HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून संबोधन !

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2020

माझ्या प्रिय देशबांधवानो, कोरोना विरुद्धचा भारताचा लढा अधिक ताकदीने आणि दृढतेने लढला जात आहे. आपली तपश्चर्या, आपला त्याग, संयम यामुळे, भारत आतापर्यंत, कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात यशस्वी ठरला आहे. आपण सर्वांनी, कष्ट झेलून आपला देश वाचवला आहे, आपल्या भारताचे संरक्षण केले आहे.आपल्याला किती अडचणी आल्या, हे मी जाणतो. कोणाला जेवणासाठी त्रास, कोणाला येण्या-जाण्याचा त्रास तर कोणी घरापासून-कुटुंबापासून दूर. मात्र, आपण देशासाठी,एका शिस्तबद्ध जवानाप्रमाणे,आपले कर्तव्य निभावत आहात.

आपल्या संविधानात,’आम्ही भारताचे लोक’,ही जी शक्ती सांगितली गेली आहे ती हीच तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आपणा सर्व भारतवासियांकडून,आपल्या सामुहिक शक्तीचे हे दर्शन, हा संकल्प, हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे. प्रत्येक आव्हानावर, आपली संकल्प शक्ती आणि परिश्रम यांच्या बळावर मात करण्याची प्रेरणा, बाबासाहेबांचे जीवन आपल्याला देते. सर्व देशवासीयांच्या वतीने मी बाबासाहेबांना नमन करतो.

मित्रहो,

देशाच्या विविध भागात,वेगवेगळ्या सणांचा हा काळ आहे. बैसाखी,पोहेला बैशाख, पुथांडू, बोहाग बिहू, विशू यासह अनेक राज्यात नव वर्षाची सुरवात झाली. लॉक डाऊनच्या काळात, देशातली जनता ,ज्या प्रकारे नियमांचे पालन करत, ज्या संयमाने,आपल्या घरात राहूनच सण साजरे करत आहे ते अतिशय प्रशंसनीय आहे. नव वर्षानिमित्त मी आपणा सर्वांना उत्तम आरोग्य चिंतितो.

मित्रहो,

आज संपूर्ण जगभरात कोरोना महामारीची जी परिस्थिती आहे ती आपण जाणताच. इतर देशांच्या तुलनेत, भारताने आपल्याकडे याचा संसर्ग रोखण्यासाठी कसे प्रयत्न केले, यात आपण सहभागीही आहात आणि साक्षीदारही आहात. जेव्हा आपल्याकडे कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता त्याच्या आधीपासूनच भारताने, कोरोना प्रभावित देशांमधून येणाऱ्या प्र्वाश्यांसाठी विमानतळावर स्क्रीनिग सुरु केले होते. कोरोना रुग्णांची संख्या शंभर वर पोहोचण्याआधीच भारताने परदेशातून आलेल्या प्रत्येक प्र्वाश्यासाठी 14 दिवसांचे विलगीकरण अनिवार्य केले होते. अनेक ठिकाणी, मॉल, क्लब, जिम बंद करण्यात आले होते.

मित्रहो,

आपल्याकडे कोरोनाचे केवळ 550 रुग्ण होते तेव्हाच भारताने 21 दिवसांचा संपूर्ण लॉक डाऊन करण्याचे मोठे पाऊल उचलले. भारताने, समस्या वाढण्याची वाट पहिली नाही, तर समस्या दिसल्याबरोबर तत्परतेने निर्णय घेऊन ही समस्या रोखण्याचा प्रयत्न केला.

मित्रहो,

हे असे एक संकट आहे ज्यामध्ये,कोणत्याही देशाशी तुलना करणे योग्य नाही. तरीही, हे सत्य आहे की जगातल्या मोठ-मोठ्या सामर्थ्यवान देशांमध्ये,कोरोनाशी संबंधीत आकडेवारी पाहिली तर आज भारतात स्थिती खूपच सांभाळलेली आहे. महिना- दीड महिन्यापूर्वी काही देश कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारताप्रमाणेच होते. आज त्या देशांमध्ये, भारताच्या तुलनेत कोरोनाची प्रकरणे 25 ते 30 पटीने अधिक आहेत. त्या देशांमध्ये हजारो लोकांचा दुखःद मृत्यू झाला आहे.

