HW News Marathi
मुंबई

‘स्वाभिमान’ दुखावताच खोतांनी शेट्टींना दिले पैसे

  • – उसणे पैसे परत करतांना लिहिलं भावनिक पत्र

मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्षाच्या ठिणग्या आता उग्र रूप धारण करू लागल्या आहेत. एरव्ही सौम्य शब्दात होणारे आरोप-प्रत्यारोप आता टोकं गाठू लागली आहेत.

राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊंनी आपल्या वडिलांच्या आजारपणावेळी उपचारासाठी घेतलेले पैसे खासदार राजू शेट्टी यांना आज परत केले आहेत. शेट्टी यांच्या समर्थकांकडून या मदतीबाबत खोटा प्रचार करण्यात आला होता. त्यामुळं खोत यांनी स्वतःच्या मानधनातून तातडीने आरटीजीएसद्वारे अडीच लाख रुपये शेट्टी यांच्या बँक खात्यात भरले आहेत. त्यानंतर सदाभाऊंनी एक पत्र राजू शेट्टींना लिहिलंय. या पत्रात सदाभाऊंनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

सदाभाऊ खोत यांना दिलेल्या अडीच लाख रुपयांच्या मदतीची बँकेची पावती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. खोत यांना हे कळताच त्यांनी शेट्टी यांना ते पैसे परत केले आहेत. तसेच शेट्टी यांना पत्र लिहून तुमचे पैसे बँकेत जमा करत असल्याचे सांगितले आहे.

सदाभाऊ खोत यांनी ज्या पत्रातून आपल्या भावना व्यक्त केल्या ते पत्र इथे वाचकांसाठी देत आहोत

मी माझे सगळे आयुष्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन करण्यात घालवला. मी माझ्या नेत्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढलो…सन्माननीय राजू शेट्टी यांच्यात थोडा जरी प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर ते ही बाब मान्य करतील.

आंदोलनात आपल्या सहकाऱ्याला केलेल्या मदतीचा उल्लेख नेत्याने करायचा नसतो. नाही तर नेता आणि सामान्य कार्यकर्ता यांच्यात काय फरक राहील, डोक्यात हवा गेली की नेता बरळू लागतो. त्याचे नेतेपण विसरून मनाचा कोतेपणा दिसू लागतो.

माझ्या वडिलांसाठी केलेल्या मदतीची जाहीर वाच्यता करून राजू शेट्टी यांनी सामाजिक संकेत पायदळी तुडवले असून संघटनेचा नेता कसा नसावा याचे उदाहरण घालून दिले आहे. खरे तर यातून राजू शेट्टी यांच्याकडून मदत घेताना संघटनेचा कार्यकर्ता आता दहा वेळा विचार करेल. यातून संघटना विस्कळीत होण्याचा धोका मला दिसतो आहे.

माझ्या वडिलांनी मला कर्जदाराच्या कर्जातून मुक्त होण्याचीच शिकवण दिली आहे. जी व्यक्ती केलेल्या मदतीची जाहीर वाच्यता करतो, त्याची मदत कधी घेऊ नको आणि घेतली तर ताबड़तोड़ ती परत कर, अशा व्यक्तींपासून दूर राहा, अशीही शिकवण मला वडिलांनी दिली आहे. या शिकवणीला अनुसरून मी राजू शेट्टी यांनी दिलेले अडीच लाख रूपये (रू. 2,50,000) परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम मी त्यांच्या बँक खात्यात RTGS ने जमा करत आहे.

मी आज आपल्या ऋणातून माझ्या बापाला मुक्त केला आहे. सदरची रक्कम मी माझ्या पगारातून देऊ केली आहे. त्यांच्याजवळील उतावळी झालेले त्यांचे बगलबच्चे हे कोणत्या थराला संघटना घेऊन निघालेले आहेत, हे अंध झालेल्या नेत्याला कसे दिसणार?

परंतु या चळवळीमध्ये अनेक जिवाभावाची माणसे मिळाली व त्यांनी भरभरुन प्रेम दिले. मी त्यांचा सदैव ऋणी राहील. खा. राजू शेट्टींना नेता मानत असताना मला कधीही कमीपणा वाटला नाही. परंतु आपल्या बगलबच्चांच्या मदतीने माझी प्रतिमा मलिन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याचे मला किंचीतही दुःख वाटले नाही. परंतू डोंगरमाथ्यांच्या कुशीत वसलेले माझे खेडेगाव, अशा गावात माझ्या बापाने मला मोठा केला. हे करत असताना मी माझ्या बापाचे कष्ट कदापिही विसरु शकत नाही.

शेता-भातामध्ये दिवसभर काम करणारा माझा बाप, १२ बैलाच्या मागे दिवसभर नांगरण करणारा माझा बाप, दुसऱ्याच्या कामावर जाऊन हातामध्ये सुटकी घेऊन दगड फोडणारा माझा बाप, कधी अगांवरती सणावाराला नवं चिंदूकही आलं नाही, पण आम्हा भावंडांना सावकाराचं कर्ज काढून नवा कपडा घेतला. घरी पहिले आम्ही भावंडे जेवायचो मग बाप जेवायचा. शेतकरी चळवळीतील आंदोलन सुरु झाली की, गावातल्या भोळ्याभाबड्या लोकांना घेऊन स्वतः आंदोलनातसुद्धा उतरायचे. माझ्या बापाला मी चळवळीत काम करतोय याचा मोठा अभिमान होता. कधीही त्यांनी मला घराकडे मागे वळून पाहू दिले नाही. माझा बाप दवाखान्यात असतानासुद्धा त्यांनी मला शेवटपर्यंत साथ दिली व आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यावेळी मृत्यूलाही सांगितले, माझा पोरगा दिलासायात्रा काढून परत येऊ दे, मग मी तुझ्या बरोबर येईन. शेतकऱ्यांसाठी मृत्यूलाही आव्हान देणारा माझा बापाला मी राजू शेट्टींच्या बगलबच्चांच्या ऋणामध्ये कधीही ठेवणार नाही, इथून पुढे मी माझी लेखणी हीन पातळीच्या लोकांसाठी चालवणार नाही. पण मला दुःखाने आर्वजुन म्हणावे लागते, जे काय बोलली असेल, तर ती माझी आई होती, तिच्या अंतःकरणातले ते बोल होते. असे अनेकदा राजू शेट्टींची आईही वेगवेगळ्या विषयावर बोलताना पाहिलेलं आहे, परंतु मला त्या आईच्या आणि माझ्या आईमध्ये फरक वाटला नाही. पंरतु माझ्या आईबद्दल राजू शेट्टी व त्यांच्या बगलबच्चांना का वेगळे वाटले? हे न उलगडणारे कोडे आहे.

शेतकऱ्यांचा मित्र आणि संघटनेचा छोटा कार्यकर्ता

सदाभाऊ खोत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माथाडी कामगारांचा आजपासून बेमुदत बंद

News Desk

भेंडी बाजारात आग

News Desk

मुंबईत बारावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

News Desk