HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

आता विरोधी पक्ष शिल्लकच राहणार नाही कारण…!

मुंबई | राज्यातील जवळपास महिनाभर सुरु असलेला सत्तासंघर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (२८ नोव्हेंबर) राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर, शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील महाविकासाआघाडीकडून शनिवारी (३० नोव्हेंबर) विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सभागृहात आपल्या एकूण १६९ आमदारांसह बहुमत सिद्ध करण्यात आले. दरम्यान, आज (१ डिसेंबर) या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसच्या नाना पटोले यांची निवड करण्यात आली. तर विरोधी पक्षनेतेपदी भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान, फडणवीसांच्या या निवडीवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपसह फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.

विरोधात होते ते आज मित्र झाले आणि जे मित्र होते ते विरोधात !

“काल माझ्या सभागृहातील पहिल्याच दिवशी मी माझ्या सहकारी मंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली. मात्र, आपण तर इथे गेली २५ ते ३० वर्षे एकत्र काम करत आहोत. आपला परिचय आज माझ्या हातात आला पण तो आधीच आला असता तर बरं झाले असतं. कारण, या दिवसाची, या नात्याची मला अपेक्षा नव्हती. एका दृष्टीने पाहिले तर मी आजपर्यंतचा भाग्यवान मुख्यमंत्री आहे. कारण, जे गेली २५ ते ३० वर्षे विरोधात होते ते आज माझे मित्र झाले आणि जे मित्र होते ते विरोधात बसले आहेत. त्यामुळे मला असे वाटते कि, विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही. कारण, विरोधी पक्षातले माझे मित्रच आहेत”, असा खोचक टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

अनेकांना वाटले, मी तुमच्या कानात येऊन काहीतरी सांगितले !

“मी आज दिलदारपणाने आपले अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या. कालही येऊन मी येऊन आपले अभिनंदन केले तर अनेकांना वाटले कि, मी तुमच्या कानात येऊन काहीतरी सांगितले. अनेकांनी मला विचारले कि, मी तुमच्या कानात काय सांगितले ? तर त्यांना मी सांगितले कि, आमच्याकडे कानात आणि बंददाराआड काय बोललो ? ते आम्ही सांगत नाहीत”, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर प्रस्ताव मांडताना उद्धव ठाकरे बोलत होते.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला फडणवीसांनी स्पष्ट करावं-जयंत पाटील

News Desk

अर्णब गोस्वामी यांची रवानगी तळोजा कारागृहात

News Desk

संभाजीराजेंची खासदार निधीतून पूरग्रस्तांना ५ कोटींची मदत

News Desk