पुणे | एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अहमदनगर, पुण्यासह राज्यातील आणखी काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे, पुढच्या तीन दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याचा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे. आधीच संपूर्ण जगभरात ‘कोरोना’ व्हायरसचे संकट असताना आता राज्यातील वातावरणात सतत होणारे हे बदल चिंतेचे कारण बनत आहेत.
देशात आणि राज्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीला अचानक थंडी वाढली. त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात तापमान वाढ झाली. मुंबई, पुणे, नाशिकसह मध्य महाराष्ट्र, तसेच कोकण विभागात दिवसाच्या तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे गेला. रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने उकाडा वाढला. त्यानंतर, आज अहमदनगर, पुण्यासह राज्यातील आणखी काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. तर मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, जालन्यातही ढगाळ वातावरण पाहायला मिळाले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या म्हणजेच २६ मार्चलाही मध्य महाराष्ट्र, महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, २७ आणि २८ मार्चला देखील या भागांत गडगटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.