मुंबई | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाकडून ‘खादी फेस्ट २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. हा खादी महोत्सव २ ऑक्टोबरपासून २ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. केवळ देशभरात नव्हे तर जगभरात खादीची एक नवी ओळख निर्माण करण्यासाठी तसेच खादी उत्पादनांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी ‘खादी व ग्रामोद्योग आयोग’ नेहमीच प्रयत्नशील असते. मध्यम, लघू आणि सूक्ष्म उद्योग विभागाचे मंत्री श्री. गिरीराज सिंग यांच्या हस्ते या विलेपार्ले येथील खादी ग्रामोदयुग येथे या ‘खादी फेस्ट २०१८’ चे आज (२ ऑक्टोबर २०१८) उद्घाटन झाले आहे.
कुटिरोद्योगांतून तयार होणा-या उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि विविध राज्यांतील कलांविषयी जनजागृती घडवून आणणे हा या खादी महोत्सवाचा एक प्रमुख उद्देश आहे. त्याचप्रमाणे असे कुटिरोद्योग करणारे विणकर, कारागिर यांना रोजगार पुरविणे हा सुद्धा या महोत्सवाचा आणखी एक हेतू आहे. यावेळी खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या केंद्रीय कार्यालयाच्या आवारात कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छ भारत’ या विषयावर एक पथनाट्य देखील सादर केले.
या ‘खादी फेस्ट २०१८’ मध्ये विविध राज्यांतील खादी उत्पादने उपलब्ध आहेत. खादीचे कपडे, खादी सिल्कच्या साड्या, ड्रेस मटीरिअल, कुर्ते, जॅकेट्स, बेडशिट्स, कार्पेट्स यांबरोबरच रसायनमुक्त शाम्पू, मध व इतर घरगुती वस्तू आणि कला व कारागिरीच्या वस्तूची या प्रदर्शनात उपलब्ध आहेत.थेट जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशाच्या कानाकोप-यांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे १०० संस्था या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्या आहेत.
खादी संगमसारख्या कार्यक्रमांद्वारे खादीच्या विविध उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ३०० जिल्ह्यांमध्ये प्रदर्शने भरवली जाणार आहेत. याव्यतिरिक्त ई-कॉमर्स माध्यमांशी हातमिळवणी, युवा डिझायनर्ससाठी स्पर्धा, जागतिक खादी परिषद आणि गांधी पर्व अशा अनेक उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे.
महात्मा गांधीजींबद्दल जागतिक स्तरावर जागरुकता वाढावी
खादी व ग्रामोद्योग आयोग ही गांधीजींच्या तत्वांवर आधारलेली संस्था आहे. गरीबांना आत्मनिर्भर बनविणे या व्यापक उद्दिष्टासाठी ही संस्था कार्य करीत आहे. खादी व ग्रामोद्याग आयोगाद्वारे साज-या होत असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीबद्दल बोलताना ते म्हणाले की, गांधीजींबद्दल जागतिक स्तरावर जागरुकता वाढावी असा उद्देश ठेऊन हा महोत्सव साजरा केला जात असून गांधीजी हे येणा-या पिढ्यांसाठीही प्रेरणास्थानी राहतील, हा संदेश या उपक्रमामुळे प्रसारित होत आहे, असे यावेळी केव्हीआयसीचे चेअरमन श्री. विनय कुमार सक्सेना म्हणाले.
खादीचा विकास आणि यश
खादी व ग्रोमोद्योग विभागाने २०१५-१८ या काळामध्ये सुमारे १४०.३४ लाख व्यक्तींसाठी रोजगारांची निर्मिती केली आहे. या कारागिरांच्या जीवनमानामध्येही सुधारणा झाल्या असून त्यांच्या वेतनामध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या उद्योगाने तब्बल ३६% इतकी प्रचंड वाढ नोंदवली आहे. तंत्रज्ञानात होणाऱ्या सुधारणा या उत्पादन आणि विक्रीसाठी लाभदायक ठरत आहेत. या उद्योगाने १२५२०.९२ कोटी रुपये मूल्याचे उत्पादन आणि १५३२१३.४९ कोटी रुपये मूल्याची विक्री अशी लक्षणीय कामगिरी साधली आहे.
आता ‘खादी फॉर ट्रान्सफॉर्मशन’
महात्मा गांधी यांच्या नावाचा ज्यांनी राजकारणासाठी वापर केला त्यांनी सत्तेत राहून राजकीयदृष्ट्या गांधींच्या धोरणाला आणि गांधींच्या नीतिविचारांना देखील तिलांजली दिली आहे . परंतु मोदीजींच्या येण्यानंतर आता हे चित्र पालटायला सुरुवात झाली आहे. महात्मा गांधींनी म्हटले होते “खादी फॉर नेशन” पंतप्रधान मोदींनी यातच वाढ करत म्हटले “खादी फॉर फॅशन”. खादी हे फक्त राजकारण्यांचेच वस्त्र आहे असे याआधी सर्वसामान्य लोकांना वाटत होते. मात्र ‘खादी फॉर फॅशन’अंतर्गत खादीच्या कपड्यांच्या डिझाइन्समध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता दिसून येत आहे. त्यामुळे लोकांची खादीच्या कपड्यांना मोठया प्रमाणावर पसंती मिळत गेली. खादी फॉर फॅशन मुळे खादीच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे. ‘खादी फॉर फॅशन’नंतर आता ‘खादी फॉर ट्रान्सफॉर्मशन’. आम्ही जगभरातील देशांमध्ये खादीचा संदेश पोहोचविणार आहोत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.