मुंबई | भाजपने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील आपला उमेदवार मागे घ्यावा. आणि भाजपने ही निवडणूक लढवू नये, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्र लिहून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केले आहे. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. यानंतर रमेश लटके यांची पत्न ऋतुजा लटके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पत्र ट्वीट आज (16 ऑक्टोबर) केले आहे.
“आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका,” असा आशय लिहून राज ठाकरेंनी पत्र ट्वीट केले आहे. राज ठाकरे म्हणाले, “”रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.”
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका.@Dev_Fadnavis pic.twitter.com/78nfA21hDP
— Raj Thackeray (@RajThackeray) October 16, 2022
राज ठाकरेंनी पत्रात नेमके काय लिहिले
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
राज ठाकरे
प्रति,
दि. १६ ऑक्टोबर २०२२ |
श्री. देवेंद्र फडणवीस
उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र!
एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे.
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.
माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.
मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं.
असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल.
आपला मित्र,
राज ठाकरे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.