मुंबई | नुकत्याच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात २१ ऑक्टोबर रोजी विधानसभेकरिता मतदान प्रक्रिया पार पडेल तर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. दरम्यान, याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील विधानसभेकरिता राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. शरद पवार हे आज (२२ सप्टेंबर) साताऱ्यात दाखल होणार आहेत. उदयनराजे भोसले यांच्या नुकत्याच झालेल्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा हा सातारा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी १३ सप्टेंबर रात्री उशिरा आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन १४ सप्टेंबर रोजी सकाळी दिल्लीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच उदयनराजे साताऱ्याच्या महाजनादेश यात्रेच्या तयारीला देखील लागले. या महाजानदेश यात्रेत उदयरनराजेंनी राष्ट्रवादीवर निशाणा देखील साधला होता. उदयनराजेंच्या या टीकेला आज शरद पवार आपल्या सातारा दौऱ्यादरम्यान प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.