भारताने समग्र दृष्टीकोन स्वीकारला नसता, एकात्मिक दृष्टीकोन स्वीकारला नसता, वेगाने निर्णय घेतले नसते तर आज भारताची परिस्थिती काही वेगळीच असती. मात्र गेल्या दिवसांच्या अनुभवातून हे स्पष्ट आहे की आपण जो मार्ग निवडला आहे तो योग्य आहे. सोशल डीस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचा मोठा फायदा देशाला झाला आहे. जर केवळ आर्थिक दृष्टीकोनातून पाहिले तर आता हे महाग नक्कीच वाटते, मात्र भारतवासीयांच्या जीवनापुढे कशाचीही तुलना होऊ शकत नाही. मर्यादित संसाधने असून, भारत ज्या मार्गावरून वाटचाल करत आहे, त्या मार्गाची आज जगभरात चर्चा होत आहे. देशातल्या राज्य सरकारांनीही यामध्ये खूप जबाबदारीने काम केले आहे. चोवीस तास परिस्थिती सांभाळली आहे.

मात्र मित्रहो,

हे सर्व प्रयत्न करूनही, कोरोना ज्या प्रकारे पसरत आहे, त्याने,जगभरातले आरोग्य तज्ञ आणि सरकारांना अधिक सतर्क केले आहे. भारतात,कोरोना विरोधातली लढाई पुढे कशी न्यायची याबाबत मी राज्यांशी सातत्याने चर्चा करत आहे. सर्वांचा हाच प्रस्ताव आहे की लॉक डाऊन वाढवला जावा. काही राज्यांनी तर आधीच लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो,

सर्व सूचना लक्षात घेऊन भारतात लॉकडाउन आता 3 मे पर्यंत आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच 3 मे पर्यंत आपल्याला सर्वाना , प्रत्येक देशवासियाला लॉकडाउनमध्येच राहावे लागणार आहे. या काळात आपल्याला त्याचप्रकारे शिस्तीचे पालन करायचे आहे, जसे आपण आतापर्यंत करत आलो आहोत.

मी सर्व देशवासियांना विनंती करतो कि आता आपल्याला कोरोना विषाणूचा कुठल्याही परिस्थितीत नव्या परिसरांमध्ये फैलाव होऊ द्यायचा नाही. स्थानिक पातळीवर आता एक जरी रुग्ण वाढला तर ती आपल्यासाठी चिंतेची बाब ठरायला हवी. कुठेही कोरोनामुळे एखाद्या रुग्णाचा जरी दुःखद मृत्यू झाला तरी आपली चिंता आणखी वाढायला हवी. म्हणूनच आपल्याला हॉटस्पॉट संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात सतर्क राहावे लागणार आहे. जी ठिकाणे हॉटस्पॉट मध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे, तिथल्या परिस्थितीवर देखील आपल्याला बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे.

नवीन हॉटस्पॉट तयार झाले तर आपली मेहनत आणि आपल्या तपस्येसमोर आणखी आव्हाने निर्माण होतील. म्हणूनच पुढील एक आठवडा कोरोना विरोधातील लढाईत नियमांचे पालन अधिक कठोर केले जाईल 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक शहर, प्रत्येक पोलीस ठाणे, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्याचे मूल्यमापन केले जाईल, तिथे लॉकडाउनचे किती पालन होत आहे, तिथल्या विभागाने कोरोनापासून स्वतःचा किती बचाव केला आहे, हे पाहिले जाईल.

जे क्षेत्र या अग्निपरीक्षेत यशस्वी होईल, जे हॉटस्पॉटमध्ये नसतील, आणि जे हॉटस्पॉटमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता देखील कमी असेल, तिथे 20 एप्रिलपासून काही आवश्यक गोष्टींसाठी अनुमती दिली जाऊ शकते. मात्र लक्षात ठेवा, ही अनुमति सशर्त असेल. बाहेर पडण्यासाठीचे नियम अतिशय कठोर असतील. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन झाले, कोरोनाचा रुग्ण आढळला तर सर्व अनुमती त्वरित मागे घेतली जाईल. म्हणूनच स्वतः बेपर्वाईने काही करायचे नाही आणि अन्य कुणालाही बेपर्वाईने वागू द्यायचे नाही. उद्या या संदर्भात सरकारकडून एक विस्तृत मार्गदर्शक नियमावली जारी केली जाईल.

