HW News Marathi
देश / विदेश

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?, गांधी परिवाराच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

नवी दिल्ली | देशाच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या पदासाठी पुढे येत आहे. तर दुसरीकडे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या शरद पवारांशी, गांधी कुटुंबीयांशी वाढलेल्या गाठीभेटी काही औरचं संकेत देताना दिसत आहेत. प्रशांत किशोर यांनी काल (१३ जुलै) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राजकीय रणनीती करण्याच्या कामातून संन्यास घेण्याची पीके यांनी आधीच घोषणा केली होती. त्यामुळे ते सक्रिय राजकारणात येण्याच्या चर्चेला अधिकच बळ मिळत आहे.

प्रशांत किशोर यांनी काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्याशीही ऑनलाईन संवाद साधला असं सांगितलं जात आहे. केसी वेणुगोपालही या बैठकीला उपस्थित होते. तब्बल तासभर ही बैठक चालली. या बैठकीत देशाचा राजकीय कल, देशातील काँग्रेसची सध्याची स्थिती आणि त्यावरील उपाय यावरही या बैठकीत चर्चा झाली असल्याचं सांगितलं जात आहे.

पवारांचा विषय निघाला नाही

प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांच्यात पंजाबमधील वादावर चर्चा झाली नसल्याचं सांगण्यात येतं. विविध राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या स्थितीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, यूपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रे शरद पवारांकडे देण्यावर या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसचा लोकसभेतील नेता बदलण्यात येणार नाही. या अधिवेशनात काँग्रेसचे लोकसभेतील नेते म्हणून अधीर रंजन चौधरीच काम पाहतील, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.

प्रशांत किशोरांनी दिले संकेत

पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून काम करणार नसल्याचं प्रशांत किशोर यांनी सांगितलं होतं. सध्या सुरू असलेलं काम पुढे सुरू ठेवण्याची इच्छा नाही. या क्षेत्रात मी पुरेसं काम केलं आहे. आता थांबण्याची आणि आयुष्यात वेगळं काही करण्याची वेळ आहे. त्यामुळे मी हे काम सोडण्याचं ठरवलं आहे, असं पीके यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं होतं.

2017मध्ये उत्तर प्रदेशातील निवडणुकीवेळी प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांची पहिल्यांदा भेट झाली होती. उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रशांत किशोर यांची रणनीती काही चालली नव्हती. काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पाच वर्षानंतर प्रशांत किशोर पुन्हा एकदा राहुल गांधींना भेटले आहेत. पण या भेटीऐवजी प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांनीच अधिक जोर धरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संजय राऊत,निर्लज्जपणालाही मर्यादा असतात…’ भाजपचे नेते का खवळले ?

News Desk

जुलै महिन्यात दीड लाख शाखांची पोस्टल बँक होणार सुरू

News Desk

“सरकारनं भींती उभारायचं काम करु नये”, राहूल गांधींचा केंद्राला खोचक सल्ला

News Desk