HW News Marathi
राजकारण

दंगली व दहशतवादी हल्ले हे निवडणुका जिंकण्याचे साधन ठरू नये !

मुंबई । निवडणुकीपूर्वी एखादा दहशतवादी हल्ला होईल व त्यानंतर एखादे छोटे युद्ध खेळून निवडणुका जिंकल्या जातील, असा राजकीय आरोप काही दिवसांपूर्वीच झाला. अशा आरोपांना पुष्टी मिळेल असे वर्तन राज्यकर्त्यांनी करू नये. लोकांच्या मनातील खदखद लाव्हारसाप्रमाणे उसळून बाहेर येईल व त्यांना आवरणे कठीण जाईल. दंगली व दहशतवादी हल्ले हे निवडणुका जिंकण्याचे साधन ठरू नये. तसे कोणी करीत असेल तर ईश्वर त्या सर्वच राजकीय पक्षांना सुबुद्धी देवो!, असे आवाहन सामनाच्या संपादकीयमधून शिवसेवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

निवडणुकीपूर्वी एखादा दहशतवादी हल्ला होईल व त्यानंतर एखादे छोटे युद्ध खेळून निवडणुका जिंकल्या जातील, असा राजकीय आरोप काही दिवसांपूर्वीच झाला. अशा आरोपांना पुष्टी मिळेल असे वर्तन राज्यकर्त्यांनी करू नये. लोकांच्या मनातील खदखद लाव्हारसाप्रमाणे उसळून बाहेर येईल व त्यांना आवरणे कठीण जाईल. दंगली व दहशतवादी हल्ले हे निवडणुका जिंकण्याचे साधन ठरू नये. तसे कोणी करीत असेल तर ईश्वर त्या सर्वच राजकीय पक्षांना सुबुद्धी देवो!

देशात मोठ्या उलथापालथी घडत आहेत. कश्मीर हल्ल्यानंतर वातावरणातील तणाव वाढला. देशभक्ती किंवा राष्ट्रवाद अंगी बाणवण्यासाठी कश्मीरसारख्या दहशतवादी हल्ल्यांचीच का गरज असावी? गावागावांत, शहरांत देशभक्तीच्या गर्जना करणारे जमाव जमत आहेत. दिल्लीच्या इंडिया गेटवर कालच्या रात्री हजारो तरुण अमर जवान ज्योतीजवळ जमले. जवानांचे रक्त सांडल्याशिवाय देशभक्तीचा अंगार पेटत नाही. एखादा दहशतवादी हल्ला झाल्याशिवाय आमच्या देशभक्तीस जाग येत नाही. पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी असे हल्ले होण्याची वाट का पाहावी लागते? हे काम कधीच व्हायला हवे होते. आता ‘पुलवामा’ हल्ल्यानंतर तरी विद्यमान सरकारने पाकिस्तानला धडा शिकविण्याचे कर्तव्य पार पाडावे ही जनभावना आहे. यात थोडाफार राजकीय रागरंग मिसळला जातोच. मात्र एखाद्याच्या देशभक्तीपेक्षा दुसर्‍याची देशभक्ती प्रखर यावर सोशल मीडियात स्पर्धा होऊ नये. दुसरीकडे या हल्ल्याच्या निमित्ताने देशभरात जो तीव्र संताप व्यक्त होत आहे त्या संतापाच्या भरात एखादा भलताच गंभीर प्रश्न उभा राहील असे होऊ नये. कारण आम्ही बातम्यांतून पाहात आहोत, पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातील कश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले सुरू झाले आहेत. हे चिंताजनक तितकेच धोकादायक ठरू शकेल. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत शिखांचे हत्याकांड झाले. त्याची किंमत काँग्रेस पक्षाला आजही चुकवावी लागत आहे. आता

