HW Marathi
राजकारण

आम्हाला त्यावेळी काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही, आता आम्ही मागे हटणार नाही !

मुंबई | “राज्यात वंचितांना सोबत घेतल्याशिवाय कुणीही सत्तेत येऊ शकणार नाही हे काँग्रेस जाणते. आम्ही जुलैमध्येच काँग्रेसला १२ जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यांनी त्याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही. आम्ही आता २२ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आता आम्ही मागे हटणार नाही”, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तर काहीच दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्याकडूनच टाळाटाळ होत असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस देशभरातील विविध छोट्या मोठ्या पक्षांशी आघाडी करत आहे. “काँग्रेसची प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याची तयारी आहे. परंतु, त्यांच्याकडूनच कोणताही प्रतिसाद मिळत नसून आमच्या प्रस्तावाची टाळाटाळ होत आहे. त्यांचा गेम प्लॅन नक्की काय आहे, हेच आम्हाला समजलेले नाही,” असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी २२ फेब्रुवारीला पुण्यात केले होते. मतविभाजन टाळण्यासाठी, धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पडून भाजप-शिवसेनेला त्याचा फायदा मिळू नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे वारंवार सांगण्यात आले आहे.

“२०१४ मध्ये स्वतंत्र लढल्याने आम्हाला फटका बसला होता. म्हणूनच आम्ही प्रकाश आंबेडकरांना आघाडीत सामील होण्यास सांगत आहोत. मात्र प्रकाश आंबेडकरांकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. तरीही आमची आशा कायम असून आम्ही चर्चेला तयार आहोत”, असे चव्हाण यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे स्वतः प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र, राहुल गांधींच्या भेटीचा कोणताही निरोप आला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Related posts

…तर बेस्ट कर्मचाऱ्यांना मनसे स्टाईलने मिळवून देणार न्याय !

News Desk

केंद्राच्या ‘अरे’ला ममता ‘का रे’ने प्रत्युत्तर दिले !

News Desk

राहुल यांच्या मुंबई दौ-याला सुरुवात

News Desk