HW News Marathi
राजकारण

केजरीवाल मिरचीपूड प्रकरणानंतर तरी शेतकऱ्यांच्या मिरचीला भाव मिळू द्या!

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका अज्ञात व्यक्तींनी मिरचीपूड फेकली घटना सचिवालयात घडली. याआधी केजरीवाल यांच्यावर शाई फेकण्यात आली. भरसभेत त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. हे कमी पडले की काय म्हणून त्यांना थप्पड मारण्याचा जाहीर कार्यक्रमही काही मंडळींनी उरकून घेतला. केजरीवाल व केंद्र सरकार यांच्यात पहिल्या दिवसापासून संघर्ष सुरू आहे. राजकारणात शाईफेक, चप्पलफेक, मिरचीपूड फेकीस प्रतिष्ठा मिळत आहे. केजरीवाल आणि मोदी सरकार यांच्यात सतत होणार संघर्ष सुरूच असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हामी भाव असे प्रश्न उपस्थित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सामनाच्या संपादकीयमधून नाव न घेता मोदी सरकारवर टीका केली आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

गेल्या चार वर्षांत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जाहीर थपडा खूप खाल्ल्या, पण त्यांच्या चिकाटीचे कौतुक करावे लागेल. राजकारणात शाईफेक, चप्पलफेक, मिरचीपूड फेकीस प्रतिष्ठा मिळत आहे. हा लोकांचा संताप असेल तर थापेबाजी, जुमलेबाजी, महागाई, भ्रष्टाचार व देश विकणाऱ्या सौद्यांच्या विरोधात या संतापाच्या ठिणग्या का उडत नाहीत? आम्ही सत्य बोलतो व लिहितो तेव्हा अनेकांना मिरच्या झोंबतात. चला, केजरीवाल प्रकरणात मिरची पावडरला महत्त्व आले. आता शेतकऱ्यांच्या मिरचीला तरी भाव मिळू द्या!

केजरीवाल यांच्यावर मिरची हल्ला

अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याही पक्षाला तिथे प्रचंड बहुमत मिळाले आहे. नरेंद्र मोदी हे ज्याप्रमाणे बहुमत मिळवून पंतप्रधान झाले त्याप्रमाणे केजरीवाल यांना लोकांनी निवडले आहे. मोदी किंवा केजरीवाल हे पदावर नको असतील तर त्यांचा पराभव निवडणुकीच्या माध्यमातून व्हावा. मात्र अलीकडे राजकीय विरोधाचे भलतेच प्रकार अवलंबिले जात आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर दिल्लीच्या मंत्रालयात मंगळवारी ‘मिरचीपूड’ हल्ला झाला. अनिल शर्मा नावाच्या एका माथेफिरूने त्यांच्या डोळय़ांवर मिरचीपूड फेकली. भारतीय जनता पक्षाने हा हल्ला केला असा आरोप ‘आप’च्या मंडळींनी करणे स्वाभाविक आहे. कारण केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची आणि त्यांच्या आम आदमी पक्षाची राजकीय कोंडी करण्याचे हरतऱहेने प्रयत्न होत आहेत. आम्ही फालतू अहिंसावाद मानणाऱ्यांतले नव्हेत हे खरे असले तरी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या बाबतीत काही प्रकार ठरवून घडवले जात आहेत. मागे केजरीवाल यांच्यावर शाई फेकण्यात आली. भरसभेत त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. हे कमी पडले की काय म्हणून त्यांना थप्पड मारण्याचा जाहीर कार्यक्रमही काही मंडळींनी उरकून घेतला. केजरीवाल व केंद्र सरकार यांच्यात पहिल्या दिवसापासून संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांना चपराशाइतकेही अधिकार मिळू नयेत व त्यांनी आपल्या

