HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

समाजातील व्यसनाधीनतेच्या विरोधात ‘ती’ खंबीरपणे उभी

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाच्या समस्या आपल्याला पूर्णपणे माहित असतात. पण काही जण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. तर काही जण त्या समस्या सोडविण्यासाठी आपले संपूर्ण जीवन खर्ची घालतात. आपल्या समाजाची अशीच एक मोठी समस्या म्हणजे व्यसनाधीनता. आपल्या समाजातील तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. उद्याचा समाज कसा असेल हे जर पाहायचे असेल तर त्या समाजातील तरुणांकडे पहा, असे म्हटले जाते. एवढी मोठी जबाबदारी तरुणांच्या खांद्यावर असताना त्याच तरुणांनी असे नशेच्या आहारी जाऊन कसे चालेल ? म्हणूनच ही स्थिती बदलण्यासाठी मुंबईत वास्तव्यास असलेल्या वर्षा विद्या विलास या समाजातील नशामुक्तीच्या प्रश्नावर काम करीत आहेत.

या नशेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला त्यातून बाहेर काढण्यासाठी विविध लोकांकडून आणि विविध स्तरावर काम केले जात आहे. शासकीय पातळीवर विविध योजना राबविल्या जातात. वर्षा यांच्या म्हणण्यानुसार समाजातील व्यसनाधीनतेची समस्या लक्षात घेता जर परिस्थितीत बदल झाला नाही तर इथून पुढे आणखी वाईट स्थिती उद्भवू शकते. यामुळे केवळ त्या व्यसन करणाऱ्या व्यक्तीचीच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत होऊ शकते. ‘नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य’ या संस्थेचा मूळ उद्देश हा समाजात मतपरिवर्तन घडविणे आणि व्यसनमुक्ती आणणे हा आहे.

वर्षा यांच्यासाठी त्यांच्या घरातील वातावरणच अधिक प्रेरणादायी ठरले. वर्षा विद्या विलास या स्त्री-पुरुष समानतेचे वातावरण असलेल्या घरात लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. त्यांना पहिल्यापासूनच त्यांच्या कुटुंबाने एक मुलगी म्हणून नव्हे तर माणूस म्हणून घडविले. त्यामुळे वर्षा यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन पहिल्यापासून संपूर्ण वेगळा होता. वर्षा यांच्या घरात कायम सामाजिक मुद्द्यांवर चर्चा होत असे.

नाशमुक्तीसाठी जर काम करायचे असेल तर आधी नशा करणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे ठरते. एखादे व्यसन हे आयुष्यभरासाठी आपला आधार बनू शकत नाही ही गोष्ट त्या व्यक्तीला समजाविणे हे मोठे आव्हान असते. नशाबंदी मंडळाचे कार्यकर्ते संपूर्ण राज्यांतील विविध गावात, जिल्ह्यात तसेच शाळा, कॉलेज, सार्वजनिक उत्सव मंडळात एवढेच नव्हे तर कारागृहात जाऊन देखील काम करतात. वेगवेगळे संदेश देणारी पोस्टर्स, गाणी, पथनाट्य तयार करणे, शॉर्टफिल्म्स आईनी डॉक्युमेंट्री तयार करणे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देणे अशा सर्व पद्धतीतून व्यसनमुक्तीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

एकीकडे अनेक लोक ‘प्रतिष्ठा’ म्हणून व्यसनाला सुरुवात करतात आणि पुढे त्या व्यसनाच्या आधीन होऊन जातात. तर दुसरीकडे कष्टकरी वर्गातील लोक त्यांच्या अति मेहनतीच्या कामांमुळे नशेच्या आहारी जाताना दिसतात. मेहनतीच्या कामांतून होणाऱ्या त्रासाचा विसरण्यासाठी विडी, सिगरेट, दारू अशा व्यसनांचा आधार घेतला जातो. या व्यसनांमुळे ते व्यसन करणारी केवळ एक व्यक्तीच उध्वस्त होत नाही तर तिच्याबरोबर तिचे कुटुंबही उध्वस्त होते. या सर्व कारणांचा सखोल अभ्यास करून वर्षा यांनी या व्यसनमुक्तीच्या कार्याला सुरुवात केली.

नशाबंदी मंडळाकडून तीन टप्प्यात काम केले जाते. पहिल्या टप्प्यात नशाबंदी मंडळाकडून व्यक्तीला व्यसन लागूच नये यासाठी प्रतिबंधात्मक स्तरावर काम केले जाते. दुसऱ्या टप्प्यात ज्या व्यक्ती नुकत्याच व्यसनाच्या आहारी जाण्यास सुरुवात झाली आहे त्या व्यक्तींचे समुपदेशन करतात. त्यानंतर अंतिम म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात जे व्यसनांच्या पूर्ण आहारी गेले आहेत. नशाबंदी मंडळाकडून वैद्यकीय मदत केली जाते.

गेल्या ५९ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात २५ पदाधिकारी, ४० संघटक व ५०० स्वयंसेवक ‘नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यात’ यांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. केंद्र शासनाने ‘नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य’च्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांचा ‘राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०१८’ ने गौरव केला आहे. त्याचबरोबर आजपर्यंत महात्मा गांधी व्यसन मुक्ती पुरस्कार, लीडर ऑफ हिंदुस्थान पुरस्कारही मिळाले आहेत. तसेच नशाबंदी मंडळाला हा राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारांनंतर आता आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याची भावना वर्षा यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या समाजात असंख्य समस्या असतातच पण अनेक लोक या समस्यांसह जगण्यात समाधान मानतात. मात्र समाजात थोडकी अशीही लोक असतात जी या समस्यांशी लढण्याचा प्रयत्न करत एका चांगल्या समाजाचे स्वप्न पाहतात. वर्षा विद्या विलास या अशाच चांगल्या समाजाचे स्वप्न पाहणाऱ्यांपैकी एक. व्यसनासारख्या गंभीर समस्येपासून समाजाला मुक्त करण्यासाठी वर्षा यांनी त्यांचे संपूर्ण जीवन वाहून घेतले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समाजसुधारक रमाबाई रानडे

News Desk

संध्या चौगुले यांचा अनोखा प्रवास, १८ वर्षात ६० हजाराहून अधिक वृक्षारोपण

swarit

‘ती’ने परिस्थितीवर मात करत, जगासमोर ठेवला नवा आदर्श

News Desk