HW News Marathi
राजकारण

इतक्या वर्षांनंतर मोदी यांच्या तोंडून राममंदिराचा उच्चार तरी झाला!

मुंबई | अयोध्येत जे येतात त्यांचे मनोरथ पूर्ण होते, असे सांगतात. आम्ही अयोध्येत आलो ते वैयक्तिक आणि राजकीय मनोरथ घेऊन नाही, तर आपल्या अयोध्येतच वनवास भोगणाऱ्या श्रीरामाच्या हक्काच्या मंदिरासाठी. अयोध्यावासीयांनी आमचे प्रेमाने आगत स्वागत केले, ‘झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, फुले उधळली. काँग्रेसचा अडथळा असतानाही नोटाबंदीची बाबरी उभारली. काँग्रेसचा अडथळा असतानाही जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्तीबरोबर सरकार स्थापन केले होतेच ना? अनेक वेळा काँग्रेसला फोडून व झोपवून अडथळे दूर केले. मग राममंदिराचा अडथळा काय आहे? ,असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी असे देखील म्हणाले की, मोदी सरकारला राम मंदिराचा विसर पडला होता. परंतु सेनेच्या अयोध्या दौऱ्याने त्यांच्या तोंडून राम मंदिराचा उच्चार तरी झाला. आमची अयोध्या यात्रा सफल झाली. ते उठले, त्यांना जाग आली!

सामनाचे आजचे संपादकीय

राममंदिर बांधायचे वचन काँग्रेसचे नसून भाजपचे आहे. अयोध्येचा राजकीय आखाडा होऊ नये. 2019 पूर्वी रामाचा वनवास संपावा यासाठी आणि मंदिरनिर्मितीच्या वचनाचा ज्यांना विसर पडला आहे त्यांना त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही अयोध्येत गेलो. आमच्या अयोध्येतील ललकारीनंतर राजस्थानातील प्रचारसभेत तर पंतप्रधान मोदी यांनी राममंदिराचा उल्लेख केला. चला, इतक्या वर्षांनंतर मोदी यांच्या तोंडून राममंदिराचा उच्चार तरी झाला. आमची अयोध्या यात्रा सफल झाली. ते उठले, त्यांना जाग आली!

सफल मनोरथ होहिं तुम्हारे।

राम लखन सुनि भए सुखारे।।

अयोध्येत जे येतात त्यांचे मनोरथ पूर्ण होते, असे सांगतात. आम्ही अयोध्येत आलो ते वैयक्तिक आणि राजकीय मनोरथ घेऊन नाही, तर आपल्या अयोध्येतच वनवास भोगणाऱ्या श्रीरामाच्या हक्काच्या मंदिरासाठी. अयोध्यावासीयांनी आमचे प्रेमाने आगत स्वागत केले, ‘झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, फुले उधळली. त्यामुळे आम्ही आनंदी झालो असलो तरी रामजन्मस्थानी वनवास भोगणाऱ्या रामप्रभूंची व्यथा घेऊन आम्ही महाराष्ट्रात परतलो आहोत. आमच्या अयोध्या दौऱ्याने एक काम मात्र नक्कीच झाले, राममंदिरप्रश्नी जे झोपले होते त्यांनी कूस बदलली नाही, पण डोळे मात्र उघडले आहेत. राममंदिराविषयी जुमलेबाजी आणि थापेबाजी चालणार नाही याची जाणीव सगळ्यांनाच झाली. पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानातील एका प्रचार सभेत असे सांगितल्याचे कळते समजते की, अयोध्येत राममंदिर बांधायचे आहे, पण काँग्रेस पक्ष याप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करीत आहे. काँग्रेसच्या या आडकाठीमुळेच राममंदिराच्या खटल्याला विलंब होत आहे, असेही मोदी म्हणाले. मोदी यांनी गांधी परिवार, काँग्रेसवर आरोप करणे आता तरी थांबवायला हवे. असे अडथळे व अडचणींचा पाढा वाचण्यासाठी तुम्हाला सत्ता सोपवलेली नाही. राममंदिरास काँग्रेसचा, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचा अडथळा होता म्हणून तर लोकांनी त्यांना सत्तेतून बेदखल केले व भाजपची सत्ता आणली. त्यामुळे आता काँग्रेसवर खापर फोडणे थांबवा. मंदिर बांधण्यासाठी जी हिंमत लागते ती नसल्याने लोकांनी काँग्रेसला धूळ चारली व हिंमतबाज