खुर्चीवर फक्त मफलर गुंडाळून

खोकत बसावे अशी योजना लेफ्टनंट गव्हर्नरांमार्फत केंद्राने राबवली. त्यासही ‘आप’चे लोक पुरून उरले. लेफ्टनंट गव्हर्नरांच्या कार्यालयातच मुख्यमंत्री केजरीवाल व त्यांचे सहकारी उपोषणाला बसले. शेवटी न्यायालयानेच केंद्र सरकारचे कान उपटले हे सत्य नाकारता येत नाही. मोदींची प्रचंड तुफानी लाट असतानाही दिल्लीत ‘आप’समोर भाजपने गटांगळय़ा खाल्ल्या व पाच आमदारही त्यांना निवडून आणता आले नाहीत. या पराभवाची वेदना टोचणे स्वाभाविक असले तरी त्यासाठी राज्य वेठीस धरणे कितपत योग्य आहे? आज तेथे केजरीवाल मुख्यमंत्री आहेत. उद्या तेथे दुसऱ्या एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल. आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात जाऊ शकतात. दिल्ली हा केंद्रशासित भाग आहे व त्यास पूर्ण राज्याचा दर्जा नाही. तरीही ‘आप’ सरकारने दिल्लीतील शिक्षण व्यवस्था व सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारून दाखवली. सरकारी शाळा व सरकारी दवाखान्यांवर ‘उपचार’ करून त्यांचे आरोग्य उत्तम करण्याचे काम केजरीवाल सरकारने केले व चांगल्याला चांगले म्हणणे हा आमचा स्वभाव आहे. दिल्लीची कायदा व सुव्यवस्था केजरीवाल सरकारचा विषय नाही, पण दोन भयंकर अपराधी दिल्लीत घुसले असल्याची छायाचित्रे दिल्ली पोलिसांनी प्रसिद्ध केली. अतिरेकी दिल्लीत घुसत असताना पोलीस काय करीत होते? त्यावेळी पोलिसांच्या डोळ्यांत कुणी मिरचीपूड फेकली होती काय? हा प्रश्न आहेच. दिल्लीचे राजकीय प्रदूषण वाढले आहे, पण

दिल्लीच्या हवेतही विष

वाढले आहे. श्वास घेणे कठीण व्हावे अशी विषारी हवा आणि धुके दिल्लीत पसरले आहे. सीबीआयच्या दोन गटांत गुंड टोळय़ांप्रमाणे वाद सुरू आहेत. रिझर्व्ह बँकेतही सर्व काही आलबेल आहे असा दावा कुणीच करू शकत नाही. केंद्रातले संपूर्ण सरकार राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या निवडणूक युद्धात उतरल्यावर दिल्लीला वाली कोण? त्यामुळे अतिरेकी घुसले व दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर मिरचीपूड फेकली गेली. यावेळी झालेल्या गडबडीत केजरीवाल यांचा चष्माही तुटला. पुन्हा फक्त मिरचीपूड फेकणाऱ्याने गोळीबाराचीही धमकी दिल्याचे पोलिसांचेच म्हणणे आहे. हा माथेफिरू तरुण आता पोलिसांच्या ताब्यात असला तरी तो मिरची पावडर घेऊन सचिवालयात कसा पोहोचला, मुख्यमंत्र्यांची सुरक्षा त्याने कशी भेदली आदी प्रश्न उरतातच. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची सुरक्षा हे दिल्ली पोलिसांचेच काम आहे व दिल्ली पोलिसांचे नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे संशयाला जागा आहे. गेल्या चार वर्षांत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जाहीर थपडा खूप खाल्ल्या, पण त्यांच्या चिकाटीचे कौतुक करावे लागेल. राजकारणात शाईफेक, चप्पलफेक, मिरचीपूड फेकीस प्रतिष्ठा मिळत आहे. हा लोकांचा संताप असेल तर थापेबाजी, जुमलेबाजी, महागाई, भ्रष्टाचार व देश विकणाऱ्या सौद्यांच्या विरोधात या संतापाच्या ठिणग्या का उडत नाहीत? आम्ही सत्य बोलतो व लिहितो तेव्हा अनेकांना मिरच्या झोंबतात. चला, केजरीवाल प्रकरणात मिरची पावडरला महत्त्व आले. आता शेतकऱ्यांच्या मिरचीला तरी भाव मिळू द्या!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनमोहन सिंग यांनी राज्यसभेसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज

News Desk

लोकसभेत अदानीच्या मुद्द्यांवरून विरोधकांचे गदारोळ; लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

Aprna

सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपची लखनऊमध्ये बैठक

News Desk