धनंजय दळवी, ठाणे | ठाण्यातील एनइटीटी पॅरामेडिकल कॉलेज आणि कॉलेजची युनिव्हर्सिटी फेक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यातील एनईटी प्यारमेडिकल कॉलेज हे राजस्थानच्या चुरू विद्यापीठाच्या अंतर्गत चालवले जात आहे. गेल्या ४ वर्षांपासून ह्या कॉलेजमध्ये फार्मसीचे कोर्स घेतले जात आहेत. परंतु, हे कोर्स घेण्यासाठी युजीसीची कोणतीही परवानगीच ह्या विद्यापीठाला मिळालेली नाही. त्यामुळे अर्थातच हे काॅलेज गेल्या ४ वर्षांपासून विद्यार्थ्यांची फसवणूक करून पैसे उकळत असल्याचा आरोप विद्यार्थी व्यक्त करत आहे. या प्रकरणातील एक गंभीर बाब म्हणजे या कॉलेजने विद्यार्थ्यांची फी ही डीडीच्या स्वरूपात न घेता रोखीने घेतली आहे.
कॉलेजचे प्राचार्य टी. रामाणी यांच्याविरुद्ध उद्या छेडणार आंदोलन
ठाण्यातील एनइटी पॅरामेडिकल कॉलेजचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या २०० विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. या कॉलेजमध्ये फेक डिग्री सर्रासपणे दिली जात असल्याची तक्रार खुद्द विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. “आमचे शैक्षणिक नुकसान केल्या प्रकरणी कॉलेजचे प्राचार्य टी. रामाणी आणि विद्यापीठाचा जोगिंदर सिंह याना ताबडतोब अटक करावी, विद्यार्थ्यांची घेतलेली फी आणि डोनेशन परत करावे, नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक महिन्याला 30 हजार प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात यावे आणि ह्या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी”, अशी मागणी करत या कॉलेजचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक कॉलेजचे प्राचार्य टी. रामाणी यांच्याविरुद्ध उद्या (६ मे) आंदोलन छेडणार असल्याची माहिती मिळत आहे.
विद्यापीठाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण, उगारली कुऱ्हाड
मुंबईतील छात्रभारती,महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशन अशा अनेक शैक्षणिक संघटनांनी या प्रकरणी या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला आहे. हे कॉलेज राजस्थानच्या चुरू विद्यापीठाच्या अंतर्गत चालवले जात असल्याने काही विद्यार्थ्यांनी ह्या विद्यापीठाबाबत माहिती घेण्यासाठी थेट राजस्थान गाठले. परंतु, तेथे चक्क विद्यार्थ्यांवर मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर चक्क कुऱ्हाड उगारण्यात आली. या प्रकरणी या विद्यार्थ्यांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली. परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे हे विद्यार्थी उद्या ठाण्यात तीव्र आंदोलन करणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.