HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र शिक्षक परिषदेला लागले भाजपाचे ‘ग्रहण’

मुंबई राज्यात विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघातील तीन जागांवरील निवडणुकीच्या रणधुमाळी शिक्षण क्षेत्रात बरेच वातावरण ढवळून निघत आहे. विशेषत: नागपूर आणि कोकण मतदार संघातील निवडणुकीत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांचा शिरकाव अधिक वाढला आहे. त्यातच सत्ताधारी पक्ष असेलल्या भाजपाने तर या कोकण, नागपूर आणि काही अंशाने औरंगाबाद मतदार संघाची निवडणूक ही मोठी प्रतिष्ठेची बनवली आहे.

सरकारविरोधात राज्यातील लाखो शिक्षकांचा संताप आणि आक्रोश असताना भाजपाने आपल्या परिषदेच्या उमेदवारासाठी सर्व प्रकारची यंत्रणा कामी लावली आहे. या निवडणुकीत परिषदेचे पूर्णपणे भाजपाकरण झाल्याने परिषदेतील कार्यकर्त्यांची खदखद या निवडणुकीत परिषदेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. त्यातच पुण्यातून आपल्याच शिष्याकडून (पीए) पराभूत स्वीकारलेल्या आणि शिक्षकांच्या प्रति प्रचंड आदर असलेल्या माजी आमदार भगवानराव साळुंखे यांची या निवडणुकीत मोठी गोची झाली आहे. त्यांना शिक्षक परिषदेच्या अध्यक्षपदाचे गाजर दाखवून(काही महिन्यांपूर्वी असेच मंत्रीपदाचेही गाजर दाखविण्यात आले होते) त्यांना औरंगाबाद आणि कोकण मतदार संघात प्रचारासाठी उतरवले आहे. यामुळे एकेकाळी कोकणातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या रामनाथ दादा मोते यांच्या हातात हात घालून प्रत्येक सरकार आणि शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात शिक्षकांसाठी रस्त्यावर उतरणारे मोते यांच्या विरोधात बोलत आहेत. त्यांना शिक्षक परिषदेतील धुरिणांनी आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांनाही खोटा प्रचार करायला भाग पाडले आहे. म्हणूनच बिचारे साळुंखे आपला बचाव करण्यासाठी आमचे आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे भाजपाकरण झालेले नाही,आमच्या परिषदेला भाजपाने हायजॅक केलेले नाही हे मोठ्या केविलवाण्या स्थितीत येऊन सांगत आहेत.

पुण्यातील निवडणुकीच्या वेळी ज्यांनी दगा दिला आणि आपल्या प्रचारासाठी त्यावेळी आताच्या भाजपाने आणि परिषदेनेही एकही आमदार, खासदार, आमदार आपल्या प्रचारासाठी का उतरवले नव्हते? याची एक जखम त्यांच्या मनात अजूनही भळभळत आहे, परंतु कोणाच्या तरी इशा-यावर कोकणातील प्रचार करताना ते स्वत:लाही फसवत आहेत, याची त्यांना जाणीव आहे,दीडच वर्षांपूर्वी त्यांना आमचा भाजपाचा कोणताही संबंध नाही असे ठणकावून सांगण्याचा अधिकार होता; परंतु त्यांचा अधिकार शिक्षक परिषदेच्या लोकांनी हिरावून घेतल्याने त्यांचा नाईलाज झाला आहे. त्यामुळे आपल्याच सहका-याविषयी कधीही आकसभाव न ठेवणारे अण्णा आज मोते या आपल्या एका जिवाभावाच्या सहकार्याविषयी बोलत सुटले आहेत. कोणाच्यातरी हट्टापायी संपूर्ण संघटनाच भाजपाच्या दावणीला बांधली गेल्याने नागपूर, औरंगाबाद आणि कोकणातील प्रचाराची संपूर्ण यंत्रणा ही भाजपा चालवत असल्याचे आता झाकून राहिलेले नाही. यामुळे केवळ साळुंखे अण्णाच नाही तर परिषदेचे तुकडे करण्यासाठी ‘बालहट्ट’ करणा-या परिषदेच्या माजी आमदारांनाही याचे स्पष्टीकरण देणे अवघड झाले आहे.

