HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

राजकीय नेत्यांचे निवृत्तीचे वय ठरलेले नसते, सुमित्रा महाजन यांचा नाराजीचा सूर

नवी दिल्ली | “राजकारण म्हणजे सरकारी नोकरी नव्हे. या दोघांची तुलना केली जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना ठराविक वयानंतर निवृत्त व्हावे लागते तसे राजकीय नेत्यांचे नसते”, असे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे. पीटीआयने घेतलेल्या मुलाखतीत सुमित्रा महाजन बोलत होत्या. गेल्याच महिन्यात सुमित्रा महाजन यांनी आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले होते. भाजपकडून यंदा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महाजन यांना देखील उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता होती. मात्र, त्यांनी स्वतःच आपण निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले.

सुमित्रा महाजन यांचे आताचे वक्तव्य मात्र पक्षावरील नाराजी व्यक्त करणारे आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. “भाजपने ७५ वर्षे पूर्ण असलेल्या नेत्यांना लोकसभेची उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे”, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘द वीक’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले होते. याचमुळे भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना उमेदवारी नाकारली. सुमित्रा महाजन या इंदूरमधून तब्बल सलग ८ वेळा निवडून आल्या आहेत.

भाजपतील इतर ज्येष्ठ नेत्यांप्रमाणे सुमित्रा महाजन यांनाही उमेदवारी नाकारली जाणार कि नाही याबाबत संभ्रम होता. मात्र, महाजन यांनी ५ एप्रिल रोजी स्वतःहून माघार घेतली. “गेली ५ वर्ष मी लोकसभेची अध्यक्ष आहे. त्यामुळे मी भाजपच्या कोणत्याही बैठकीत उपस्थित राहू शकत नव्हते. भाजपाच्या कोणत्या बैठकीत वय झालेल्या नेत्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आला याची मला कल्पना नाही. मात्र, माझे वय इतके नाही कि मी राजकीय जीवनातून निवृत्ती घेईन. मी यापुढेही प्रामाणिकपणे भाजपसाठी काम करीत राहीन”, असेही सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे.

Related posts

शिवसेनेने उत्तर प्रदेशासाठी जाहीर केली ५ उमेदवारांची यादी

News Desk

पर्यावरण दिनी राजकीय प्रदूषण नको | अदित्य ठाकरे

धनंजय दळवी

कर्नाटकात अखेर भाजपचा झेंडा

News Desk