HW News Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

BMC Elections: मुंबई पालिकेसाठी भाजपचा पुढचा प्लॅन काय?

मुंबई | एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असली तरी सरकार चालवताना भाजपला तारेवरची कसरत करावी लागते आहे. पण यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा (ShivSena) कणा मोडणं हे भाजपचं (BJP) मेन टार्गेट आहे, ज्याचा श्रीगणेशा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांनी आपल्या मुंबई दौऱ्यावेळी केल्याचं दिसून आलं आहे. अमित शाहांनी मुंबईत असताना केलेल्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे हेच भाजपचे महाराष्ट्रातील नंबर एकचे शत्रू असल्याचं स्पष्ट झालंय. पण गेल्या काही दिवसातील अहवालांनुसार शिंदे आणि भाजपची युती जनतेच्या फार पसंतीस उतरत नाहीये, असंही चित्र दिसतंय. अशातच राज ठाकरेंच्या ‘एकला चलो रे’च्या नाऱ्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे, अशाही चर्चांना उधाण आलंय. यामागची संभाव्य कारणं काय आहेत ते जाणून घेऊयात..

आगामी मुंबई महापालिकेसाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे. पण आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक शिंदे-फडणवीस सरकारसाठी मोठं आव्हान देखील ठरणार आहे. खरंतर शिंदे गट आणि भाजपची झालेली युती आणि मनसेशी वाढत असलेली जवळीक यामुळे युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र,  यंदा सर्व महानगरपालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा लढायच्या असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलंय, असं संदीप देशपांडे यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे युतीच्या चर्चांना तात्पुरता पूर्णविराम लागला आहे.

राजकीय भेटीगाठी 

खरंतर यंदा काहीही करुन मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसवायचाच असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगताच भाजप नेते जोराने कामाला लागले आहेत. मुंबई महानगर पालिकेत 150 नगरसेवक निवडून आणण्याचा दावा अमित शाहांनी केला आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांमध्ये भाजप नेत्यांच्या आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या होत्या. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातही गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. त्यानंतर गणेशोत्सवादरम्यान गणपती दर्शनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात काहीतरी शिजत असल्याचं बोललं गेलं. त्यामुळे युतीच्या चर्चेनुसार अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंकडे सहानुभूती

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आकड्यांची जुळवाजुळव सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे. यंदाच्या निवडणुकीत सगळ्या पक्षांपेक्षा भाजपचं संख्याबळ अधिक असू शकतं. पण तसं असलं तरी मागच्या कित्येक वर्षांपासून मुंबई पालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकतोय. त्यात शिवसेनेची ताकद सुद्धा मुंबईत मोठ्या प्रमाणात असल्याने भाजपसमोर आव्हान आहे. कारण 2017 मध्ये जेव्हा भाजपची शिवसेनेसोबत युती नव्हती तेव्हा शिवसेनेची वोट शेअर म्हणजे एकूण मतांची टक्केवारी ही लक्षणीय होती. कारण जेव्हा 2012 मध्ये भाजपसोबत युती असताना शिवसेनेची वोट शेअर ही 17.34% होती, तेच 2017 मध्ये युती नसताना शिवसेनेची वोट शेअर 28.29% होती. मात्र आता शिंदे गटामुळे शिवसेनेत निर्माण झालेल्या गळतीचा काहीसा फायदा भाजपला होऊ शकतो. पण तरी सुद्धा लॉकडाऊनमधली परिस्थिती आणि शिंदेंची बंडाळी यामुळे उद्धव ठाकरेंकडे सुद्धा बरीचशी सहानुभूती जाऊ शकते.

भाजप मनसेची युती अद्याप का नाही?

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची वाढलेली जवळीक पाहता नवीन समीकरणं उदयाला येऊ शकतील, असंही काही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. पण सध्या तरी मनसेने ‘एकला चलो रे’चा नारा घेतल्यामुळे युती कुणासोबत होणार किंवा होणार की नाही हा एक प्रश्न आहेच. पण या युती चक्रामध्ये भाजपची डोकेदुखी सुद्धा वाढतेय. कारण मुंबईत मराठी आणि अमराठी अशी मतं विभागणी आहे. त्यात मुंबईतले उत्तर भारतीय सुद्धा भाजपाचा मतदार वर्ग आहेत. त्यामुळे मनसेसोबत युती केली तर हा वर्ग नाराज होऊ शकतो. म्हणूनही भाजप अद्याप मनसेशी युती करत नाहीये असंही म्हंटलं जातंय. मात्र आगामी निवडणुकांमध्ये ‘जागा कमी आणि इच्छुक उमेदवार जास्त’ अशी कोंडी भाजपची होऊ शकते. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर येत्या काळात मुंबई महापालिका निवडणुका असो की मग 2024 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका सर्वच पातळींवर योग्य तो समतोल राखत भाजपला मार्ग काढवा लागणार आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे धारावीत खड्डे भरो आंदोलन

News Desk

यंदा शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला रामदास कदमांना ‘नो एंट्री’? कथित ऑडिओ क्लिपमुळे वाढल्या अडचणी

News Desk

मन हेलावणारी पोलीस भरती

News Desk