कश्मिरी तरुणांना

व खासकरून विद्यार्थीवर्गाला लक्ष्य केले जात असेल तर नव्या संकटास आपण पायघड्या पसरून बोलवत आहोत. नवज्योतसिंग सिद्धू हा एक बेलगाम बोलणारा माणूस आहे, पण हे मूळ ‘प्रॉडक्ट’ भारतीय जनता पक्षाचेच आहे. पुलवामातील हल्ल्याने देशात संतापाचा भडका उडाला असताना या महाशयाने वक्तव्य केले की, ‘काही झाले तरी पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवली पाहिजे.’ या वक्तव्यामुळे नवज्योतसिंग सिद्धूची ‘सोनी’ टी.व्ही.च्या एका कार्यक्रमातून हकालपट्टी झाली व तसा दबाव व मोहिमा चालवल्या गेल्या, पण त्याच वेळी उत्तरेतील एक भाजप नेते नेपाल सिंग यांनी शहीद सैनिकांचा अपमान केला. ‘सैनिक मरत असतील तर मरू द्या, त्यांना त्याचाच तर पगार मिळतो ना?’ ही असली फालतू वक्तव्ये करणारा नेपाल सिंग मात्र आजही भारतीय जनता पक्षात आहे व त्याच्यावर कारवाई झालेली नाही. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या अंत्ययात्रेत सामील झालेल्या राज्यकर्त्या पक्षाच्या काही नेत्यांचे ‘हसरे’ चेहरेदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पुन्हा या हल्ल्याबाबत कोणी काही बोलू नये. शांतता राखा. कश्मीर हल्ल्यावर बोलणे म्हणजे देशद्रोह असा ठरावच जणू काही मंडळींनी मंजूर केला आहे, पण 2014 च्या आधी अशा प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी व संघ परिवाराने त्यावेळच्या मनमोहन सरकारवर जोरदार हल्ले केले व प्रत्येक दहशतवादी हल्ल्यास मनमोहन सिंग यांना जबाबदार धरले. ‘दिल्ली की सरकार के पास वो सीना नहीं है!’ हे 2014 च्या आधी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शब्द होतेच. मग

दहशतवादाचे समूळ उच्चाटन

करण्याची जबाबदारी आज विद्यमान पंतप्रधानांची आहे, असे कुणी म्हटले तर ते समजून घेतले पाहिजे. पुण्यातील नक्षलवाद्यांकडून पंतप्रधानांच्या जिवास धोका असल्याचा ‘ई-मेल’ आमचे गुप्तचर पकडतात व पंतप्रधानांचा जीव वाचवतात, पण चाळीस जवानांना घेऊन जाणार्‍या बसवर दिवसाढवळ्या हल्ला होणार याची खबर लागत नाही. स्फोटकाने भरलेली एक गाडी जवानांच्या बसवर मोकाटपणे आदळवली जाते. पंतप्रधानांसह इतर व्ही.आय.पी. मंडळींच्या सुरक्षेची चिंता केली जाते, पण जवान मात्र अतिरेक्यांच्या हल्ल्यात मरण पावतात. जवान हे मरण्यासाठीच पगार घेतात अशा राजकीय वक्तव्यावर त्यामुळे विश्वास बसतो. दहशतवाद रोखणारी ‘छाती’ असूनही पठाणकोटनंतर उरी घडले व उरीनंतर आता पुलवामा घडले आहे. ‘पुलवामा’ घटनेचे राजकारण होऊ नये. 40 जवानांच्या हौतात्म्यानंतर देशात आकांत, आक्रोश आणि संतापाचे वातावरण आहेच. तरीही राजकीय सभांत प्रचारकी भाषणे त्याच वेळी कोणी करीत असतील तर त्यावर टीका होणारच. ही देशभक्ती खचितच नव्हे. निवडणुकीपूर्वी एखादा दहशतवादी हल्ला होईल व त्यानंतर एखादे छोटे युद्ध खेळून निवडणुका जिंकल्या जातील, असा राजकीय आरोप काही दिवसांपूर्वीच झाला. अशा आरोपांना पुष्टी मिळेल असे वर्तन राज्यकर्त्यांनी करू नये. लोकांच्या मनातील खदखद लाव्हारसाप्रमाणे उसळून बाहेर येईल व त्यांना आवरणे कठीण जाईल. दंगली व दहशतवादी हल्ले हे निवडणुका जिंकण्याचे साधन ठरू नये. तसे कोणी करीत असेल तर ईश्वर त्या सर्वच राजकीय पक्षांना सुबुद्धी देवो!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जितेंद्र आव्हाडांच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण; थोड्याच वेळात निकाल येणार

Manasi Devkar

सावरकरांवरून शिवसेनेच्या अडचणी वाढवणाऱ्या भाजपला सर्वसामान्यांचा विसर ?

News Desk

मध्य प्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये कोण ?

News Desk