HW News Marathi
देश / विदेश

गुलाम नबी आझाद यांच्या कार्याला उजाळा देत शरद पवारांनी सांगितला एक किस्सा

नवी दिल्ली | कॉंग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांच्यासह आज (९ फेब्रुवारी) ४ खासदार राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या कार्याचा आढावा घेतानाच त्यांच्याशी असलेल्या व्यक्तिगत मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवारांनीही या आठवणींना उजाळा देताना आझाद यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यात आपण कसे अपयशी झालो याचा किस्साही ऐकवला.

शरद पवार यांनी राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गुलाम नबी आझाद यांना पाडण्यासाठी कसा प्रयत्न केला याचा किस्साही ऐकवला. ते म्हणाले की, १९८२ च्या निवडणुकीची ही गोष्ट आहे. गुलाम नबी आझाद हे जम्मू-काश्मीरमधून येतात. पण ते महाराष्ट्रातील वाशिम सारख्या दुर्गम भागातून निवडणुकीला उभे राहिले. खरे तर वाशिम सारख्या मागास भागातून निवडणूक लढवण्याची त्याकाळात कोणीच हिंमत करत नसायचे. त्याकाळात आझाद यांनी ही हिंमत दाखवली आणि त्यांनी निवडणूक लढली. त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो. आम्ही ठरवलं, आझाद यांना निवडून द्यायचं नाही. त्यांना पाडायचं. आम्ही खूप प्रयत्न केला. आझाद यांच्या विरोधात प्रचाारचं रान उठवलं. पण तरीही आझाद निवडून आले. त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांचं आणि वाशिमकरांचं अतूट नातं निर्माण झालं आहे.

देशहिताला महत्त्व देणारा नेता

गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभा, लोकसभेतही खासदार म्हणून काम पाहिलं. त्यांनी मंत्री म्हणून अनेक खात्याचा कारभार पाहिला. जवळजवळ सर्व समित्यांवर काम करणारा एकमेव नेता म्हणूनही आझाद यांच्याकडे पाहिले जाते. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. संसदीय आणि राजकीय अनुभव असलेले आझाद हे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी देशहितासाठी नेहमीच महत्त्व दिलं आहे. देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. आज काश्मीरमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे. अशा वातावरणात आझाद यांची गरज असताना ते राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यांची आजही गरज आहे. त्यांची जागा घेणं कठीण आहे. उद्या काश्मीरमध्ये निवडणुका झाल्यास ते परत संसदेत येतील अशी आशा आहे, असंही पवार म्हणाले.

राज्यसभेतील गुलाम नबी आझाद, शमशेर सिंह, मीर मोहम्मद फैयाज, नादिर अहमद हे सदस्य निवृत्त होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या नेत्यांच्या कार्याचा आढावा घेतला. या सर्व जणांनी राज्यसभेचा गौरव वाढवण्याचं काम केले. त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान याचा देशाला फायदा झाला. या सर्वांनी त्यांच्या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा आभारी आहे, असं मोदी म्हणाले. गुलाम नबी आझाद ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मी देखील एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी आमच्यामध्ये जवळचे संबंध होते. ज्यावेळी गुजरातच्या यात्रेकरुंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यामध्ये 8 लोक मारले गेले. त्यावेळी पहिल्यांदा गुलाम नबी आझाद यांचा फोन आला होता. तेव्हा ते अश्रू रोखू शकले नव्हते. त्यावेळी गुलाम नबी आझाद आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुजरातच्या लोकांसाठी केलेले प्रयत्न विसरू शकत नाही. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती अडकल्यासारखं काम केले, असं सांगताना नरेंद्र मोदीही भावूक झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारच्या पार

News Desk

‘माझी एकुलती एक मुलगी राजकारणापासून कोसो दूर आहे आणि राहील’, जितेंद्र आव्हाडांचा योगींना टोला

News Desk

भारताकडून अफगाणमध्ये अडकलेल्या नागरिकांना एरलिफ्ट!

News Desk