मुंबई | मुंबईच्या जे जे रुग्णालयात एका डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्यानंतर मुंबईतल्या अनेक डॉक्टरांनी संताप व्यक्त केला होता. याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप देखील पुकारला होता. हे प्रकरण शांत होते न होते तोपर्यंत चक्क एका डॉक्टरेने रुग्णाला मारहाण केल्याची घटना मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात रविवारी मध्यरात्री घडली आहे. डॉक्टरने चक्क ६ वर्षाच्या मुलाला बॅटरीने मारहाण केली आहे.
अर्धांगवायूचा त्रास होत असल्यामुळे ६ वर्षांचा सुर्यांश गुप्ता सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेत आहे. रविवारी मध्यरात्री रुग्णालयात ऑन ड्युटी डॉक्टर गौरव यांनी रात्री उशिरा तपासासाठी बोलावल्याचा राग काढत सूर्यांशच्या डोक्यावर टॉर्च मारली, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. रविवारी बारा – साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. तर, ही घटना आरटीआय कार्यकर्ते संजय गुरव यांनी उघडकीस आणली आहे. शिवाय,आपल्या मुलाला ज्या डोळ्याच्या डॉक्टरांनी मारले त्याच्याविरोधात आपण तक्रार केली होती. पण, दबावामुळे ती परत घेतली असल्याचेही वडील मुकेशकुमार गुप्ता यांनी सांगितले. तर, आरटीआय कार्यकर्ते संजय गुरव यांनी याबाबत आवाज उठवत रुग्णालयातून सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. ज्यामुळे नेमका काय प्रकार घडला ते समोर येईल.
विक्रोळीत राहणारा सुर्यांश गुप्ताला अचानक हात कापल्यासारखे वाटत होते. त्यामुळे त्याला सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी रात्री बारा – साडेबाराच्या सुमारास ऑनड्युटी डॉक्टर सूर्यांशचे डोळे चेक करण्यासाठी आले होते. पण, सूर्यांश झोपला असल्याकारणाने ते परत गेले. पण, सूर्यांशच्या आईने डॉक्टरांना सांगितले की आला आहात तर त्याचे चेकअप करुन घ्या म्हणजे रिपोर्ट्स मिळतील. त्यानंतर सूर्यांशला जागे केले. पण, तो उठत नसल्यामुळे उपस्थित डॉक्टरने रागाच्या भरात सूर्यांशच्या डोक्याच्या उजव्या बाजूला हातात असलेल्या टॉर्चने मारले. या प्रकरणात सुर्यांश जखमी झाल्यामुळे सूर्यांशच्या डोक्याला ३ टाके पडले आहेत. शिवाय, कोणाला ही घटना माहित पडू नये म्हणून डॉक्टरांनी ३ टाक्याऐवजी एक टाका घातला असल्याचं सूर्यांशचे वडील मुकेशकुमार गुप्ता यांनी सांगितले.
सदर घटनेविषयी माहीती एमआरए मार्ग पोलीस स्थानकांत केवळ लिहून घेण्यात आली आहे. कोणत्याही प्रकराचे एफआयआर अद्याप दाखल करण्यात आलेले नाही. पण, जर त्या डॉक्टरने मुलाला टाके पडेपर्यंत मारले असेल तर पोलिसांनी एफआयआर दाखल केली पाहीजे, असे आरटीआय कार्यकर्ते संजय गुरव यांनी सांगितले. या घटनेविषयी रुग्णालय प्रशासनाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मधुकर गायकवाड यांना माहितीच नसल्याचे गुरव यांनी स्पष्ट केले आहे.
या विषयी बोलताना सुर्यांश चे वडील मुकेशकुमार गुप्ता म्हणाले, घडलेल्या घटनेविषयी रुग्णालय प्रशासनाकडे आम्ही तक्रार केली होती. पण, नंतर डॉक्टरांनी घडलेल्या प्रसंगाबाबत माफी मागितली. शिवाय, पोलिसांनी याप्रकरणी एपीआर वगैरे लिहून घेतलाय. पण, एफआयआर अद्याप दाखल झालेली नाही अशी माहीती त्यांनी बोलताना दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.