ठाणे | मुंबई – ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ठाणे शहरातील कोपरी येथील रेल्वे ओलंडणी पुलाचे (Kopri Railway Over Bridge) लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shind) यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलाच्या रुंदीकरणामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सीमेवरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त जय जित सिंह आदी उपस्थित होते.
या पुलाचे रुंदीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाच्या कामाचा संपूर्ण खर्च एमएमआरडीएमार्फत करण्यात आला आहे. पुलाच्या रेल्वे मार्गिकांवरील भागाचे काम मध्य रेल्वे मार्फत करण्यात आले असून या भागाच्या बांधकामासाठी प्राधिकरणाकडून रेल्वेला निधी देण्यात आला आहे. या पुलाची लांबी ७८४ मीटर तर रुंदी ३७.०४ मीटर इतकी आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावर हा पूल ५+५ मार्गिकांचा आहे तर ठाणे शहरातील कोपरी रेल्वे ओलांडणी पूल हा २+२ मार्गिकांचा होता. या अरुंद रेल्वे ओलांडणी पुलामुळे सकाळी व संध्याकाळच्या वेळेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. ही समस्या दूर करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणामार्फत कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण व बांधकाम करण्यात आले आहे. २+२ पथमर्गिकेच्या पुलाचे ४+४ असे अपग्रेड केल्यामुळे मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वाहतूक कोंडी कमी होऊन त्याचा फायदा पूर्व द्रुतगती महामार्गावरील लहान तसेच अवजड वाहनांना होणार आहे.
या प्रकल्पात नौपाडा जंक्शन ते ज्ञानसाधना कॉलेजपर्यंत महामार्गाखालून वाहनांच्या रहदारीसाठी २+२ मार्गिकांचा ४० मीटर लांब आणि २१.२ मीटर रुंद भुयारी मार्ग देखील बांधण्यात आला आहे. प्रस्तावित नवीन कोपरी स्टेशनला जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्ग, पादचाऱ्यांना पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल देखील बांधण्यात आला आहे. तसेच चिखलवाडी परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्याकरीता, चिखलवाडी नाल्यापासून साठेवाडी नाल्यापर्यंत पर्जन्य जल वहिनीची (स्ट्रॉम वॉटर ड्रेनची) सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बंदिस्त नाल्याचे सुधारीकरण देखील करण्यात आले आहे.
श्रीनिवासन म्हणाले की, कोपरी पूल हा मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. जुना पूल हा अरुंद असल्यामुळे अधिक गर्दीच्यावेळी (पीक अवर्स) मध्ये वाहनचालकांना काही मीटरचा प्रवास करण्यासाठी ३०ते ४० मिनिटे लागत. पूर्व द्रुतगती महामार्गावरील दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. नवीन रुंद पुलामुळे प्रवाशांचा हा वेळ वाचणार आहे. त्यासोबतच तीन हात नाका परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.