मुंबई | देशभरात एकूण ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. त्यापैकी पहिल्या ४ टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली. तर १९ मे रोजी लोकसभा निवडणुकांचा सातवा आणि अंतिम टप्पा पार पडला. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघात अनेक महत्त्वाच्या आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या लढती झाल्या आहेत. राज्यातील याच अत्यंत महत्त्वाच्या, प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या लढतींबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊ.
सांगलीत लोकसभा मतदारसंघ
सांगलीत लोकसभा मतदारसंघात खासदार भाजपचे संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यापैकी कोण बाजी मारणार ?, याची उत्सुकता अवघ्या जिल्ह्यात लागून राहिली आहे. संजय पाटील यांना पहिल्यांदा ही निवडणूक एकतर्फी वाटली होती मात्र महाआघाडीच्या जागा वाटपात ही स्वाभिमानीला सुटल्यामुळे निवडणुकीला युटर्न मिळाला.
हातकणगंले लोकसभा मतदारसंघ
हातकणगंले लोकसभा मतदारसंघातील लढत रंगतदार व चुरशीची ठरली आहे. सुरवातीला खासदार राजू शेट्टी यांचे पारडे जड वाटत होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात त्यांना शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी चांगलीच टक्कर दिली. या मतदार संघात भाजप, शिवसेनेने मोठी ताकद लावली होती.
बारामती लोकसभा मतदारसंघ
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तिसर्यांदा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवली आहे. तर राष्ट्रीय समाज पक्षाचे दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची ही लढत दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघ
यंदा भाजपकडून नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी तर कॉंग्रेसकडून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाना पटोले हे २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भाजपकडूनच निवडून आले होते. आता त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असून आता ते नितीन गडकरी यांच्याविरोधात उभे राहिले आहेत. गेल्या काही काळात नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी निर्माण केलेल्या आपल्या विकाससपुरुषाच्या प्रतिमेला नाना पटोले टक्कर देऊ शकतील का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ
सोलापूर मतदार संघातून यावेळी भाजपकडून डॉ. श्रीजय सिध्देस्वर शिवाचार्य महास्वामीजी तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढविणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून जातीय समीकरणे आणि मतांची विभागणी लक्षात घेऊन लिंगायत समाजाचे स्वामी डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांना मैदानात उतरवण्यात आले. त्यामुळे सोलापूरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. सुशीलकुमार शिंदे आपला बाल्लेकिल्ला राखणार ? भाजप आपली जागा कायम ठेवणार ? कि सोलापूरला प्रकाश आंबेडकरांसारखा नवीन खासदार मिळणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
नांदेड लोकसभा मतदारसंघ
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघडीचे यशपाल भिंगे निवडणुकीच्या रिंगणार उतरले आहेत. नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षापासून या जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता असून अशोक चव्हाण हे या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. यंदा चिखलीकर यांच्या रूपाने अशोक चव्हाणांना या निवडणुकीत तगडे आव्हान मिळाले असल्याचे मत राजकीय विचारवंतांनी व्यक्त केले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ
बहुचर्चित अशा माढा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून माढा मतदारसंघात संजय शिंदे निवडणूक लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. माढा मतदार संघातून सुरुवातीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव चर्चेत होते. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीच्या रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे नाव पुढे येत होते. मात्र, ते राज्यात राहण्यास इच्छुक असल्याने त्यांचे नाव मागे पडले.
शिरूर लोकसभा मतदारसंघ
अभिनेता अमोल कोल्हे यांनी १ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अमोल कोल्हे यांना पक्षाकडून शिरूर मतदार मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देखील देण्यात आली. शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हे यांचा सामना शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी होणार आहे. बहुचर्चित अशा शिरूर मतदारसंघातील ही लढत चुरशीची होणार आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघ
पुणे लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून मोहन जोशी तर भाजपकडून पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या पुण्याच्या उमेदवारांच्या नावांबाबत सुरुवातीचा बराच वेळ संभ्रम होता. यादरम्यान अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड आणि सुरेखा पुणेकर यांची नावे देखील पुढे येत होती. मात्र, अखेर काँग्रेसने मोहन जोशी यांनी पुणे मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
नंदुरबार मतदार संघातून यावेळी भाजपकडून डॉ. हिना गावीत तर कॉंग्रेसकडून के.सी पडवी हे लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. नंदुरबार हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. मात्र २०१४ मध्ये हा बालेकिल्ला सुद्धा मोदी लाटेत वाहून गेला. येथून हिना गावित विजयी झाल्या. मात्र, नंदुरबार हा कॉंग्रेससाठी नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. त्यामुळे, यंदा कॉंग्रेस आपला हा गड पुन्हा खेचून आणते की परत भाजपचीच सत्ता कायम राहते हे पाहणे महत्वाचे आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ
यवतमाळ-वाशिम या मतदारसंघातून यावेळी शिवसेनेकडून भावना गवळी तर कॉंग्रेसकडून माणिकराव ठाकरे, प्रहारकडून वैशाली येडे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. विशेष म्हणजे या लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश सरचिटणीस असलेले पी. बी. आडे यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. प्रहार पक्षाकडून उभ्या राहिलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वैशाली येडे या देखील उभ्या आहेत. पहिल्यांदाच अशाप्रकारे उभ्या राहिलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला येथील मतदार कौल देतील की विद्यमान सत्तेकडेच मतदारांचे झुकते माप राहिल ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
अकोला लोकसभा मतदारसंघ
अकोला मतदारसंघातून यावेळी भाजपकडून संजय धोत्रे, कॉंग्रेसकडून हिदायत पटेल, तर वंचित बहुजन आघाडीचे अॅड.प्रकाश आंबेडकर हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. अकोल्यात ही लढत तिरंगी होणार आहे. अकोल्यातील इतिहास पहिला तर जवळपास २५ वर्षे येथील सत्ता कॉंग्रेसच्याच ताब्यात होती. तर मागील ३ लोकसभा निवडणुकांमध्ये येथे भाजपचे संजय धोत्रेच जिंकून येत आहेत. शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, रोजगार, रस्त्यांचा रखडलेला विकास या येथील विशेष समस्या आहेत. तर २०२४ मध्ये संजय धोत्रे यांनी शेतकऱ्यांबाबत एक आक्षेपार्ह विधान करुन शेतकऱ्यांप्रती अनास्था दर्शवली होती.
