HW News Marathi
मुंबई

आरोग्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई | मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाने पुन्हा संधी नाकारल्यामुळे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे डॉ दीपक सावंत यांनी राजीनामा सुपूर्द केला. परंतु मुख्यमंत्र्यांनी मात्र सावंत यांना राजीनामा देऊ नका असे म्हणत थांबवण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी दीपक सावंत यांना मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीला हजर रहायला सांगितले आहे. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याआधी सावंत यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला. मुंबई पदवीधर मतदारसंघातून होणाऱ्या निवडणुकीच्या उमेदवाराबाबत मोठा निर्णय घेताना शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तडकाफडकी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

शिवसेनेने पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विलास पोतनीस शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख आहेत त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सावंत यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्यामुळे पक्षप्रमुखांनी सावंत यांना उमेदवारी नाकारली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना युवासेनेची सावंतांवर असलेली नाराजी उमेदवारी नाकारण्याची मुख्य कारण असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. सावंत यांच्या आमदारकीचा कार्यकाळ येत्या ७ जुलै रोजी संपत असल्याने त्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून दूर व्हावे लागणार होते. मात्र आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळाली नाही या रागातून सावंत यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. पक्षप्रमुखांनी राजीनामा स्वीकारला असला तरीही याबाबत पुढील सोपस्कार हे राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वीकारल्यानंतरच होणार आहेत.

Related posts

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या मेट्रो मार्गिकेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

Aprna

मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय

News Desk