HW News Marathi
मुंबई

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसींग लिंक प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल! -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई | जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai-Pune Expressway) मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प (Missing Link Project) हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केले. डिसेंबर २०२३ हा प्रकल्प पूर्णत्वास येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

मुख्यमंत्री  शिंदे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेच्या (मीसिंग लिंक) प्रकल्पाला भेट देऊन लोणावळा (सिंहगड संस्था) येथे सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) महासंचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर आदी उपस्थित होते.

 

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे काम अतिशय आव्हानात्मक होते. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावर हा बोगदा आहे. बोगद्याची लांबी ८ कि.मी. असून जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याची रुंदी २३.७५ मीटर असून देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक रुंदीचा हा बोगदा आहे. मिसींग लिंक प्रकल्पामुळे मुंबई पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. बोगद्यामुळे घाटाचा भाग पूर्णतः टाळला जाऊन अपघातसंख्येत मोठी घट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

 

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, या प्रकल्पामुळे प्रवास सुखकर होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल. त्याशिवाय प्रदुषण कमी होणार असून इंधनाची तसेच वेळेची बचत होईल. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. प्रवाशी, वाहने यांच्या सुरक्षेचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. दरडी कोसळू नये यासाठी सर्वत्र ‘रॉक बोल्ट’ करण्यात आले आहे. काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाहेर जाण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर एक्झीट मार्ग तयार करण्यात आलेले आहेत. बोगद्याच्या भिंतीला ५ मीटरचे कोटिंग असणार असून त्यावर आगप्रतिबंधक कोटींग करण्यात येणार आहे. अत्याधुनिक हाय प्रेशर वॉटर मिक्स यंत्रणा असून त्यामुळे आग लागल्यास ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित होऊन आग विझेल, अशीही माहिती त्यांनी दिली.

 

यावेळी अधीक्षक अभियंता वसईकर यांनी प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. कामाची गती राखून नियोजित वेळेआधी प्रकल्प पूर्ण करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या

 

असा आहे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प

 

  • ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत लोणावळा (सिंहगड संस्था) ते खालापूर पथकर नाकापर्यंत मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ करण्याचे काम सुरू आहे.
  • खालापूर टोलनाका ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाचे ८ पदरीकरनाचे ५.८६ कि.मी. चे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. या लांबी मध्ये ३ मोठे पूल. लहान पूल, पाईपकल्व्हर्ट, बॉक्सकल्व्हर्ट अंतर्भूत असून सद्य:स्थितीत ९० टक्के पेक्षा पूर्ण झाले आहे.
  • व्हायाडक्ट क्र. १ मधे ९०० मीटर लांबीचे दोन समांतर पूल असून डाव्या बाजूचे डेस्क स्लॅबचे व उजव्या बाजूच्या खांबांचे (पियर) बांधकाम प्रगतीपथावर आहे. व्हायाडक्टची डावी अंदाजे डिसेंबर २०२२ तसेच उजवी बाजु पुर्ण होण्यासाठी मार्च २०२३ एवढा कालावधी लागणार आहे.
  • बोगदा क्र. १: बोगदा क्र. १ च्या दोन समांतर बोगद्यां पैकी उजव्या बोगद्याचे एकूण १ हजार ५६० मीटरपैकी १ हजार ४५१ मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले असून डाव्या बोगद्याचे एकूण १ हजार ५३० मीटरपैकी १ हजार ४५५ मीटर (पुणेकडे) खोदकाम पूर्ण झाले आहे.
  • व्हायाडक्ट क्र. २: व्हायाडक्टक्र. २ हा ६५० मीटर लांबीचे दोन समांतर केबल स्ट cable stay पूल असून पायलॉनचे काम प्रगती पथावर आहे. यामध्ये एकूण ४ पायलॉन समाविष्ट असून त्याची उंची १८१.७८ मीटर एवढी आहे. हा व्हायाडक्ट सर्वोच्च उंचीच्या व्हायाडक्ट पैकी एक आहे. व्हायाडक्ट पूर्ण होण्याचा अंदाजित कालावधी डिसेंबर २०२३ पर्यंत आहे.
  • बोगदा क्र. २: बोगदा क्र. २ च्या दोन समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याचे एकूण ८ हजार ७७६ मीटर पैकी ७ हजार ६९६ मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले असून डाव्या बोगद्याचे एकूण ८ हजार ८२२ मीटरपैकी ७ हजार ५२९ मीटर (पुणेकडे) खोदकाम पूर्ण झाले आहे. बोगद्यांची रुंदी २३ मीटर असून आशिया खंडातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा होणार आहे. मुंबई व पुणेकडे जाणारे दोन्ही बोगदे दर ३०० मीटर अंतरावर एकमेकांस क्रॉस पँसेजद्वारे जोडण्यात येत आहेत.
  • कुसगाव येथील डायव्हर्जन रोड: कुसगाव येथील बोगदा क्र. २ च्या एक्झीटच्या ठिकाणी सध्याच्या द्रुतगती मार्ग वळण (डायव्हर्जन )मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु असून कामाची डावी बाजू नोव्हेंबर २०२२ व उजवी बाजू डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. हा रस्ता ‘मिसिंग लिंक’चा वापर न करणाऱ्या वाहनांसाठी तसेच लोणावळा येथे जाणाऱ्या वाहनांसाठी वापरण्यात येईल.
  • पथकर नाका विस्तारीकरण: पथकर नाक्यावरील प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले खालापूर व उर्से या दोन पथकरनाक्यांचे विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. या दोन्ही ठिकाणी सध्या असलेल्या दोन्ही बाजूच्या प्रत्येकी ८ ऐवजी १७ पथकर बूथ सुरू होणार आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचे ‘उंदरालय’ सामनातून सरकारवर टीका

News Desk

माहिती देण्यास टाळाटाळ, मुंबई विद्यापीठाला २५ हजार रुपयांचा दंड

News Desk

मोबाइल चार्जिंगला लावून बोलणे जीवावर बेतले

News Desk