जालना लोकसभा मतदारसंघ
जालना मतदारसंघातून यावेळी भाजपकडून रावसाहेब दानवे, कॉंग्रेसकडून विलास औताडे तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. शरदचंद्र वानखेडे लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत.जालन्याचा इतिहास पहिला तर जालना हा भारतीय जनता पक्षाचा गढ राहिला आहे. १९९६ पासून येथे नेहमी भाजपचीच सत्ता राहिली आहे. गेली २० वर्षे रावसाहेब दानवे यांनी जालना मतदारसंघावर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. दानवे यांचा तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क, बूथनिहाय झालेले नियोजन काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे करु शकते असे बोलले जात आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघ
यंदा धुळे मतदारसंघातून भाजपकडून डॉ. सुभाष भामरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुणाल पाटील हे लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. धुळ्याचा इतिहास पहिला तर धुळे हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र या मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हापासून भाजपने या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात यश मिळवले आहे. धुळे लोकसभा मतदार संघात आतापर्यंत भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षात खरी लढत झाली आहे. मात्र २००९ मध्ये १५ व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यावर आजतागायत भाजपचा झेंडा फडकत आहे. यंदाची ही लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी असणार आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघ
पालघर मतदारसंघातून यंदा शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित, कॉंग्रेसचे सुरेश पडवी, बहुजन विकास आघाडीचे बाळाराम पाटील हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. पालघर हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, मतदारसंघातील मक्तेदारी मोडून काढण्यात भाजप यशस्वी ठरली. पालघर लोकसभा मतदारसंघातून एमएमआरडीएच्या माध्यमातून अनेक विकास कामही झाली असल्याच सांगण्यात येते. तर, राजेंद्र गावितांनी वसई आणि नालासोपारा याभागात पाणी परिषद घेऊन आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा आता राजेंद्र गावित आपली सत्ता राखू शकतील कि निकाल काही वेगळे लागतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
ठाणे लोकसभा मतदारसंघ
यंदा ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आनंद परांजपे आणि वंचित बहुजन आघाडीचे मलिक्कार्जुन पुजारी हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.ठाण्याचा इतिहास पहिला तर याआधी सलग १३ वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ मध्यंतरी काँग्रेस-राष्टवादी आघाडीकडे गेला होता. मात्र, आता पुन्हा येथे शिवसेनेची सत्ता आहे. येथील वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक सुविधांचा अभाव ,शासकीय रुग्णालय व्यवस्था, मेट्रो, खाडी पर्यायी मार्ग अशी कामे अजूनही प्रलंबितच आहेत. ही सर्व पार्श्वभूमी राजन विचारे आणि आनंद परांजपे या दोघांपैकी येथील मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार संजय निरुपम सामना यांचा शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्याशी होणार आहे. उत्तर मुंबईतून २०१४ साली भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी निरुपम यांचा दारुण पराभव केला होता. शेट्टी यांचा मतदारसंघातील प्रभाव पाहता त्यांच्या विरोधात उमेदवारी नको, त्याऐवजी उत्तर-पश्चिम मुंबईतून उमेदवारी द्या, असा आग्रह निरुपम यांनी धरला होता.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
बहुचर्चित अशी ईशान्य मुंबई मतदारसंघातून भाजपकडून मनोज कोटक यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्याशी होणार आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अनेक दिवस सुटत नव्हता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने शिवसैनिकांच्या रोषामुळे येथील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी मिळू शकली नाही. यंदाच्या निवडणुकीत शिवसैनिकांचा रोष किरीट सोमय्या यांना चांगलाच महागात पडला.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ
दक्षिण मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात लढत आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंना पाठिंबा जाहीर केला आहे. कोळंबकर यांच्या पाठिंब्याने दक्षिण मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना कोळंबकरांनी पाठिंबा दिला आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ
काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा सामना भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी होणार आहे. गेल्या निवडणुकांमध्ये संजय निरुपम यांचा या मतदारसंघातून ४ लाख मतांनी प्रभाव झाला होता. भाजपचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार संजय निरुपम यांनी सोडलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचा अन्य कोणताही नेता उभे राहण्यास तयार नव्हता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.