मित्रांनो,

20 एप्रिलपासून निवडक क्षेत्रात या मर्यादित सवलतीची तरतूद आपल्या गरीब बंधू-भगिनींची उपजीविका लक्षात घेऊन करण्यात आली आहे. जे रोज कमवतात, रोजच्या कमाईने आपल्या गरजा भागवतात, ते माझे विस्तारित कुटुंब आहे. त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी कमी करणे हे माझ्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून सरकारने त्यांना मदत करण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. आता नवीन मार्गदर्शक नियमावली बनवताना देखील त्यांच्या हिताचा पूर्ण विचार करण्यात आला आहे. सध्या रब्बी पिकांच्या कापणीची कामे सुरु आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत.

मित्रांनो,

देशात औषधांपासून रेशन पर्यंत सर्व गोष्टींचा पुरेसा साठा आहे, पुरवठा साखळीतील अडचणी नियमितपणे दूर केल्या जात आहेत. आरोग्यविषयक पायाभूत सुविधांच्या आघाडीवरही आपण वेगाने पुढे वाटचाल करत आहोत. जानेवारी महिन्यात आपल्याकडे कोरोनाच्या चाचणीसाठी केवळ एकच प्रयोगशाळा होती, तिथे आज 220 पेक्षा अधिक प्रयोगशाळांमध्ये चाचणी होत आहे. जगाचा अनुभव सांगतो कि कोरोनाचे 10 हजार रुग्ण झाले तर पंधराशे-सोळाशे खाटांची गरज भासते. भारतात आज आपण एक लाखांहून अधिक खाटांची व्यवस्था केलेली आहे. एवढेच नाही, 600 हून अधिक रुग्णालये अशी आहेत जिथे केवळ कोविडवर उपचार केले जात आहेत. या सुविधा अधिक जलद गतीने वाढवल्या जात आहेत.

मित्रांनो,

आज भारताकडे भलेही मर्यदित संसाधने असतील, मात्र मी भारताच्या तरुण वैज्ञानिकांना खास विनंती करतो कि जगाच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या कल्याणासाठी पुढे या, कोरोनाची लस बनवण्याचा विडा उचला.

मित्रानो,

आपण धीराने वागलो, नियमांचे पालन केले तर कोरोना सारख्या महामारीचा समूळ नायनाट करू शकू. याच विश्वासासह शेवटी मी आज 7 गोष्टींसाठी तुमची साथ मागत आहे –

पहिली गोष्ट –

आपल्या घरातील वयोवृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्या

– विशेषतः अशा व्यक्ती ज्यांना जुने आजार असतील , त्यांची आपल्याला विशेष काळजी घायची आहे, त्यांचे कोरोनापासून रक्षण करायचे आहे.

दुसरी गोष्ट –

लॉकडाउन आणि सोशल डिस्टंसिंगच्या लक्ष्मणरेषेचे पूर्णपणे पालन करायचे आहे, घरी बनवण्यात आलेले मास्क किंवा चेहऱ्याच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेले फेसकवर यांचा वापर अनिवार्य आहे.

तिसरी गोष्ट –

आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालय द्वारा देण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करा.

गरम पाणी, काढा नियमितपणे घेत राहा,

चौथी गोष्ट –

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत करण्यासाठी आरोग्य सेतु मोबाइल App अवश्य डाउनलोड करा . इतरांना देखील हे ऍप्प डाउनलोड करण्यासाठी प्रोत्साहन द्या.

पाचवी गोष्ट –

जेवढे शक्य असेल तेवढी गरीब कुटुंबांची काळजी घ्या, त्यांच्या जेवणाच्या गरजा पूर्ण करा.

सहावी गोष्ट –

तुम्ही तुमचा व्यवसाय, तुमच्या उद्योगात तुमच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांप्रति संवेदना बाळगा, कुणालाही नोकरीवरून काढून टाकू नका.

सातवी गोष्ट –

देशातील कोरोना योद्धे , आपले डॉक्टर- नर्सेस, सफाई कर्मचारी -पोलीस कर्मचारी यांचा पूर्ण आदर करा.

मित्रांनो,

अतिशय निष्ठेने 3 मे पर्यंत लॉकडाउनच्या नियमांचे पालन करा , जिथे आहात तिथेच राहा, सुरक्षित रहा.

वयं राष्ट्रे जागृयाम”,

आपण सर्व राष्ट्राला जीवंत आणि जागृत ठेवू याच इच्छेसह मी माझे भाषण संपवतो.

खूप-खूप धन्यवाद !!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान झाले शांतिदूत

Gauri Tilekar

आम्हाला कोणीही तोडू शकत नाही, आम्ही मजबूत आहोत, आम्ही युक्रेनियन आहोत! – व्होदिमर झेलेन्स्की

Aprna

‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ची आज पहिली बैठक होणार

News Desk