HW News Marathi
देश / विदेश

तब्बल 150 वर्ष ‘इथे’ होळी साजरी झालीच नाही; धक्कादायक कारण आलं समोर

मुंबई | भारतात इतर सणांप्रमाणे होळी हा देखील एक महत्वाचा सण आहे. हिंदू पंचांगानुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंगांचा हा सण दोन दिवसाचा असून पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते तर दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते, ज्याला आपण धूलिवंदन असं म्हणतो. दरम्यान कोरोना काळानंतर तब्बल 2 वर्षांनी लोकांना हा सण आता साजरा करायला मिळणार आहे. सध्याची कोरोना परिस्थिती पाहिली तर दिवसेंदिवस रुग्ण संख्या ही कमी होताना पाहायला मिळतेय. त्या पार्श्वभूमीवर आता निर्बंध सुद्धा शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी रंग खेळण्यासाठी सारेच जण फार उत्सुक आहेत. पण, भारतात अशी दोन गावं आहेत जिथे गेल्या १५० वर्षांपासून होळी साजरीच झाली नाहीये. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल. पण होय, हे खरं आहे आणि याचं कारणही तितकंच धक्कादायक आहे.

प्रत्येक ठिकाणाची वेगळी अशी प्रथा-परंपरा असते. पण भारतात असे दोन गाव आहेत जिथे होळी साजरी न करण्याची प्रथा आहे. तर जिथे होळी साजरी होत नाही ती दोन गावं ही छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात वसलेली आहेत. कोरबा जिल्ह्यातील ही गावं आहेत खरहरी आणि धामणगुडी. या गावात होळीच्या दिवशी गोड पदार्थ केले जातात मात्र होलिका दहन केलं जात नाही. यापैकी खरहरी हे गाव कोरबा जिल्ह्यापासून साधारण ३५ किलोमीटर दूर आहे. तर धामणगुडी हे गाव कोरबापासून २० किमी अंतरावर आहे. या दोन्ही गावात गेल्या १५० वर्षांपासून होळी खेळली जात नाही. ना रंग, गुलाल खेळले जातात. इथली मुलं दिवाळी, रक्षाबंधन, नवरात्री-दसरा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी करतात. पण होळी म्हणजे काय, हे त्यांना माहीत नाही. येथील ८ ते १० वर्षे वयोगटातील मुलांनी कधीही रंगांची होळी खेळली नाही.

एवढेच नाही तर या गावात राहणाऱ्या तीन पिढ्यांतील लोकांची हीच अवस्था आहे. या गावात होलिका दहन होत नाही की दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. ना नाच ना गाणी. १५० वर्षांहून अधिक काळ येथे अंधश्रद्धेमुळे उत्सव साजरा केला जात नाही. गावात रंग खेळले गेले तर रोगराई किंवा साथीचे रोग पसरतात, अशी ग्रामस्थांची धारणा आहे. तर होलिका दहन केल्यावर गाव पेटेल, अशी भीती आजही नागरिकांच्या मनात कायम आहे. या समजुतीमुळे इथल्या लोकांच्या जीवनातून होळीचा सण पूर्णपणे गायब झाला आहे. त्यामुळे गावातील दुकानांमध्ये गुलाल किंवा रंग विकले जात नाही, ना दुकानात पिचकाऱ्या दिसतात.

या गावात लग्न होऊन आलेल्या सुनाही कधी होळी खेळत नाहीत. गावात सून म्हणून आलेल्या स्त्रिया लग्नापूर्वी आपापल्या गावात होळी साजरी करायच्या, रंग खेळायच्या. मात्र लग्नानंतर सासरी आल्यावर येथे होळी साजरी केली जात नाही. त्यामुळे होळीच्या दिवशी रंग खेळता येणार नाही. म्हणून काही स्त्रिया या सणाच्या दिवशी आपल्या माहेरी जातात. मात्र होळीच्या दिवशी या गावात घरोघरी गोडधोडाचे पदार्थ बनवले जातात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काँग्रेसमध्ये डरपोक लोकांची गरज नाही; असतील तर पक्षातून बाहेर पडून RSS मध्ये जावं”- राहूल गांधी

News Desk

स्टॅलिन यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

News Desk

आर्थिक निकषावर आरक्षण, केंद्रात प्राथमिक चर्चा

News Desk