कोकण शिक्षक मतदार संघात परिषदेच्या संपूर्ण (रायगडचा थोडा अपवाद वगळता) कार्यकर्त्यांची जिल्हास्तरावरील कार्यवाह, पदाधिका-यांची मानसिकता ही पूर्णपणे रामनाथ मोते यांच्या बाजूने असताना त्यांना डावलण्याची चूक परिषदेने केली. त्यांनाही शिक्षक हे आडाणी नाहीत याची जाणीव आहे; परंतु अध्यक्षपदाच्या गाजराने त्यांनी आणि त्यांच्यासारख्या ठाणे, मुंबईतील शिक्षक परिषदेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या विरोधात ते जाऊन रामनाथ मोते यांच्या विरोधात प्रचार करून एका मतलबी निष्क्रीय माणसासाठी आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहेत, असे शिक्षकांना वाटते. म्हणूनच यादरम्यान कोकणातील अनेक सभांमध्ये परिषदेला मोठे आव्हान स्वीकारावे लागले.

ज्या शिक्षकांचे प्रश्न साताधारी सेना-भाजपच्या काळात अधिक गंभीर बनले त्यांचेच प्यादे होऊन शिक्षकांचे प्रश्न कसे सुटतील? याचे उत्तर आज उभे असलेल्या शिक्षक परिषदेच्या उमेदवारालाच नाही देता येणे कदापि शक्य नाही तितकेच मोते यांना आपण का तिकीट नाकारले याचे एकही समाधानकारक उत्तर देऊ न शकणा-या साळुंखे, रायकर आणि त्यांच्या पदाधिका-यांना देता येणार नाही. जे उत्तर सांगितले जाते ते इतके नैतिकतेच्या पातळीवर तकलादू ठरणारे आहे. ज्यांनी पुन्हा संधी नको, असा प्रचार केला, त्यांनी तीन-तीन वेळा संधी घेतलेली आहे याचे भान त्यांना का सुटले? असा प्रश्न शिक्षक विचारत आहेत.

शिक्षकांचे हजारो प्रश्न, विधान परिषदेत आणि शालेय शिक्षण विभागाच्या प्रत्येक कार्यालयातून मार्गी लावले, एकही दिवस कधी विश्रांती घेतली नाही, सकाळी ७ वाजता आपले कार्यालय सुरू करून राज्यभरातील प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आदिवासी आश्रम शाळा आदींचे प्रश्न सोडवले, उल्हासनगरात एका चाळीत राहुन केवळ शिक्षकांपुढेच नाही तर राज्यातील संपूर्ण लोकप्रतिनिधीपुढे निस्वार्थी सेवेचा, कार्याचा आदर्श घालून दिला. त्यामुळेच त्यांना विधानपरिषदेचे तालिका सभापतीपद आणि अत्यंत महत्वाचे असलेले आश्वासन समितीचे अध्यक्षपद मिळाले. एकीकडे शिक्षकांचे प्रश्न सोडविताना या समितीचे काम प्रभावी करून अनेक सचिवांना, अधिका-यांना धारेवर धरले, राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी कोणाचीही तमा बाळगली नाही, असा कर्तृत्त्ववान, कार्यसम्राट असलेल्या रामनाथ दादा मोते यांना परिषदेने तिकीट का नाकारले? याचे परिषदेतील एकही नेता शिक्षकांना देऊ शकत नाहीत. कारण मोते यांच्या इतकी कामाची पोचपावती आपल्या आपल्या कार्यकाळात परिषदेच्या एकाही आमदाराला देता आली नाही, त्यातही पुन्हा त्यांनाच संधी नको हे परिषदेकडून सांगण्यात येणारे कारण कोणत्याही शिक्षकांना कधीच पटणारे नाही. त्यातही जो उमेदवार दिला त्यांची ओळख केवळ परिषदेचा अध्यक्ष यापलीकडे कोठे होती? किती शिक्षकांचे प्रश्न त्यांनी निस्वार्थपणे सोडवले आहेत? याची एखादी यादी शिक्षक परीषदचे तथाकथित दाखवतील का? असे अनेक प्रश्न आज शिक्षक विचारत आहेत, तिथे केवळ साळुंखे यांना बळीचा बकरा बनविला आहे, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही, ज्याप्रमाणे शिक्षक परीषद चुकीच्या निर्णयामुळे मुंबईत संपली त्याच प्रमाणे कोकणातही संपविण्याची दुर्बुद्धी परिषदेच्या मंडळींना सुचली असल्याने ते मोतेसारख्या निस्वार्थी शिक्षक प्रतिनिधीला गमावून बसले आहेत.याची मोठी किंमत शिक्षक परिषदेच्या नेत्यांना मोजावी लागेल.कारण मोतेसारखी हिम्मत असलेला एकही लढाऊ नेता, शिक्षकांचा सोबती, शिक्षकाचा आवाज त्यांच्याकडे उरला नाही.