छप्पन इंचवाल्यांच्या हाती

कारभाराच्या किल्ल्या सोपवल्या. तरीही त्यांना जळी, स्थळी, काष्ठी,… काँग्रेस दिसत असेल तर तुमच्या छातीचे मोजमाप जनतेला पुन्हा घ्यावे लागेल. रामाने तुमचे मनोरथ सफल केले. त्या बदल्यात राम अखंड वनवासी राहणार असेल तर राजकीय नौटंकी बंद करा. मोदी यांना मंदिर उभारायचे आहे, पण काँग्रेसचा अडथळा आहे. काँग्रेसचा अडथळा असतानाही नोटाबंदीची बाबरी उभारली. काँग्रेसचा अडथळा असतानाही जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्तीबरोबर सरकार स्थापन केले होतेच ना? अनेक वेळा काँग्रेसला फोडून व झोपवून अडथळे दूर केले. मग राममंदिराचा अडथळा काय आहे? मंदिर सरकारनेच बांधायचे आहे व कायद्याच्या चौकटीत राहून बांधायचे असे भाजपने त्यांच्या अजेंड्यात म्हणजे जाहीरनाम्यात सांगितले आहे. त्या चौकटीत राममंदिर कधी बसवणार? तिहेरी तलाकसारखे विषय त्या चौकटीतून बाहेर पडले. मग मंदिर का अडकले? एक कायदाच राममंदिरासाठी बनवायचा आहे. चौकटीचे काय घेऊन बसलात. तुम्ही सर्व काही करता, पण राममंदिराचा विषय काढला की विंचू चावल्याचा झटका बसल्यासारखे कळवळता, पळून जाता. राममंदिराची निर्मिती ही तुम्हाला कडू जहाल विषासारखी वाटत असेल, पण हे हलाहल पचवावेच लागेल. राममंदिरप्रश्नी काँग्रेस अडथळे आणत असेल तर एक सर्वपक्षीय बैठक आधी बोलवा व राममंदिरप्रश्नी सरकार अध्यादेश काढून काम सुरू करीत असल्याची ‘work order’ काढून टाका. मंदिरप्रश्नी

विश्व हिंदू परिषदेने

मोठी धर्मसभा घेतली व ठराव वगैरे केले. त्याने काय होणार?

हिंदुस्थानच्या संसदेसमोरच आता धर्मसभा व्हावी व त्यात मंदिर अध्यादेशाचा कागद घेऊन पंतप्रधान मोदींनाच आमंत्रित करा. मंदिरप्रश्नी जो आडमुठी भूमिका घेईल तो राजकारणातून कायमचा संपेल. राहुल गांधींना याची जाणीव आहे. राममंदिरप्रश्नी सगळ्यात मोठा अडथळा काँग्रेसचा वगैरे नसून राजकीय इच्छाशक्तीचा आहे. राहुल गांधींचे अस्तित्व ते किती? काँग्रेसचा जीवदेखील तोळामांसा. मग त्यांना इतके महत्त्व का देता? राममंदिराची घोषणा करा. काँग्रेस पाचोळ्यासारखी उडून जाईल, मात्र काँग्रेसच्या खांद्यावर मंदिराची बंदूक ठेवून राजकारण केलेत तर तुम्हीच उडून जाल. राममंदिर बांधायचे वचन काँग्रेसचे नसून भाजपचे आहे. एकवचनी श्रीरामासही हे माहीत आहे. अयोध्येचा राजकीय आखाडा होऊ नये. 2019 पूर्वी या आखाड्यात शिला याव्यात व रामाची नजरकैद आणि वनवास संपावा यासाठी आणि मंदिरनिर्मितीच्या वचनाचा ज्यांना विसर पडला आहे त्यांना त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही अयोध्येत गेलो. आता आमच्या अयोध्येतील ललकारीनंतर राजस्थानातील प्रचारसभेत तर पंतप्रधान मोदी यांनी राममंदिराचा उल्लेख केला. चला, इतक्या वर्षांनंतर मोदी यांच्या तोंडून राममंदिराचा उच्चार तरी झाला. आमची अयोध्या यात्रा सफल झाली. ते उठले, त्यांना जाग आली!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार ‘माढा’ मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार ?

News Desk

मीच नव्हे तर माझ्यासोबत काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील

News Desk

मुख्यमंत्री साहेब हे वागणे बरं नव्हं !

News Desk