HW News Marathi
मुंबई राजकारण

अंधेरी पोटनिवडणुकीतील नाराजीच्या चर्चांवर काँग्रेसची प्रतिक्रिया

मुंबई | काँग्रेसने मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. या जागेवर ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादीपाठोपाठ कॉंग्रेसने सुद्धा आपला पाठिंबा शिवसेनेला दिला आहे. मात्र, यामुळे कॉंग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद सुरू झाल्याची चर्चा आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार नाही, तर सेनेला आपला पाठिंबा देईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी सांगितलं. मात्र, काँग्रेसने आगामी मुंबई महानगरपलिका निवडणुकीत यापूर्वीच स्वबळाचा नारा दिलेला आहे. पण तरी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत काँग्रेसने सेनेला पाठिंबा दर्शवल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला पाठींबा जाहीर करून मुंबईतील काही काँग्रेस नेते नाराज झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर आगामी मुंबई महानगरपलिका निवडणुकीत शिवसेना देखील कॉंग्रेसला मदत करणार का असा सवाल कॉंग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे.

खरंतर शिवसेनेतल्या बंडानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात होणारी ही पहिलीच निवडणूक असणार आहे. पण शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाकडे जाणार याबाबतचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिंदे गटाऐवजी मुरजी पटेल यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर उद्धव ठाकरेंनी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनीही महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केलंय. मात्र, कॉंग्रेसच्या या भूमिकेवर पक्षातच मतभेद असल्याचं दिसतंय.

काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी या निवडणुकीत काँग्रेसनेही उमेदवार उभा करायला हवा, असं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, आज (शुक्रवार, 7 ऑक्टोबर) नाना पटोलेंनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. पटोले म्हणाले, हा पक्षाचा निर्णय असून कॉंग्रेसमध्ये कोणतीही अंतर्गत नाराजी नाही. म्हणजेच शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर कॉंग्रेस ठाम असल्याचं त्यांनी सुचवलं आहे. त्यामुळे आता ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेतल्या बंडानंतर पहिल्यांदाच शिंदे-भाजप विरुद्ध शिवसेना आमने-सामने येणार आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या राज्यात जनतेला ना राम मिळाला, ना रोजगार !

News Desk

पंतप्रधान मोदींचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे !

News Desk

उपकार प्राप्त इमारतींना आकारण्यात येणारा वाढीव सेवाशुल्क कर रद्द; उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Aprna