त्यातच शिक्षक परिषदेला भाजपचे आता ग्रहण लागले असल्याने ते शिक्षकांचे प्रश्न सोडवूच शकत नाहीत अशा स्थितीत शिक्षकांना आता मोतेसारखा दुसरा आधार कोकणात दिसत नाही. उर्वरित पक्षांकडेही शिक्षणाचे प्रभावी प्रश्न मांडणारी संवेदनशील अशी थोडीच मंडळी दिसते. कोणाला केवळ आमदार बनायचे आहे, तर कोणाला या निवडणुकीच्या मैदानात केवळ आपले अस्तित्व दाखवायचे आहे. एकुणच केवळ शिक्षकांचे प्रश्न नाहीत तर राज्यात सरकारकडून करण्यात येत असलेल्या शिक्षण व्यवस्थेच्या खासगीकरणावर आणि शिक्षकांवर होणा-या सरकारी अन्यायावर फार कोणी बोलत नाही. सेल्फीसारखा विषय अत्यंत दुय्यम असताना त्यावर काही जण लक्ष घालत असतानाच दुसरीकडे शिक्षण हक्क अधिकार कायदा, शाळाबाह्य मुलांचे प्रश्न मात्र दुर्लक्षित ठेवत आहेत. काही उमेदवारांना शिक्षकांचा सन्मान हवा आहे तर यातील काहींनी ?अतिरिक्त ठरल्याने निवडणुकीच्या मैदानात उतरून आपले नशिब अजमावत आहेत. मुद्दा एकच आहे, की मागील अनेक वर्षापासून कोकण शिक्षक मतदार संघात महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे कायम वर्चस्व राहिलेले आहे. यंदाही परिषदेला ते मोते यांच्या माध्यमातून टिकवता आले असते. परंतु जो उमेदवार देण्यात आला आणि त्यानंतर परिषदेला भाजपाने ज्या प्रकारे हायजॅक करून आपल्या ताब्यात घेतल्याने परिषदेचे ‘टीडीएफ’ झाले आहे. त्यातच परिषदेकडून कोकणासह नागपुरात काही जणांना परिषदेतून काढून टाकण्याचा निर्णयही परिषदेच्या अंगाशी आला असून त्यापार्श्वभूमीवर कोकणात परिषदेचे भवितव्य अंधारात सापडले आहे. शिक्षक हा बुद्धिजीवी वर्गात मोडत असल्याने नेमकी कोणाची निवड करायची याची त्याला जाण आहे. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारीला हा शिक्षक आपल्या विरोधात कायम निर्णय घेणा-या सरकारला आणि विशेषत: भाजपाच्या शिक्षण मंत्र्यांना आपली जागा दाखवून देतील का नाही, हे कळणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पाने मोदींच्याच हाती त्यामुळे त्यांनीच लक्ष द्यावं

News Desk

किरीट सोमय्यांचे तीन दिवसांत चार मोठे दौरे!

News Desk

प्रगती का हायवे! महाराष्ट्रातील रस्ते बांधणासाठी २,७८० कोटी मंजूर

News Desk