HW News Marathi
महाराष्ट्र

‘तुम्ही शिवसेनेला ‘ना घर का ना घाट का’ करून ठेवलं, चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर सामनातून टीका!

मुंबई। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर शिवसेनेनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेला आता चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’तूनच प्रत्युत्तर दिलं आहे. ‘तुमच्या उद्योगामुळे शिवसेना किती अडचणीत आली याची तुम्हाला पर्वा नाही’, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावरच आता प्रहार केला आहे.

२१ सप्टेंबर रोजी सामनात ‘तोंडास फेस; कोणाच्या?’ या शीर्षकाखालील अग्रलेखातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीका करण्यात आली होती. त्याला चंद्रकांत पाटील यांनी लेख लिहून उत्तर दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हा लेख सामनामध्येच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

चंद्रकांत पाटील यांनी ‘तोंडाचा फेस, कोणाच्या?’ या अग्रलेखावर व्यक्त झाले आहे. त्यांच्या प्रतिक्रियेत कानामात्रेचा बदल न करता जसेच्या तसे छापण्याची दिलदारी सामना दाखवत आहे” असं लिहित ‘सामना’तून चंद्रकांत पाटील यांनी अग्रलेखाला दिलेले उत्तर छापण्यात आले आहे. तुम्ही माझ्यावर या अग्रलेखात बरीच चिखलफेक केली आहे. पण तुम्हाला मी जाब देणे प्रोटोकॉलनुसार योग्य नाही. म्हणजे राजकीयदृष्ट्या बरोबरी नाही, अशा अर्थाने शब्द वापरला. नुकतेच मी एका नेत्याबद्दल पाठीत खंजीर खुपसला, असा वाक्प्रचार वापरला तर तुम्ही पाठीत खंजीर खुपसल्याचा पुरावा मागितला. पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे विश्वासघात करणे एवढाही अर्थ तुम्हाला संपादक असून माहिती नाही. त्यामुळे प्रोटोकॉल शब्द का वापरला हे सांगितले. विशेष म्हणजे तुमच्या पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही आज हाच वाक्प्रचार वापरला. मी हा वाक्प्रचार वापरल्यानंतर तुमच्या पक्षातील लोकांचे धाडस वाढलेले दिसते, असं चंद्रकांत पाटील चक्क सामना अग्रलेखातून म्हणाले.

तसे तुमचे आभार मानण्याचे बरेच दिवस डोक्यात होते. कारण तुम्ही वारंवार मला अग्रलेखातून लक्ष्य करता. तुम्ही अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या बडय़ा नेत्यांवर टीका करता आणि माझ्यावरही टीका करता त्यामुळे मला बडय़ा नेत्यांच्या रांगेत नेण्याचा सन्मानही देता. त्याच पद्धतीने आज तुम्ही ‘तोंडास फेस, कोणाच्या ?’ या शीर्षकाचा अग्रलेख लिहून मला पुन्हा प्रसिद्धी मिळवून दिली आहे. आता मात्र तुमचे आभार मानलेच पाहिजेत असे वाटल्याने हे पत्र लिहिले.

तुम्ही अग्रलेखात लिहिले आहे की, ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल. पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला?’ संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे.

मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरून मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर 127 कोटींसाठी नक्कीच फेस येणार. असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला, पण मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच आहे.

कोल्हापूरचा पहेलवान गडी मुश्रीफ तर कुणाला ऐकणार नाही, असाही दावा संजयराव तुम्ही अग्रलेखात केला आहे. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. किरीट सोमय्या यांनी एक आरोप केला तर मुश्रीफ थेट बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि तेच आडवे झाले. मग हे गडी पहेलवान कसे आहेत, हे तरी सांगा.

संजय राऊत तुम्ही अग्रलेखात एक षटकार ठोकला आहे त्याचा उल्लेख तर करायलाच हवा. हसन मुश्रीफांचे कौतुक करता करता तुम्ही म्हटले आहे, ”कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरूडला विजय मिळवावा लागला.” कमाल आहे ! आमचे काय झाले आम्ही बघून घेऊ, पण कोल्हापूर जिह्यात शिवसेनेचाही पराभव झाला त्याचा तुम्हाला आनंद झाला की काय ? कालची विधानसभा निवडणूक कोल्हापूर जिह्यात भाजपा शिवसेनेबरोबर युती करून आणि जागावाटप करूनच लढली होती, हे विसरलात की काय? या निवडणुकीत कोल्हापूर जिह्यात शिवसेना सहापैकी पाच जागांवर पराभूत झाली आणि एकच आमदार उरला, हे माहितीसाठी.

सध्या तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली माहिती असते. पण शिवसेनेचा विसर पडला, असे वाटल्याने सांगितले. तुमचे हे असे वागणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उदो उदो करताना तुम्ही शिवसेनेलाही सुपडा साफ म्हणायला कमी करत नाही. त्यामुळेच असेल कदाचित, राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री अडचणीत आल्यावर तुम्ही उसळलात आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून हल्ला केलात. पण अशी तत्परता तुम्ही शिवसेनेचे नेते अडचणीत आल्यावर दाखवत नाही. शरद पवारांवर कोणी टीका केली की त्यांचे प्रवक्ते असल्यासारखे तुम्ही अंगावर येता. त्यामुळेच तुम्हाला शिवसेनेत कोणी गांभीर्याने घेत नाहीत, असे दिसते.

तुमच्या मध्यस्थीने आणि पुढाकाराने शिवसेनेने भाजपासोबतची विजयी युती तोडली आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्ता मिळवली. पण तुमच्या उद्योगामुळे शिवसेना किती अडचणीत आली याची तुम्हाला पर्वा नाही.

उद्धवरावांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली, पण खरे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले. शिवसेनेच्या इतर बहुतांश नेत्यांना तर खुर्चीसुद्धा मिळाली नाही. या प्रकारात शिवसेनेचा मूळ मतदार नाराज झाला आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तर उभेही करत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पक्षाला ‘ना घर का ना घाट का’, असे करून ठेवले. भाजपाचे नुकसान करणाऱ्या शिवसेनेची राजकीय पत तुम्ही संपवलीत.

तुम्ही सातत्याने शरद पवारांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भजन करत असता त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. तुम्ही पलटी मारली असेल तर तो तुमच्या पक्षप्रमुखांचा प्रश्न आहे.

असो. तरीही तुमचे आभार. कारण तुमच्यामुळे संघ परिवार संतापला आहे, भाजपाचा मतदार दुखावला आहे आणि शिवसेनेचा मतदार अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा माझ्यावर टीका करता त्यावेळी या सर्व घटकांमध्ये माझ्याबद्दल चांगला मेसेज जातो. राजकारणात मित्र कोण आहेत या इतकेच शत्रू कोण आहेत हेसुद्धा महत्त्वाचे असते. किंबहुना ते अधिक महत्त्वाचे असते. राजकारणात ‘निगेटीव्ह पब्लिसिटी’चाही उपयोग असतो. फक्त तशी टीका योग्य ठिकाणाहून व्हावी लागते. सज्जनांनी टीका केली तर धोका असतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra Budget 2021-22 : महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारकडून महिलांसाठी खास भेट

News Desk

शरद पवारांच्या पुस्तकाच्या एका पानातून भाजप राजकारण करतयं,रोहित पवारांचा फडणवीसांवर आरोप !

News Desk

उद्धव ठाकरेंविरोधात उत्तरप्रदेशमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल!

News Desk