HW News Marathi
मुंबई

पंतप्रधान मोदी यांचे मावळे म्हणून निवडणुकीला सामोरे जा

मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा व भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई सुरू केली. नोटबंदीचा निर्णय हा त्याचाच भाग होता. त्यांच्या निर्णयाला जनतेने पूर्ण पाठिंबा दिला. पंतप्रधान मोदी हे देशासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण देणारे नेते आहेत. त्यांचा स्वतःचा काही हेतू नाही. त्यांच्या मार्गाने आपल्याला चालायचे आहे. त्यांचे मावळे म्हणून निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले.

भाजपा प्रदेश कार्यसमितीच्या ठाणे येथील बैठकीच्या समारोप सत्रात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, सब का साथ सब का विकास हेच भाजपाचे धोरण असून केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती जनतेला देऊन आपल्याला आगामी निवडणुकीत विजय मिळवायचा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमुक्त भारत साकारला जात आहे. लुटारूंच्या हातातून देश बाहेर काढतो आहोत. त्यांना बळ मिळू नये याची काळजी घेत आहोत. त्यामुळेच शिवसेनेबरोबर युतीची चर्चा सुरू आहे. ही युती महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी केवळ जागावाटप नाही तर राज्यात परिवर्तन करून पारदर्शी व्यवस्था निर्माण करण्यासाठी निश्चित विचारसरणीच्या आधारावर युती होईल. भाजपा व शिवसेना हे दोन वेगळे पक्ष असल्याने त्या पक्षाबरोबर काही मुद्द्यांवर मतभेद आहेत. पण पारदर्शी कारभार निर्माण करणे हे उद्दीष्ट आहे व त्या दिशेने जायचे आहे.

भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारने विविध समाजांना एकमेकांच्या विरोधात झुंजवण्याच्या ऐवजी समाजाच्या सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सरकारच्या कामातील सकारात्मकता दिसल्याने संपूर्ण समाजाने नगरपालिका निवडणुकीतील यशाच्या रुपाने कामाची पावती दिली. आगामी महापालिका, जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत परिवर्तनाच्या आत्मविश्वासाने जनतेसमोर जा, असा संदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिला. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, भाजपाच्या नगरपालिका निवडणुकीतील यशामुळे विरोधक अस्वस्थ झाले असून आगामी जिल्हा परिषद – महापालिका निवडणुकीत भाजपावर जातीयवादाचा आरोप करतील. नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या माध्यमातून अल्पसंख्य समाजाचे तीन नगराध्यक्ष निवडून आले व ४५ नगरसेवक निवडून आले. अनुसूचित जातीचे सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे सब का साथ सब का विकास हेच भाजपाचे धोरण आहे व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात जातीयवादाचा आरोप खोडून काढावा.

प्रदेश प्रभारी सरोज पांडे व सहप्रभारी राकेशसिंह यांनी नगरपालिका निवडणुकीतील यशाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षातील उपक्रमांबद्दल मार्गदर्शन केले. प्रदेश संघटनमंत्री रविंद्र भुसारी यांनी प्रदेश संघटनेच्या उपक्रमांबद्दल व कार्यविस्तार योजनेबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यसमिती बैठकीस व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर व डॉ. सुभाष भामरे, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सरोज पांडे, सहप्रभारी खा. राकेश सिंहजी, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, सहसंघटन मंत्री व्ही. सतीशजी, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, माजी मंत्री एकनाथ खडसे, प्रदेश संघटनमंत्री रविंद्र भुसारी, प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आ. अतुल भातखळकर, आ. डॉ. संजय कुटे, डॉ. रामदास आंबटकर, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, ठाणे विभाग अध्यक्ष खा. कपिल पाटील, मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, आ. संजय केळकर, ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले व ठाणे ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे उपस्थित होते.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आर्थिक प्रस्ताव मांडला व नोटबंदीच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. या ठरावाला आ. आशिष शेलार यांनी अनुमोदन दिले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकार व पक्ष संघटनेच्या यशाबद्दल अभिनंदन करणारा राजकीय ठराव मांडला व त्याला आ. अतुल भातखळकर यांनी अनुमोदन दिले.बैठकीचे सूत्रसंचालन डॉ. रामदास आंबटकर यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साडेपाच वर्षाच्या मुलाला सावत्र बापाने दिले चटके

News Desk

महापौरांचा अरेरावीपणा, महिलेचा हात मुरगळत केली दमदाटी

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

News Desk