त्यांनी असेही म्हटले की, अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीरपणे आपल्या चुका कबूल केल्या आहेत. चुका कबूल करायला धैर्य लागते आणि ते धैर्य ना मोदींमध्ये आहे ना उद्धव ठाकरेंमध्ये आहे”, असे स्पष्ट मत विश्वंभर चौधरी यांनी मांडले. “आमची चुक झाली हे म्हणायला काही कारण नाही आणि सोशल मीडियाचे प्रेशर नेते खुप घेतात”, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

ही मुलाखत इमेज बिल्डिंग करण्यासाठी होती !

यावर बोलताना त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेने उद्धव ठाकरेंचे कौतुक केले त्याचे उदाहरण दिले. पुढे ते असेही म्हणाले की जर मी माझ्या राज्यात काही करु शकत नसेल तर लोकं त्याचं परिक्षण करतात. यावर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या राजीनाम्याचेही उदाहरण दिले. ते असं म्हणाले की, जेव्हा केजरीवाल यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर दिल्लीत खूप विरोध झाला होता. मात्र, त्यानंतर केजरीवालांनी माफी मागितली आणि लोकांनी त्यांना माफ केलं, नंतर त्यांना मत देऊन निवडून देखील आणले, असे ते म्हणाले. यावरुन असे लक्षात येते की लोकं चुका झाल्या तरी माफ करतात. आणि कोणाची चुक आहे, कोण दोषी आहे हे सर्व काही लोकं पाहतात, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या दोघांचा गाडीत बसलेला फोटो शेअर केला होता, ज्यात अजित पवार स्टेअरिंगवर बसले होते, त्यावरुन चर्चांना उधाण आले. यावर चौधरी असं म्हणाले की, “मुख्यमंत्री कितीही म्हणो की स्टेअरिंग माझ्या हातात आहे तरी त्यांना राष्ट्रवादीच्या संमतीशिवाय पाऊल उचलता येत नसेल. याचं कारण प्रशासनाचा अनुभव हे आहे. अधिकाऱ्यांवर, राष्ट्रवादीवर ते किती अवलंबून आहेत हे लोकं बघतात. तसेच, जर उद्धव ठाकरे असं म्हणाले असते की, मला प्रशासकीय अनुभव नाही. मी पद हाती घेऊन ६ महिने झाले आणि कोरोनाचे संकट आले. मी माझ्या परीने प्रयत्न करतो पण मी दावा करत नाही की यशस्वी झालो पण सर्वांनी सहकार्य केले तर मी यशस्वी होऊन दाखवेन, हा Approach लोकांना आवडणारा आहे”, असं ते म्हणाले. शेवटी विश्वंभर चौधरी यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सांगण्यासारखे खुप काही असेल पण संजय राऊतांना सांगितल्यामुळे त्यांच महत्त्व संपत असेल.

Related posts

मराठा आरक्षण : श्रेय घेण्यासाठी शिवसेनेने काहीच केले नाही !

News Desk

कावीळ झालेल्याला जग पिवळं दिसतं, तशीच राम कदमांची अवस्था !

News Desk

मल्लिकार्जुन खरगे यांची मोदींसह भाजप, संघावर सडकून टीका

Gauri Tilekar